भारत-कतार महत्त्वाची पात्रता फुटबॉल लढत आज
वृत्तसंस्था/ डोहा
फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठीच्या पात्र फेरीतील भारताचा कतार बरोबरचा सामना येथे मंगळवारी होणार आहे. या सामन्यात सुनील छेत्रीच्या गैरहजेरीत भारतीय फुटबॉल संघाची सत्वपरीक्षा राहिल. 39 वर्षीय सुनील छेत्रीने गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्षेत्रातून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. त्याने आपला निवृत्तीपूर्वीचा शेवटचा सामना गेल्या आठवड्यात कोलकाता येथे कुवेत विरुद्ध खेळला होता. हा सामना गोलशून्य बरोबरीत राहिला होता. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 9.15 वाजता सुरु होईल.
भारतीय संघाचा माजी कर्णधार सुनील छेत्रीने आपल्या वैयक्तिक फुटबॉल कारकिर्दीत 151 आंतरराष्ट्रीय सामन्यातून 94 गोल नोंदविले आहेत. तब्बल 10 वर्षांच्या या कारकिर्दीमध्ये छेत्रीने विविध संघांविरुद्धच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दर्जेदार कामगिरी केली. आता भारतीय फुटबॉल संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी 32 वर्षीय गोलरक्षक गुरुप्रीतसिंग संधूकडे सोपविण्यात आली आहे. सध्याच्या भारतीय फुटबॉल संघातील संधू हा सर्वात अनुभवी फुटबॉलपटू आहे. येथील जेसीम बीन हमाद स्टेडियममध्ये मंगळवारी भारत आणि आतापर्यंत दोन वेळा आशियाई चॅम्पियन्स ठरणारा कतार यांच्यातील मंगळवारचा सामना अटीतटीचा होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेमध्ये कतारने यापूर्वीच तिसऱ्या फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली आहे. तर भारताला तिसऱ्या फेरीत स्थान मिळविण्यासाठी मंगळवारच्या सामन्यात विजयाची नितांत गरज आहे. या गटात भारत 5 गुणासह दुसऱ्या स्थानावर आहे. पण अफगाणनेही समान 5 गुण मिळविले असले तरी त्यांनी सरस गोल सरासरीत भारताला मागे टाकले आहे.