युवा आशिया चषकातही भारताची पाकवर मात
अॅरॉन जॉर्जचे अर्धशतक : सामनावीर कनिष्क चौहानची अष्टपैलू चमक
वृत्तसंस्था/ दुबई
19 वर्षाखालील वयोगटाच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतील अ गटातील झालेल्या सामन्यात शिस्तबद्ध गोलंदाजी, अॅरॉन जॉर्जचे अर्धशतक आणि सामनावीर कनिष्क चौहानच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारतीय युवा संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 90 धावांनी दणदणीत पराभव केला.
या सामन्यात पाकने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताचा डाव 46.1 षटकात 240 धावांत आटोपला. त्यानंतर पाकने 41.2 षटकात केवळ 150 धावांपर्यंत मजल मारल्याने त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भारताच्या डावाला बऱ्यापैकी सुरुवात झाली. कर्णधार म्हात्रेने 3 षटकार आणि 4 चौकारांसह जलद 38 धावा झोडपताना वैभव सूर्यवंशीसमवेत 29 धावांची भागिदारी केली. पण वैभव सूर्यवंशीकडून निराशा झाली. पाकच्या सैय्यामने स्वत:च्याच गोलंदाजीवर वैभवला टिपले. त्याने केवळ 5 धावा केल्या. आयुष म्हात्रे आणि अॅरॉन जॉर्ज यांनी दुसऱ्या गड्यासाठी 49 धावांची भागिदारी केली. सैय्यामने म्हात्रेला झेलबाद केले. विहान मल्होत्रा 2 चौकारांसह 12 धावांवर बाद झाला. वेदांत त्रिवेदीने 7 धावा केल्या. अॅरॉन जॉर्ज आणि कुंडू यांनी पाचव्या गड्यासाठी 60 धावांची भागिदारी केली. कुंडूने 1 षटकारासह 22 धावा जमविल्या. अॅरॉन जॉर्जने 1 षटकार आणि 12 चौकारांसह 85 धावा झळकाविल्या. तो सहाव्या गड्याच्या रुपात बाद झाला. कनिष्क चौहानने उपयुक्त 46 धावांची खेळी केल्याने भारताला 240 धावांपर्यंत मजल मारता आली. चौहानने 3 षटकार आणि 2 चौकारांसह 46 धावा केल्या. खिलन पटेलने 12 तर हेनिल पटेलने 1 षटकारासह 12 धावा केल्या. 46.1 षटकात भारताचा डाव 240 धावांवर समाप्त झाला. भारताच्या डावात 9 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. पाकतर्फे मोहम्मद सैय्याम आणि अब्दुल सुभान यांनी प्रत्येकी 3 तसेच निकाब शफिकने 38 धावांत 2, अली रझा व अहमद हुसेन यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
प्रत्युत्तरादाखल खेळताना पाकच्या डावामध्ये हुजिफा एहसानने एकाकी लढत देत 83 चेंडूत 2 षटकार आणि 9 चौकारांसह 70 धावा झळकाविल्या. कर्णधार युसुफने 34 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 23, सलामीच्या उस्मान खानने 42 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 16 धावा केल्या. पाकच्या इतर फलंदाजांना भारताच्या शिस्तबद्ध गोलंदाजीसमोर दुहेरी धावसंख्या गाठता आली नाही. पाकचा निम्मा संघ 24 षटकात 77 धावांत तंबूत परतला होता. भारतातर्फे दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले. देवेंद्रनने 16 धावांत तर चौहानने 33 धावांत 3 बळी मिळविले. किशन सिंगने 33 धावांत 2 गडी बाद केले. खिलान पटेल आणि वैभव सूर्यवंशी यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला. या सामन्यात नाणेफेकीवेळी तसेच खेळ संपल्यानंतर उभय संघातील खेळाडुंनी परस्परांशी हस्तांदोलन करणे टाळले.
संक्षिप्त धावफलक - भारत 46.1 षटकात सर्वबाद 240 (अॅरॉन जॉर्ज 88 चेंडूत 85, अभिज्ञान कुंडू 22, कनिष्क चौहान 46 चेंडूत 46, आयुष म्हात्रे 25 चेंडूत 38, त्रिवेदी 7, खिलन पटेल 6, हेनिल पटेल 12, अवांतर 6, अब्दुल सुभान व मोहम्मद सैय्याम प्रत्येकी 3 बळी, निकाब शफिक 2-38, अली रझा व अहमद हुसेन प्रत्येकी 1 बळी), पाक 41.2 षटकात सर्वबाद 150 (हुझैफा एहसान 83 चेंडूत 70, फरहान युसुफ 23, उस्मान खान 16, अवांतर 8, दीपेश देवेंद्रन 3-16, कनिष्क चौहान 3-33, किशन सिंग 2-33, खिलन पटेल 1-33, वैभव सूर्यवंशी 1-6).