For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत आज न्यूझीलंडविरुद्ध लय कामय ठेवण्यास सज्ज

06:58 AM Mar 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
भारत आज न्यूझीलंडविरुद्ध लय कामय ठेवण्यास सज्ज
Advertisement

उपांत्य फेरीच्या आधी मोहम्मद शमीसह काही खेळाडूंना विश्रांती दिली जाण्याची शक्यता

Advertisement

वृत्तसंस्था/ दुबई

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आज रविवारी येथे होणाऱ्या शेवटच्या गट सामन्यात भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार असून उपांत्य फेरीच्या सामन्याच्या आधी भारत फिरकी गोलंदाजांविरुद्धचा आपला खेळ आणखी धारदार करण्यास आणि दुसऱ्या फळीतील खेळाडूंना संधी देण्यास उत्सुक असेल. शेवटच्या साखळी सामन्यातील विजयामुळे भारताला गट ‘अ’मध्ये अव्वल स्थान मिळण्यास मदत होईल. परंतु हे स्थान फारसे महत्त्वाचे नाही, कारण त्यांना उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिकेचा सामना करावा लागणार आहे आणि दोघांकडेही उपयुक्त फिरकी गोलंदाज आहेत.

Advertisement

या स्पर्धेत आतापर्यंत दोन विजय मिळवूनही भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांविऊद्ध फारसे आरामदायी दिसलेले नाहीत आणि उपांत्य फेरीसाठी पात्र ठरलेला न्यूझीलंड त्यांच्यासमोर कठीण आव्हान उभे करू शकतो. भारतीय स्टार फलंदाजांनी जोखीम न घेता बांगलादेशचे फिरकीपटू मेहदी हसन मिराज (0-37) आणि रिशाद हुसेन (2-38) यांची षटके खेळून काढण्यावर अधिक लक्ष केंद्रीत केले होते आणि त्यांनी पाकिस्तानचा लेगस्पिनर अबरार अहमद (1-28) याच्याविऊद्धही हाच दृष्टिकोन अवलंबला.

पण आज त्यांना मिशेल सँटनर आणि मायकेल ब्रेसवेल यांच्यासारख्या अधिक धूर्त खेळाडूंशी सामना करावा लागेल आणि या स्पर्धेतील फिरकी गोलंदाजांविऊद्धची ही त्यांची सर्वात कठीण परीक्षा असू शकते. दोन्ही किवी फिरकी गोलंदाज येथे उत्तम कामगिरी करत आहेत आणि दुबईच्या जीर्ण झालेल्या मैदानावर ते आणखी प्रभावी ठरू शकतात. भारतीय फलंदाजांनी फिरकीविरुद्ध एकेरी व दोन धावा काढण्याची, तर वेगवान गोलंदाजांविरुद्ध मोठे फटके वापरण्याची हुशारी दाखविलेंली आहे.

पण त्यांना सँटनर आणि ब्रेसवेल यांच्या 20 षटकांचा आणि ग्लेन फिलिप्सच्या ऑफस्पिन गोलंदाजांचाही सामना करावा लागेल. याबाबतीत गेल्या वर्षीच्या अखेरीस घरच्या मैदानावर झालेल्या कसोटी मालिकेतील आठवणी भारताच्या दृष्टीने फारशा चांगल्या नाहीत. त्या मालिकेत त्यांना 0-3 असा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे अलीकडच्या काळात भारताचा एकदिवसीय सामन्यांमधील उत्कृष्ट फलंदाज राहिलेला शुभमन गिल, पाकिस्तानविऊद्ध मनोबल वाढवणारी 100 धावांची खेळी केलेला विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि के. एल. राहुल त्यांच्याविरुद्ध किती प्रभावी ठरतात त्यावरून सामन्याचा निकाल ठरेल.

भारताने आतापर्यंत वापरलेले तीन फिरकी गोलंदाज जडेजा, अक्षर आणि कुलदीप यांनी परिस्थितीनुसार गोलंदाजी केली आहे. त्यांनी कोणतीही जादूई कामगिरी केलेली नसली, तरी मधल्या षटकांमध्ये विरोधी फलंदाजांना रोखण्यात ते यशस्वी झाले आहेत. पण न्यूझीलंडविऊद्ध त्यांना वेगळ्या परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. कारण केन विल्यमसन, विल यंग, टॉम लॅथम, डेव्हॉन कॉनवे आणि रचिन रवींद्र इत्यादी फलंदाज फिरकी गोलंदाजांविऊद्ध उत्कृष्ट कामगिरी करण्याची क्षमता बाळगतात. जर भारतीय फिरकी गोलंदाज त्यांना रोखू शकले, तर त्यांचा आधीच उंचावलेला आत्मविश्वास आणखी बळकट होईल.

भारताला ही लय कायम ठेवायची असली, तरी उपांत्य फेरीपूर्वी व्यवस्थापनाला कर्णधार रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी यांना ब्रेक देण्याचा मोह होऊ शकतो. जर तसे झाले, तर रिषभ पंतला त्याचा पहिला सामना येथे खेळता येईल. पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यादरम्यान मोहम्मद शमीच्या पायाच्या स्नायूंना दुखापत झाल्यामुळे शमीऐवजी अर्शदीप सिंग येऊ शकतो आणि कुलदीपची जागा वरुण चक्रवर्ती घेऊ शकतो.

संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, रवींद्र जडेजा, वऊण चक्रवर्ती.

न्यूझीलंड : मिचेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम, डॅरिल मिचेल, विल ओ’रोर्क, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, नॅथन स्मिथ, केन विल्यमसन, विल यंग, जेकब डफी.

सामन्याची वेळ : दुपारी 2.30 वा.

Advertisement
Tags :

.