चहा निर्यातीत भारत जगात दुसऱ्या स्थानी
वृत्तसंस्था/ दार्जिलिंग
चहा निर्यातीमध्ये भारताने जागतिक स्तरावर दुसऱ्या नंबरवर पोहोचण्याचा विक्रम केला आहे. ताज्या माहितीनुसार जागतिक स्तरावर वर्ष 2024 मध्ये चहा निर्यात करण्यामध्ये भारताने लक्षणीय यश प्राप्त केले आहे. भारतीय चहा बोर्डाने यासंदर्भात दिलेल्या माहितीनुसार मागच्या वर्षी म्हणजेच 2024 मध्ये भारताने 255 दशलक्ष किलो इतक्या चहाची निर्यात केली आहे. या निर्यातीच्या माध्यमातून भारताने निर्यातीत शर्यतीत श्रीलंकेला मागे टाकले आहे. चहा निर्यातीच्या बाबतीत 2024 मध्ये 10 टक्के नोंदवली आहे. 2023 मध्ये भारताने 231.69 दशलक्ष किलो चहाची निर्यात केली होती. चहाची निर्यात ही आजवरची जागतिक स्तरावरची विक्रमी निर्यात मानली जात आहे.
निर्यात मूल्यातही चांगली कामगिरी
जागतिक अस्थिर भू राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारताची ही निर्यातीतली कामगिरी निश्चितच स्पृहणीय मानली जात आहे. 2024 मध्ये चहा निर्यातीच्या माध्यमातून भारताला 7111 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. म्हणजेच 2023 मध्ये 6161 कोटीच्या तुलनेमध्ये मूल्यात पाहता 15 टक्के वाढ भारताने नोंदवली आहे, हे विशेष.
25 देशांना निर्यात
विविध देशांच्या निर्यातीचा विचार करता भारताने पश्चिम आशियाई देशांना 20 टक्क्यांपर्यंत चहा निर्यात केली आहे. श्रीलंकेमध्ये चहाच्या उत्पादनामध्ये आलेली घट त्यांना निर्यातीमध्ये पिछाडीवर टाकण्यास कारणीभूत ठरली आहे. आर्थिक वर्षांमध्ये भारताची इराकला चहाची निर्यात ही 40 ते 50 दशलक्ष किलोवर पोहोचू शकते, असेही म्हटले जात आहे. भारत जवळपास 25 देशांना चहाची निर्यात करतो.
कोणते प्रमुख देश
यामध्ये संयुक्त अरब अमीरात, इराक, रशिया, अमेरिका आणि इंग्लंड हे प्रमुख देश आहेत. चहाच्या दर्जामध्ये पाहता आसाम, दार्जिलिंग आणि निलगिरी या प्रकारच्या चहाची लोकप्रियता ही जागतिक स्तरावर गणली जाते. त्यातही ब्लॅक टीचा निर्यातीतील एकंदर वाटा पाहता 96 टक्के इतका नोंदला जातो. नियमित चहा, ग्रीन चहा, हर्बल चहा, मसाला चहा आणि लेमन चहा अशा विविध प्रकारच्या चहाची निर्यात विविध देशांना केली जाते.
चहा उत्पादन अधिक कोठे
चहा उत्पादनाच्याबाबतीत भारतातील राज्यांचा विचार करता आसाम आणि पश्चिम बंगाल ही राज्ये यामध्ये अग्रेसर राहिली आहेत. आसामची दरी आणि काचर या दोन ठिकाणी तसेच डुअर्स, तेराई आणि दार्जिलिंग या पश्चिम बंगालमधील ठिकाणी चहाचे उत्पादन देशात मोठ्या प्रमाणात घेतले जाते.