For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला भारताकडून मदत रवाना

06:27 AM Sep 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला भारताकडून मदत रवाना
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, काबूल

Advertisement

भूकंपामुळे तीव्र हानी झालेल्या अफगाणिस्तानला भारताने तातडीने मदत रवाना केली आहे. भूकंपानंतर दुसऱ्याच दिवशी भारताने 1,000 तंबू पाठवले आहेत. तसेच काबूलहून कुनारला 15 टन अन्नपदार्थ पाठवण्यात आले. अफगाणिस्तानच्या आवाहनानंतर भारताव्यतिरिक्त चीन आणि ब्रिटनसारख्या देशांनी मदत पाठवली आहे. भूकंपग्रस्त कुटुंबांना मदत करण्यासाठी ब्रिटनने 1 दशलक्ष पौंड (10 कोटी) च्या आपत्कालीन निधीची घोषणा केली आहे. त्याचवेळी, चीनने अफगाणिस्तानला त्यांच्या गरजा आणि क्षमतेनुसार मदत करण्याचा शब्द दिला आहे.

अफगाणिस्तानात रविवार व सोमवारच्या मध्यरात्री 6.0 तीव्रतेचा भूकंप झाल्यामुळे आतापर्यंत चौदाशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. त्याचवेळी, जवळपास चार हजारांहून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. अनेक ठिकाणी घरे आणि इमारतींची पडझड झाली असून ढिगारे उपसण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले आहे. भूकंपाचा हादरा बसताना बहुतेक लोक झोपलेले असल्यामुळे ते इमारतींच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहेत. मंगळवारी सायंकाळपर्यंत मृतांचा आकडा 1,411 वर पोहोचला होता. तर जखमींची संख्या 3,650 पेक्षा जास्त असल्याची माहिती तालिबानने दिली आहे.

Advertisement

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारने जगभरातून मदत मागितली आहे. यानंतर, भारताने मदतीसाठी काबूलला 1000 तंबू पाठवले आहेत. तसेच, काबूलहून कुनारला 15 टन अन्नपदार्थ पाठवण्यात आले. परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी ‘एक्स’वर भारत नजिकच्या काळात आणखी मदत साहित्य पाठवेल असे जाहीर केले आहे. 2021 मध्ये अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय संस्थांनी अफगाणिस्तानला मानवतावादी मदत थांबवली होती. मात्र, आता नैसर्गिक आपत्तीमध्ये विविध देशांकडून मदतीचा हात पुढे केला जाणार आहे.

भूकंपाने अनेक गावे उद्ध्वस्त

यूएस जिओलॉजिकल सर्व्हे (यूएसजीएस) नुसार, 2 लाख लोकसंख्या असलेल्या जलालाबाद शहरापासून सुमारे 17 मैल अंतरावर असलेल्या नांगरहार प्रांतात भूकंप झाला. या भागात अनेक गावे ढिगाऱ्यात बदलली आहेत. हा परिसर राजधानी काबूलपासून 150 किमी अंतरावर आहे. हा डोंगराळ भाग असून भूकंपांसाठी रेड झोन मानला जातो. सद्यस्थितीत तेथे मदत पोहोचवणे कठीण आहे. नांगरहारपासून जवळच असलेल्या कुनार प्रांतात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. सोमवारी येथे 4.6 तीव्रतेचा आणखी एक भूकंप झाला. अल जझीराच्या मते, भूकंपाचे धक्के पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा आणि पंजाब प्रांतातही जाणवले. त्याचवेळी, भारतातील गुरुग्राममध्येही सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले होते. मात्र, भारतात कोठेही जीवितहानी झाल्याची नोंद नाही.

Advertisement
Tags :

.