भारत, पाक हॉकी संघ एकाच गटात
वृत्तसंस्था /लॉसेनी
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2025 च्या कनिष्ठ पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचा ड्रॉ शनिवारी लॉसेनीत काढण्यात आला. या ड्रॉनुसार पारंपरिक प्रतिस्पर्धी यजमान भारत आणि पाक यांचा ब गटात समावेश करण्यात आला आहे.
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनची कनिष्ठ पुरुषांची विश्वचषक हॉकी स्पर्धा भारतात भरविली जाणार आहे. सदर स्पर्धा 28 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान चेन्नई आणि मदुराई येथे होणार आहे. भारतात ही स्पर्धा पहिल्यांदाच भरविली जात असून एकूण 24 संघांचा यामध्ये समावेश आहे. 2023 साली झालेल्या कनिष्ठ पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेचे जेतेपद जर्मनीने पटकाविताना अंतिम सामन्यात फ्रान्सचा 2-1 असा पराभव केला होता. जर्मनीने ही स्पर्धा आतापर्यंत विक्रमी सातवेळा जिंकली आहे.
शनिवारी काढण्यात आलेल्या ड्रॉनुसार अ गटात जर्मनी, द. आफ्रिका, कॅनडा, आयर्लंड, ब गटात यजमान भारत, पाक, चिली आणि स्वीस, क गटात अर्जेंटिना, न्यूझीलंड, जपान, चीन, ड गटात स्पेन, बेल्जियम, इजिप्त, नामीबिया, इ गटात नेदरलँड्स, मलेशिया, इंग्लंड, ऑस्ट्रीया, फ गटात फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, द. कोरिया, बांगलादेशचे समावेश आहे. सदर स्पर्धा मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्यात येणार असून या स्पर्धेसाठी मदुराईमध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध असे सुसज्ज हॉकी स्टेडियम राहील., अशी माहिती हॉकी इंडियाचे सचिव भोलानाथ सिंग आणि सरसंचालक आर. के. श्रीवास्तव यांनी दिली.