मोबाईल निर्यातीमध्ये भारताने नोंदली 42 टक्के वृद्धी
9 महिन्यातील कामगिरी: निर्यात विक्रमी होण्याची शक्यता
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आर्थिक वर्षामध्ये एप्रिल ते डिसेंबर या कालावधीमध्ये नऊ महिन्यात अमेरिका, युरोप, आशियाई देशांसह पश्चिम आशिया प्रांतामध्ये भारताने 10.5 अब्ज डॉलर्सच्या मोबाईल फोनची निर्यात केली आहे. जी मागच्या तुलनेत पाहता 42 टक्के अधिक आहे.
आर्थिक वर्ष संपायला अजूनही तीन महिन्यांचा कालावधी असताना 2024 मध्ये निर्यात किंमतीचा आकडा 12 ते 14 अब्ज डॉलरवर पोहोचू शकतो, असेही म्हटले जात आहे. आर्थिक वर्ष 2023 मध्ये 11 अब्ज डॉलर्सची निर्यात एकंदर करण्यात आली होती. या सर्व फोनच्या निर्मितीमध्ये आयफोनची निर्यात 7 अब्ज डॉलर्सची राहिली आहे.
डिसेंबर ठरला लकी
गेल्या नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये पाहता फोनच्या एकंदर निर्यातीत 42 टक्के वृद्धी झाली आहे. या आर्थिक वर्षामध्ये डिसेंबरमध्ये सर्वाधिक मोबाईल फोनची निर्यात केली गेली आहे. 1.38 अब्ज डॉलरची निर्यात एकाच महिन्यात करण्यात आली आहे. आर्थिक वर्ष 2023-24 हे असे पहिले वर्ष आहे की मोबाईलची निर्यात एप्रिल नंतर पाहता नऊ महिन्यांमध्ये सलग सहा महिने 1 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिक राहिली आहे.