भारताचा मालिकाविजयावर शिक्कामोर्तब
इंग्लंड 15 धावांनी पराभूत, दुबे सामनावीर, भारत 3-1 ने आघाडीवर
वृत्तसंस्था/ पुणे
सांघिक कामगिरीच्या जोरावर भारतीय क्रिकेट संघाने शुक्रवारी येथे पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील चौथ्या सामन्यात इंग्लंडचा 15 धावांनी पराभव करत 3-1 अशी विजयी आघाडी मिळवली. या सामन्यात हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे यांची अर्धशतके तर बिश्नोई आणि हर्षित राणा यांची प्रभावी गोलंदाजी वैशिष्ट्यो ठरली. इंग्लंडच्या ब्रुकचे अर्धशतक वाया गेले. या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने 20 षटकात 9 बाद 181 धावा जमविल्या. त्यानंतर इंग्लंडचा डाव 19.4 षटकात 166 धावांत आटोपला.
भारताच्या डावाला चांगली सुरुवात झाली नाही. साकिब मेहमूदच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची दुसऱ्या षटकाअखेर स्थिती 3 बाद 12 अशी केविलवाणी होती. सलामीचा संजू सॅमसन केवळ एका धावेवर बाद झाला. त्यानंतर मेहमूदच्या या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तिलक वर्मा खाते उघडण्यापूर्वी झेलबाद झाला. मेहमूदने या षटकातील शेवटच्या चेंडूवर कर्णधार सूर्यकुमार यादवला खाते उघडण्यापूर्वी कार्सेकरवी झेलबाद केले. अभिषेक शर्मा आणि रिंकू सिंग यांनी चौथ्या गड्यासाठी 45 धावांची भागिदारी केली. अभिषेक शर्माने 19 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 29 धावा जमविल्या. रिंकू सिंगने 26 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 30 धावा जमविल्या. भारताची यावेळी स्थिती 10.4 षटकात 5 बाद 79 अशी होती.
हार्दिक पंड्या आणि शिवम दुबे या जोडीने सहाव्या गड्यासाठी 87 धावांची भागिदारी केल्याने भारताला 181 धावांपर्यंत मजल मारता आली. दुबेने 34 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह 53 तर हार्दिक पंड्याने 30 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 53 धावा जमविल्या. अक्षर पटेल 5 धावांवर बाद झाला. अर्शदिप सिंग खाते उघडण्यापूर्वीच धावचीत झाला. भारताच्या डावात 8 षटकार आणि 19 चौकार नोंदविले गेले. भारताला 10 अवांतर धावा मिळाल्या. पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात भारताने 47 धावा जमविताना 3 गडी गमाविले. भारताचे अर्धशतक 42 चेंडूत, शतक 81 चेंडूत तर दीडशतक 104 चेंडूत फलकावर लागले. 10 षटकाअखेर भारताने 4 बाद 72 धावा जमविल्या होत्या. पांड्याने 27 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकार तर दुबेने 31 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारांसह अर्धशतके पूर्ण केली. नंतर कन्कशन बदली खेळाडू म्हणून दुबेच्या जागी हर्षित राणाला संघात घेण्यात आले. इंग्लंडतर्फे साकिब मेहमूदने 35 धावांत 3 तर ओव्हरटनने 2 आणि आदिल रशिद व कार्से यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
इंग्लंडच्या डावाला सॉल्ट आणि डकेट यांनी चांगली सुरुवात करुन देताना 6 षटकात 62 धावांची भागिदारी केली. बिश्नोईने ही जोडी फोडताना डकेटला झेलबाद केले. त्याने 19 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 39 धावा जमविल्या. अक्षर पटेलने सॉल्टचा त्रिफळा उडविला. त्याने 21 चेंडूत 4 चौकारांसह 21 धावा केल्या. बिश्नोईने इंग्लंडला आणखी एक धक्का देताना कर्णधार बटलरला केवळ 2 धावांवर तंबूचा रस्ता दाखविला. हर्षित राणाने लिव्हिंगस्टोनला 9 धावांवर बाद केले. एका बाजूने ब्रुकने चिवट फलंदाजी करत 26 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह 51 धावा जमविल्या. पण ब्रुकचे हे अर्धशतक वाया गेले. बेथेलने 6 धावा केल्या. कार्सेला खाते उघडता आले नाही. ओव्हरटनने 1 षटकार आणि 1 चौकारासह 19 धावा जमविल्या. आर्चर बिश्नोईच्या गोलंदाजीवर खाते उघडण्यापूर्वीच त्रिफळाचीत झाला. आदिल रशिदने 1 षटकारासह नाबाद 10 धावा केल्या. अर्शदिप सिंगने साकिब मेहमूदला एका धावेवर झेलबाद करुन आपल्या संघाला 15 धावांनी विजय मिळवून दिला. इंग्लंडच्या डावात 5 षटकार आणि 17 चौकार नोंदविले गेले. भारतातर्फे हर्षित राणा आणि रवी बिश्नोई यांनी प्रत्येकी 3 तर वरुण चक्रवर्तीने 2, अर्शदिप सिंग व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक - भारत 20 षटकात 9 बाद 181 (हार्दिक पंड्या 53, शिवम दुबे 53, रिंकू सिंग 30, अभिषेक शर्मा 29, अवांतर 10, साकिब मेहमूद 3-35, ओव्हरटन 2-32, कार्से व आदिल रशिद प्रत्येकी 1 बळी), इंग्लंड 19.4 षटकात सर्वबाद 166 (ब्रुक 51, डकेट 39, सॉल्ट 23, ओव्हरटन 19, आदिल रशिद नाबाद 10, अवांतर 6, बिश्नोई 3-28, हर्षित राणा 3-33, चक्रवर्ती 2-28, अर्शदिप सिंग व अक्षर पटेल प्रत्येकी 1 बळी).