आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत भारत अजिंक्य
चीनचा कडवा प्रतिकार मोडून काढत पाचव्यांदा पटकावली ट्रॉफी, जुगराज सिंगचा एकमेव मैदानी गोल ठरला निर्णायक, पाकला तिसरे स्थान
वृत्तसंस्था/हुलुनबुइर, चीन
निर्धारी खेळ करणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पाचव्यांदा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेचे जेतेपद पटकावले. अंतिम लढतीत भारताने चीनचा 1-0 असा एकमेव गोलने पराभव केला. विशेष म्हणजे या स्पर्धेत पूर्ण वर्चस्व राखत सर्व सामने जिंकले. कोरियाला हरवून पाकिस्तानने तिसरे स्थान मिळविले. डिफेंडर जुगराज सिंगने मैदानी गोल नोंदवला, तोच शेवटी निर्णायक ठरला. भारताने जेतेपद मिळविले असले तरी चीनने त्यांना कडवा प्रतिकार करीत संघर्ष करण्यास भाग पाडले. पहिल्या तीन सत्रांत भारताला चीनचा बचाव भेदता आला नाही. शेवटच्या सत्रात 51 व्या मिनिटाला जुगराज सिंगने ही कोंडी फोडली आणि एकमेव विजयी गोल नोंदवला. केवळ आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील अंतिम सामना खेळणाऱ्या चीनने शानदार प्रदर्शन करीत भारताला गोल करण्यापासून रोखले होते. यापूर्वी 2006 मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत चीनने हॉकीची अंतिम फेरी गाठली होती. त्यावेळी त्यांना कोरियाकडून 1-3 असा पराभव स्वीकारावा लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. या अंतिम सामन्याआधी झालेल्या तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत पाकिस्तानने कोरियाचा 5-2 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.
भारताने जेतेपदाचे दावेदार म्हणूनच सामन्याला सुरुवात केली. कारण साखळी फेरीतील पहिल्या सामन्यात भारताने चीनचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला होता. अंतिम लढतीत मात्र त्यांनी शानदार प्रदर्शन करीत भारताला वर्चस्व गाजवू दिले नाही. पहिल्या दोन सत्रात दोन्ही संघांनी अटीतटीचा खेळ केला, तरी भारताला गोलच्या संधी त्यांच्यापेक्षा अधिक मिळाल्या. चीनने बचावात भक्कमपणा दाखविला आणि प्रतिहल्ला करीत भारतावर दबाव आणला. राजकुमार पालने गोलच्या दिशेने पहिला फटका मारला, पण चिनी गोलरक्षक वांग वेइहावने तो अचूक अडविला. दहाव्या मिनिटाला राजकुमार पालने भारताचा पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण त्यावर पुन्हा एक पेनल्टी कॉर्नर मिळविला. मात्र कर्णधार हरमनप्रीतला दुसऱ्या प्रयत्नात अचूक वेध घेता आला नाही.
दोन मिनिटांनंतर निलकांता शर्माचा जोरदार फटका गोलरक्षक वांगने अडविल्यानंतर वांगने चपळता दाखवित सुखजीत सिंगचा प्रयत्न फोल ठरविला. जुगराजने सुखजीतला पास पुरविला होता. पहिल्या सत्राच्या काही सेकंद आधी चीनने पेनल्टी कॉर्नर मिळविला. पण गोलरक्षक कृष्ण बहादुर पाठकने चपळता दाखवित अप्रतिम बचाव केला. दुसऱ्या सत्रातही दोन्ही संघांनी हाच जोम कायम राखला. पण बॉल पझेशनच्या बाबतीत भारत सरस ठरले. चीनने मात्र प्रतिहल्ला करण्यावर जास्त भर दिला. भारताने गोलसाठी जोरदार प्रयत्न केले, पण चीनच्या डीपमधील बचावफळीने त्यांना यश मिळू दिले नाही. भारताने दबाव आणला तरी चीनने दबून न जाता शांतपणे खेळ चालू ठेवला.
27 व्या मिनिटाला सुखजीतने पेनल्टी कॉर्नर मिळविला, पण हरमनप्रीतचा फटका गोलपोस्टच्या बारला लागला. पूर्वार्धात गोलफलक कोराच राहिला होता. उत्तरार्धातील पहिल्या सत्रात चीनने आक्रमक सुरुवात करीत 38 व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळविला, पण भारतीय बचावफळीने तो फोल ठरविला. चीनने आक्रमण पुढे चालू ठेवत 40 व्या मिनिटाला आणखी एक पीसी मिळविला. पण त्याचाही त्यांना लाभ घेता आला नाही. भारताच्या युवा आघाडीवीरांनीही चीनवर अनेकदा हल्ले केले. पण गोल नोंदवण्यात त्यांना यश आले नाही. हरमनप्रीतने अखेर ही कोंडी फोडण्यात यश मिळविले. त्यांचे चेंडूवर ताबा घेत चीनच्या सर्कलमध्ये प्रवेश केला आणि जवळच असलेला डिफेंडर जुगराजकडे चेंडू सोपविला. त्याने त्यावर जोरदार फटका मारत भारताला पहिले व एकमेव यश मिळवून दिले. सामना संपण्यास चार मिनिटे असताना चीनने गोलरक्षकाला हटवून मैदानात जादा खेळाडू उतरवला. पण भारताने चेंडू आपल्या ताब्यात ठेवत चीनचे मनसुबे उधळून लावले आणि जेतेपदही निश्चित केले.