खो खो वर्ल्ड कपमध्ये भारत-पाक सलामीची लढत
13 जानेवारीपासून स्पर्धेची सुरुवात, दिल्ली-नोएडात होणार सामने
नवी दिल्ली
पुढील वर्षी जानेवारीत भारतात होणाऱ्या पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत यजमान भारताची सलामीची लढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकविरुद्ध 13 जानेवारी रोजी होणार असल्याचे स्पर्धा आयोजकांनी जाहीर केले.
आठवडाभर होणाऱ्या या स्पर्धेत 24 देशांनी सहभाग निश्चित केला आहे. या स्पर्धेतील सामने दिल्लीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियम व नोएडा इनडोअर स्टेडियम येथे खेळविले जातील. ‘लीगच्या सामन्यांना 13 जानेवारीपासून प्रारंभ होईल. स्पर्धेचा उद्घाटन सोहळा झाल्यानंतर भारत-पाक यांच्यातील प्रारुष संघांचा रोमांचक सामन्याने स्पर्धेला सुरुवात होईल,’ असे खो खो वर्ल्ड कपचे सीईओ विक्रम देव डोग्रा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यानंतर 14, 15, 16 रोजी उर्वरित साखळी सामने होतील. उपांत्यपूर्व फेरीचे सामने 17 जानेवारीस, उपांत्य लढती 18 जानेवारीस आणि अंतिम लढत 19 जानेवारीस खेळविली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
भारताच्या 60 पुरुष व 60 महिला खो खो पटूंचे राष्ट्रीय शिबिर येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर घेतले जात आहे. याच खेळाडूंमधून पुरुष व महिला संघांची निवड केली जाणार आहे. बॉलीवूड मेगास्टार सलमान खान याची या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बॅसेडर म्हणून निवड केली असल्याचे खो खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व स्पर्धा संयोजन समितीचे प्रमुख सुधांशू मित्तल यांनी सांगितले.
सहभाग निश्चित केलेल्या संघांत अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, ब्राझील यांचा समावेश आहे. खाखळी व बाद पद्धतीने स्पर्धेतील सामने खेळविले जाणार आहेत. आशियाई देशात इंडोनेशिया फक्त महिला संघ पाठवणार आहे तर अन्य देश महिला व पुरुष असे दोन्ही संघ पाठवणार आहेत. या स्पर्धेत एकूण 615 खेळाडू व 125 साहायक स्टाफ यांचा सहभाग असणार आहे. प्रत्येक संघात 15 खेळाडू, एक प्रशिक्षक, एक व्यवस्थापक व आंतरराष्ट्रीय टेक्निकल अधिकारी असतील.