भारत आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभेद्य आघाडी घेण्यास सिद्ध
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी टी20 आंतरराष्ट्रीय लढत आज येथे होणार असून यावेळी अभेद्य आघाडी घेण्याचे भारतीय संघाचे ध्येय असेल. तसेच शैलीदार तिलक वर्माला संघातील स्थान गमवावे लागण्याची शक्यता असून त्यापूर्वी दर्जेदार खेळी करण्याची संधी त्याला मिळेल. कारण श्रेयस अय्यर, ज्याला विश्वचषकाच्या अंतिम फेरीनंतर एका आठवड्याची विश्रांती देण्यात आली होती, तो ऋतुराज गायकवाडकडून उपकर्णधारपदाची जबाबदारी घेत रायपूर आणि बेंगळूर येथे होणार असलेल्या शेवटच्या दोन सामन्यांसाठी संघात सामील होईल. अय्यर आल्यानंतर तो वर्माची जागा घेण्याची दाट शक्यता आहे.
लागोपाठच्या सामन्यांत प्रभावी फलंदाजी केल्यानंतर नवीन दमाचा भारतीय संघ पारंपारिकपणे फलंदाजीस पोषक राहिलेल्या येथील बारसापारा स्टेडियमच्या खेळपट्टीवर आपली आघाडी आणखी वाढविण्याचा मनसुबा बाळगून असेल. 40 हजार प्रेक्षक त्यास उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. त्यांना प्रतिभावान भारतीय फलंदाजी विभाग धावांची मेजवानी देईल अशी अपेक्षा आहे. या फलंदाजांनी दोन सामन्यांमध्ये एकत्रितपणे 36 चौकार आणि 24 षटकार फटकावलेले आहेत.
ऑस्ट्रेलियाचे स्टीव्ह स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस आणि अॅडम झॅम्पा यासारखे काही वरिष्ठ खेळाडू भारतात नऊ आठवड्यांपासून आहेत आणि त्यांचा थकवा दिसत आहे. त्यांच्या पुढील स्पर्धेपूर्वी त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. हे चौघेही पुढच्या महिन्यात बिग बॅश लीगमध्ये खेळणार आहेत. स्मिथसाठी पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका ही त्याची पुढील आंतरराष्ट्रीय स्पर्धा असेल.
भारताच्या वरच्या फळीतील यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी प्रभावी कामगिरी करताना प्रत्येकी अर्धशतक नोंदविलेले आहे. विश्वचषकात राखीव खेळाडूसाठीच्या बाकांवर जवळपास साडेपाच आठवडे घालवूनही इशान किशनवर त्याचा परिणाम झाल्याची कसलीच चिन्हे दिसून आलेली नसून त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. रिंकू सिंगने दोन उत्कृष्ट खेळीसह फिनिशर म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे आणि टी20 विश्वचषकापूर्वी फलंदाजीच्या क्रमवारीतील सहावे स्थान आपल्यासाठी निश्चित करण्याच्या मार्गावर तो आहे.
तथापि, भारताच्या मागील सर्व 12 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळलेला तिलक वर्मा अडचणीच्या स्थानावर आहे. कारण तो पाचव्या क्रमांकावर येत असून गेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला फक्त 12 चेंडूंचा सामना करता आलेला आहे. पहिल्या सामन्यात 209 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना त्याने 10 चेंडूंत दोन चौकारांसह 12 धावा केल्या. रविवारी तिऊवनंतपुरम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात त्याला भारतीय डावातील शेवटच्या दोन चेंडूंचा तेवढा सामना करता आला. कारण रिंकूला त्याच्या पुढे बढती देण्यात आली होती. रायपूरमधील पुढच्या सामन्यात अय्यर येण्यापूर्वी कर्णधार सूर्यकुमार स्वत: फलंदाजीच्या क्रमवारीत एक स्थान खाली येऊन तिलक वर्माला अधिक चेंडू खेळण्याची संधी देतो का हे पाहावे लागेल.
भारतीय गोलंदाजांनी मालिकेतील शुभारंभी सामन्यात 208 धावा दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यात चांगली कामगिरी केली. पहिल्या दोन्ही सामन्यांत निर्धाव चेंडूंची संख्या 45 आणि 44 अशी जवळपास सारखीच राहिली आहे. तिऊवनंतपुरममध्ये दव पडलेल्या परिस्थितीत कमी प्रमाणात दिलेले चौकार ही भारतीय गोलंदाजी विभागाच्या बाबतीत दिसून आलेली लक्षणीय सुधारणा आहे. पहिल्या सामन्यात 24 चौकार खावे लागल्यानंतर त्याच भारतीय माऱ्याने पुढच्या सामन्यात ही संख्या अर्ध्यावर आणली.
विशाखापट्टणममध्ये जोस इंग्लिस आणि स्टीव्ह स्मिथ यांनी भरपूर धावा फटकावल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या स्पेलमध्ये तीन बळी घेत जोरदार पुनरागमन केले. तथापि, ऑस्ट्रेलियासमोर 235 धावांचे मोठे लक्ष्य असल्याने कृष्णावर यावेळी दबाव नव्हता. अगदी अर्शदीप सिंगनेही शेवटच्या षटकांमध्ये तुलनेने चांगली कामगिरी केली.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उपकर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान, मुकेश कुमार.
ऑस्ट्रेलिया : मॅथ्यू वेड (कर्णधार), एरॉन हार्डी, जेसन बेहरेनडॉर्फ, सीन अॅबॉट, टिम डेव्हिड, नॅथन एलिस, ट्रेव्हिस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, तन्वीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉइनिस, केन रिचर्डसन, अॅडम झॅम्पा.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा. थेट प्रक्षेपण : जिओ सिनेमा, स्पोर्ट्स 18, कलर सिनेप्लेक्स.