भारताचे सिंगापूरवर 12 गोल
वृत्तसंस्था / हांगझोयु (चीन)
नवनीत कौर आणि मुमताझ खान यांच्या शानदार हॅट्ट्रीकच्या जोरावर येथे सोमवारी खेळविण्यात आलेल्या महिलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेतील सामन्यात भारताने सिंगापूरचा 12-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव करत सुपर-4 फेरीमध्ये प्रवेश मिळविला.
या सामन्यात भारतातर्फे नवनीत कौरने 14 व्या, 20 व्या आणि 28 व्या मिनिटाला तसेच मुमताझ खानने 2 ऱ्या, 32 व्या आणि 39 व्या मिनिटाला गोल करीत हॅट्ट्रीक साधली. नेहाने 11 आणि 38 व्या मिनिटाला असे दोन गोल नोंदविले. लालरेमसियामीने 13 व्या मिनिटाला, उदिताने 29 व्या मिनिटाला, शर्मिलाने 45 व्या तर ऋतुजा पिसाळने 53 व्या मिनिटाला गोल नोंदविले.
या स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या सलामीच्या सामन्यात दहाव्या मानांकीत भारताने थायलंडचा 11-0 असा दणदणीत पराभव करुन आपल्या मोहीमेला शानदार सुरूवात केली होती. सोमवारच्या सामन्यात पहिल्या दोन मिनिटांमध्ये भारतीय महिला हॉकीपटूंनी सिंगापूरच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. दुसऱ्याच मिनिटाला मुमताझ खानने भारताचे खाते उघडले. 11 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल नेहाने केला. 13 व्या मिनिटाला लालरेमसियामीने भारताचा तिसरा गोल नोंदविला. आठव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण तो वाया गेला. भारताचा तिसरा गोल 13 व्या मिनिटाला लालरेमसियामीने केला. मध्यंतरापर्यंत नवनीत कौरने 14 व्या मिनिटाला भारताचा चौथा गोल केला. यानंतर सिंगापूरने आक्रमक खेळाच्या जोरावर भारताची वारंवार आक्रमणे थोपविली. नवनीतने 20 व्या मिनिटाला स्वत:चा दुसरा गोल तर भारताचा पाचवा गोल केला. भारतीय खेळाडूंमध्ये पासेस देताना योग्य समन्वय राखला गेला. उदिताने भारताचा सहावा तर नवनीतने 28 व्या मिनिटाला भारताचा सातवा आणि वैयक्तिक तिसरा गोल नोंदवून हॅट्ट्रीक साधली. मध्यंतरापर्यंत भारताने सिंगापूरवर 7-0 अशी आघाडी मिळविली होती.
32 व्या मिनिटाला लालरेमसियामी आणि मुमताझ यांनी भारताचा आठवा गोल केला. दरम्यान भारताला सलग दोन पेनल्टी कॉर्नर मिळाले. भारताने यानंतर आणखी चार गोल नोंदवित सिंगापूरचे आव्हान 12-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले.