9 वर्षांनंतर जेतेपद मिळवण्यास भारत सज्ज
कनिष्ठ हॉकी विश्वचषक आजपासून
वृत्तसंस्था/चेन्नई
पुऊषांची कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धा आज शुक्रवारपासून सुरू होत असून स्पर्धेच्या इतिहासातील संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत यशस्वी संघ असलेला यजमान भारत शुक्रवारी येथे पहिल्या गट सामन्यात चिलीविऊद्ध आपली मोहीम सुरू करताना नऊ वर्षांनंतर घरच्या मैदानावर जेतेपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील असेल. दोन वेळा विजेता राहिलेल्या भारताने 2016 मध्ये लखनौत आताच्या वरिष्ठ महिला संघाचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली शेवटच्या खेपेला स्पर्धा जिंकली होती. भारत ‘ब’ गटात विसावलेला असून सदर गटातून प्रगतीच्या बाबतीत यजमान संघ भक्कम दावेदार आहे. भारत आणि चिलीच्या व्यतिरिक्त ऑपरेशन सिंदूरनंतर सुरक्षेच्या कारणास्तव भारतात जाण्यास नकार दिलेल्या पाकिस्तानची जागा घेणारा ओमान आणि स्वित्झर्लंड हे गट ‘ब’मधील इतर संघ आहेत.
भारताने 2001 मध्ये होबार्ट येथे आणि 2016 मध्ये लखनौ येथे अशा प्रकारे दोनदा जेतेपद जिंकले आहे. 46 वर्षांपूर्वी 1979 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेतील जर्मनी हा सर्वांत यशस्वी संघ आहे, ज्याने सात जेतेपदे जिंकली आहेत. अर्जेंटिना भारतासोबत दुसऱ्या क्रमांकाचा सर्वांत यशस्वी संघ आहे, ज्याने 2005 आणि 2021 मध्ये विजेतेपद मिळविलेले आहे. पाकिस्तानने 1979 मध्ये व्हर्साय (फ्रान्स) येथे झालेल्या पहिल्या आवृत्तीत जेतेपद मिळविले होते आणि
ऑस्ट्रेलियाने 1997 मध्ये मिल्टन केन्स येथे भारताला हरवून विजेतेपदावर आपले नाव कोरले होते. 2023 मध्ये क्वालालंपूर येथे झालेल्या शेवटच्या आवृत्तीत भारत चौथ्या स्थानावर राहिला होता आणि कांस्यपदकाच्या सामन्यात स्पेनकडून 1-3 असा पराभव त्यांना पत्करावा लागला होता. त्यावेळी जर्मनीने चषक जिंकला होता. पहिल्यांदाच 24 संघ यजमान शहरे चेन्नई आणि मदुराई येथे लढतील. साखळी फेरीत प्रत्येकी चार अशा प्रकारे सहा गटांमध्ये संघ विभागले जातील. प्राथमिक फेरीनंतर विविध गटांतील पहिल्या क्रमांकावरील संघ आणि दोन सर्वोत्तम दुसऱ्या क्रमांकाचे संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचतील. जगात दुसऱ्या क्रमांकावर असलेला भारत जेतेपदासाठीचा भक्कम दावेदार आहे.