भारत ‘क्लीन स्वीप’ करण्यासाठी सज्ज
इंग्लंडविरुद्ध तिसरी व शेवटची वनडे लढत आज, कोहलीच्या कामगिरीकडे लक्ष
वृत्तसंस्था/ मडगांव
भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना आज बुधवारी येथे होणार असून दोन्ही संघ आमनेसामने येतील तेव्हा विराट कोहलीकडून मोठी खेळी घडावी आणि इंग्लंडविऊद्धची मालिका ‘क्लिन-स्वीप’ करता यावी ही टीम इंडियाची इच्छा असेल. तसे घडल्यास चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीचा शेवट अप्रतिम पद्धतीने होईल.
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रत्येकी चार गडी राखून विजय मिळवून भारताने 2-0 अशी अजिंक्य आघाडी घेतली आहे. रोहित शर्माच्या संघाला 2023 मध्ये एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात येथे पराभव पत्करावा लागला होता. त्या ठिकाणी म्हणजे नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजय मिळविण्यास संघ उत्सुक असेल.
विराट कोहली फॉर्मात येणे हा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीचा परिपूर्ण कळस ठरेल. जर कोहली आज यशस्वी झाला, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14,000 धावा करणारा इतिहासातील तिसरा फलंदाज बनण्याची त्याला संधी आहे. त्याला त्यासाठी 89 धावांची गरज आहे. रोहित फॉर्ममध्ये परतल्याने संघाला दिलासा मिळाला आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात त्याने 90 चेंडूंत 119 धावा केल्या. दीर्घकाळ खराब कामगिरी केल्यानंतरची ही खेळी त्याला स्वत:लाही दिलासा देऊन गेलेली असेल.
भारताने या मालिकेत एकही चुकीचे पाऊल टाकलेले नाही. वऊण चक्रवर्तीच्या समावेशामुळे त्यांच्या भेदक फिरकी माऱ्याला अतिरिक्त धार मिळाली आहे आणि दुखापतीनंतर मोहम्मद शमीचे पुनरागमन देखील सुरळीत झाले आहे. शमीचे यशस्वी पुनरागमन निश्चितच आश्वासक आहे. कारण प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी उपलब्धता अजूनही संशयाच्या भोवऱ्यात आहे. मूळ नियोजनानुसार बुमराह अहमदाबाद वनडेमध्ये पुनरागमन करणार होता, परंतु हा वेगवान गोलंदाज सध्या बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये तज्ञांच्या देखरेखीखाली सावरण्याच्या प्रक्रियेवर काम करत आहे.
कटकमध्ये शतक झळकावल्याने वाढलेला रोहितचा आत्मविश्वास उर्वरित संघावर निश्चितच चांगला परिणाम करेल. यशस्वी जैस्वाल आजही बाहेर राहू शकतो, पण यष्टिरक्षक-फलंदाज के. एल. राहुलकडून भारताला चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल. निकाल मिळण्याची अपेक्षा असेल, जो स्वत: कमकुवत अवस्थेतून जात आहे. असे असले, तरी भारताने रिषभ पंतला संधी दिली आणि आणखी काही समीकरणे वापरून पाहण्याच्या दृष्टीने आणखी एका डावखुऱ्या फलंदाजाला पसंती दिली, तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.
भारताला मधल्या फळीत श्रेयस अय्यरची आवश्यकता असून अक्षर पटेलच्या दमदार फलंदाजीने मधली फळी आणखी बळकट झाली आहे. पटेलच्या फलंदाजीतील कामगिरीमुळे रवींद्र जडेजावरील दबाव काही प्रमाणात कमी झाला आहे. जडेजाने आतापर्यंत इंग्लंडचे सहा बळी घतले आहेत. पण जोस बटरच्या इंग्लंडसाठी या दौऱ्याने अपेक्षेपेक्षा जास्त प्रश्न उपस्थित केले आहेत. टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांच्या मुख्य फलंदाजांच्या अपयशामुळे फिल सॉल्ट आणि बेन डकेट या सलामीच्या जोडीने केलेल्या प्रभावी कामगिरीला धक्का बसला आहे. दुखापतीमुळे प्रतिभावान जेकब बेथेल बाहेर पडल्यामुळे त्यांच्यासमोरील अडचणी वाढल्या आहेत. ज्यो रूटच्या प्रभावी पुनरागमनाला इतरांकडून पुरेसा पाठिंबा मिळालेला नाही. गोलंदाजांमध्ये आदिल रशिदने परिस्थितीचा उत्तम फायदा घेतला आहे, परंतु एकत्रितरीत्या चांगली कामगिरी करण्याची जबाबदारी इंग्लंडच्या फलंदाजांवर असेल.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि वऊण चक्रवर्ती.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, बेन डकेट, ज्यो रूट, फिलिप सॉल्ट, जेमी स्मिथ, टॉम बँटन, ब्रायडन कार्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, साकिब महमूद, आदिल रशिद आणि मार्क वूड.
सामन्याची वेळ : दुपारी 1.30 वा.