भारत 6-जी नेटवर्कमध्ये जागतिक नेतृत्व करण्यास सक्षम
दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत 6 जी नेटवर्कच्या क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्यासाठी वचनबद्ध आहे. rदेशाच्या दूरसंचार क्षेत्राला ‘जलद गतीने वाढण्यासाठी 6 जी सेवा ‘महत्त्वाकांक्षी’ राहणार असल्याचे दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी मंगळवारी सांगितले. ते इंडिया मोबाइल काँग्रेस आणि वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन (डब्लूटीएसए) 2024 च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
भारताने 4 जी मध्ये जगाचे अनुसरण केले, आम्ही 5 जीमध्ये जगाच्या पुढे गेलो, पण आम्ही 6 जीमध्ये जगाचे नेतृत्व करणार असल्याचेही सिंधिया यांनी म्हटले आहे. 5 जी सेवा भारतात सर्वात जलद गतीने सुरू करण्यात आली. अवघ्या 21 महिन्यांच्या कालावधीत 98 टक्के जिल्हे आणि 90 टक्के गावांमध्ये ही सेवा पोहचल्याची माहितीही यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी बोलताना दिली.
देशाला अग्रेसर बनवणार
मंत्री म्हणाले, ‘हे लक्षात घेण्याजोगे आहे की इंडिया मोबाइल काँग्रेस आणि आंतरराष्ट्रीय 6 जी सिम्पोजियम 6 जी मध्ये स्थानिक आणि जागतिक प्रगती दर्शविते. ‘भारतातील विकासासाठी इतर क्षेत्रांप्रमाणेच, दूरसंचार क्षेत्रही झपाट्याने वाढत आहे आणि महत्त्वाकांक्षी आहे आणि अमृतकाल ते शताब्दी काळ या आमच्या प्रवासात जगाचे नेतृत्व करण्याचे उद्दिष्ट आहे’ असेही मंत्री सिंधिया यांनी स्पष्ट केले.