भारत-कतार संबंध अधिकाधिक वृद्धिंगत
अमीरांशी भेट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया : अधिकाऱ्यांच्या सुटकेसंबंधी मानले आभार
वृत्तसंस्था /दोहा
दोन दिवसांचा संयुक्त अरब अमिरातीचा दौरा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक दिवसाच्या कतार दौऱ्याला प्रारंभ केला आहे. बुधवारी रात्रीच ते कतारची राजधानी दोहा येथे पोहचले. तेथे त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. नंतर त्यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन हमद-अल्-थानी यांची भेट घेऊन द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली. या दोन देशांमधील संबंध आता वाढतच जाणार आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारतीय नौदलाच्या आठ माजी अधिकाऱ्यांची सुटका केल्याच्या संदर्भात त्यांनी कतारच्या अमीरांचे आभारही मानले आहेत. दोन्ही नेत्यांनी मुख्यत्वेकरुन परस्पर संबंध, व्यापार, गुंतवणूक, ऊर्जा, अंतराळ संशोधन आणि जनतेमधील संबंध या मुद्द्यांवर चर्चा केली. दोन्ही देश परस्परांना बळकट करण्यासाठी शक्य तितक्या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य करणार आहेत. दोन्ही देशांमधील संबंधांमध्ये आता दिवसेंदिवस वाढच होणार आहे, असे या चर्चेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. बैठकीत झालेल्या चर्चेची माहिती भारताच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी पत्रकारांना दिली.
नेत्यांची भेट
कतारचे पंतप्रधान शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल् थानी यांची भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी रात्रीच भेट घेतली होती. रहमान अल् थानी हे कतारचे परराष्ट्र व्यवहार मंत्रीही आहेत. दोन्ही नेत्यांनी परस्पर संबंध आणि काही आंतरराष्ट्रीय घडामोडींवरही चर्चा केल्याची माहिती मिळाली आहे. आखाती प्रदेश आणि त्याच्या आसपासचा भाग येथे शांतता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीनेही दोन्ही नेत्यांनी विचारांचे आदानप्रदान केले. अरबी आणि तांबड्या समुद्रातील चाचेगिरी आणि दहशतवाद या विषयांवरही त्यांची चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
सुटकेसाठी आभार
भारतीय नौदलाच्या आठ अधिकाऱ्यांना कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपावरुन मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावण्यात आली होती. तथापि, कतारच्या अमीरांनी पुढाकार घेऊन या अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. हे सर्व अधिकारी आता भारतात सुखरुप परतले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी अमीरांचे आभार मानले आहेत. दुबई येथे दोन्ही नेत्यांची काही महिन्यांपूर्वी भेट झाली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अधिकाऱ्यांच्या सुटकेचा विषयही काढला होता. त्याला मान देऊन अमीरांनी या अधिकाऱ्यांची सुटका करण्याचा निर्णय घेतला होता.
कतारचा द्वितीय दौरा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा कतारचा द्वितीय दौरा आहे. भारत हा कतारमध्ये उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूचा मोठा ग्राहक आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने कतारशी मोठ्या रकमेचा वायू खरेदी करार केला आहे. भारताचा विकास झपाट्याने होत असून विकासाचा वेग स्थायी राखण्यासाठी त्याला मोठ्या प्रमाणात स्वच्छ इंधनाची आवश्यकता आहे. कतार हे इंधन पुरवू शकतो. कतारमध्ये अनेक भारतीय तंत्रज्ञ आणि उच्चशिक्षित काम करीत असून ते त्यांचे ज्ञान आणि प्रयत्नांच्या आधारावर त्या देशाच्या भरभराटीला हातभार लावत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांना एकमेकांच्या सहकार्याची आवश्यकता आहे, असे तज्ञांचे मत आहे.
रात्री उशिरा भारतात आगमन
तीन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरात आणि कतारच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरुवारी रात्री उशिरा भारतात आगमन झाले आहे. हा दौरा अनेक अर्थांनी यशस्वी झाल्याची प्रतिक्रिया त्यांनी एक्स या समाजमाध्यमावर व्यक्त केली. दौरा फलद्रूप झाल्याचे त्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केले आहे.