भारत-पाक लढत 15 फेब्रुवारी रोजी
टी-20 विश्वचषक स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर, 7 फेब्रुवारीपासून भारतात स्पर्धेस प्रारंभ
वृत्तसंस्था/ मुंबई
पुढील वर्षी भारत व लंकेत होणाऱ्या पुरुषांच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत व पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांची लढत 15 फेब्रुवारी रोजी कोलंबोत होईल. मंगळवारी या स्पर्धेचे वेळापत्रक आयसीसीने येथे जाहीर केले.
आशिया चषक स्पर्धेनंतर पुन्हा एकदा दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. आशिया चषक स्पर्धेवेळी दोन्ही संघांत तीनदा गाठ पडली आणि तिन्ही वेळेस भारताने विजय मिळविला होता. अंतिम सामन्यानंतर ट्रॉफी देण्यावरूनही बरेच नाट्या रंगले आणि ती ट्रॉफी अद्यापही भारताला मिळालेली नाही.
या वेळापत्रकानुसार भारत व पाकिस्तान यांच्या गटात अमेरिका, नामिबिया व नेदरलँड्स संघांचाही समावेश आहे. या स्पर्धेतील भारताची मोहिम 7 फेब्रुवारी रोजी अमेरिकाविरुद्धच्या सामन्याने मुंबईत सुरू होईल. या स्पर्धेचा हा पहिलाच दिवस असेल. त्यानंतर 12 फेब्रुवारी रोजी नामिबियाविरुद्ध दिल्लीत सामना झाल्यानंतर गटातील शेवटचा सामना अहमदाबाद येथे नेदरलँड्सविरुद्ध होईल. गट साखळी फेरीत एका दिवशी तीन सामने खेळविले जाणार आहेत. 7 फेब्रुवारी ते 8 मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. पाकिस्तानने भारतात खेळण्यास नकार दिलेला असल्याने त्यांचे सर्व सामने लंकेतील कोलंबो किंवा कँडी येथे होतील. स्पर्धेच्या फॉरमॅटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून 20 संघांची चार गटात विभागणी करण्यात आली आहे. प्रत्येक गटात एकूण पाच संघ असतील.
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर एट फेरीत खेळतील. भारताने सुपरएट फेरी गाठल्यास त्यांचे तीनही सामने अहमदाबाद, चेन्नई, कोलकाता येथे खेळविले जातील आणि जर भारताने उपांत्य फेरी गाठल्यास त्यांचा सामना मुंबईत खेळविला जाईल. दुसरा उपांत्य सामना कोलकाता किंवा कोलंबो (पाक किवां लंका संघ पात्र ठरल्यास) येथे घेतला जाईल. अंतिम सामना अहमदाबादमध्ये घेतला जाईल आणि जर पाक पात्र ठरल्यास हा सामना लंकेत होऊ शकेल. या स्पर्धेत भाग घेतलेल्या अन्य संघांत अफगाण, ऑस्ट्रेलिया, बांगलादेश, इंग्लंड, द.आफ्रिका, अमेरिका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, आयर्लंड, कॅनडा, इटली, नेदरलँड्स, नामिबिया, पाकिस्तान, झिम्बाब्वे, नेपाळ, ओमान, संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे. भारत या स्पर्धेचा विद्यमान विजेता असून 2024 मध्ये बार्बाडोस येथे झालेल्या स्पर्धेत द.आफ्रिकेला हरविले हेते