भारताचे चिलीवर 7 गोल
वृत्तसंस्था / चेन्नई
शुक्रवारपासून येथे सुरू झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या कनिष्ठ पुरूषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारताने पहिल्याच सामन्यात चिलीचा 7-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत आपल्या मोहीमेला शानदार प्रारंभ केला. या स्पर्धेतील पहिल्या दिवशी झालेल्या अन्य एका सामन्यात न्यूझीलंडने चीनचा तर स्वीसने ओमानचा तसेच अर्जेंटिनाने जपानचा पराभव करत विजयी सलमी दिली.
ब गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात भारतीय हॉकीपटूंनी वेगवान आणि आक्रमक खेळावर भर देत दुबळ्या चिलीचा फडशा पाडला. या सामन्यात भारताने चिलीवर तब्बल 7 गोल केले. तर चिलीला या सामन्यात शेवटपर्यंत आपले खाते उघडताआले नाही. भारतातर्फे रोशन खुजूर आणि दिलराज सिंग यांनी प्रत्येकी 2 गोल केले. खेळाला प्रारंभ झाल्यानंतर पहिल्या 15 मिनिटांच्या सत्रात दोन्ही संघांना खाते उघडता आले नाही. रोशन खुजूरने 16 व्या मिनिटाला आणि 21 व्या मिनिटाला असे दोन गोल केले. त्यानंतर दिलराजने 25 व्या मिनिटाला भारताचा तिसरा गोल केला. मध्यंतरापर्यंत भारताने चिलीवर 3-0 अशी आघाडी मिळविली होती. खेळाच्या उत्तराधार्थ भारताने आणखी चार गोल केले. दिलराजने 34 व्या मिनिटाला भारताचा चौथा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. 35 व्या मिनिटाला अजित यादवने, 48 व्या मिनिटाला अनमोल एकाने तर 60 व्या मिनिटाला कर्णधार रोहीतने गोल नोंदविला. आता भारताचा या स्पर्धेतील दुसरा सामना शनिवारी ओमानबरोबर होत आहे.
क गटातील झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने चीनचा 5-3 अशा गोलफरकाने पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्यात न्यूझीलंडच्या जॉन्टी इमेसने 8 व्या, 25 व्या आणि 26 व्या मिनिटाला गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. न्यूझीलंडतर्फे ओवेन ब्राऊनने 18 व्या मिनिटाला तर सॅम लिंट्सने 23 व्या मिनिटाला गोल केले. चीनतर्फे वेंगने 35 व्या आणि 55 व्या मिनिटाला असे दोन गोल तर झेंगने 51 व्या मिनिटाला गोल नोंदविला.
क गटातील खेळविण्यात आलेल्या अन्य एका सामन्यात आतापर्यंत ही स्पर्धा दोनवेळा जिंकणाऱ्या बलाढ्या अर्जेंटिनाने जपानचे आव्हान 4-1 असे संपुष्टात आणत विजयी सलामी दिली. अर्जेंटिनातर्फे निकोलास रॉड्रिग्जने दुसऱ्या आणि 56 व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदविले. मॅटो टोरिगेनीने 24 व्या तर ब्रुनो कोरियाने 51 व्या मिनिटाला गोल केले. जपानतर्फे एकमेव गोल 53 व्या मिनिटाला किमुराने केला.
ब गटातील खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्वीसने ओमानचा 4-0 असा पराभव केला. स्वीसतर्फे जोनाथन बॉम्बेचने 15 मिनिटाला, मेटिया रिबाडोने 23 व्या मिनिटाला, लिनार्ड क्रेनरने 33 व्या आणि ब्रुनॉल्ड 58 व्या मिनिटाला गोल केले. सदर स्पर्धा चेन्नई आणि मदुराई यांच्या संयुक्त यजमानपदाने शुक्रवारी येथे सुरू झाली असून ती 10 डिसेंबरपर्यंत चालणार आहे.