‘चॅम्पियन्स’मधील भारत-पाक ‘हाय-व्होल्टेज’ लढत आज
विजयी सुरुवातीमुळे रोहित शर्माचा संघ उत्साहात, तर किवींविरुद्ध हरलेला पाक दबावाखाली
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज रविवारी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ‘हाय व्होल्टेज’ सामना रंगणार आहे. रोहित शर्माचा संघ त्यातून उपांत्य फेरीतील स्थान निश्चित करण्याचे लक्ष्य ठेवेल, तर मोहम्मद रिझवानचा संघ स्पर्धेतून लवकर बाहेर पडू नये म्हणून प्रयत्न करेल. बांगलादेशवर सहा गड्यांनी विजय मिळवल्याने भारताची कामगिरी उंचावली आहे, तर स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडविऊद्ध 60 धावांनी पराभूत झाल्याने पाकिस्तान तणावाखाली आहे.

या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा शेवटचा चॅम्पियन्स ट्रॉफी सामना 2017 मध्ये झाला होता, ज्यामध्ये पाकिस्तान विजय होऊन त्यांना चषक मिळाला होता. रिझवान अँड कंपनी लंडनमधील त्या विजयापासून प्रेरणा घेण्याचा प्रयत्न करेल, परंतु त्याकरिता त्यांना प्रत्येक विभागात त्यांची कामगिरी वाढवावी लागेल. या दोन्ही देशांमधील राजनैतिक तणाव शिखरावर असताना जशी त्यांच्यातील सामन्याबद्दल चर्चा व्हायची तशी चर्चा सध्या नसली, तरी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणाऱ्या गट ‘अ’मधील या सामन्याची उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे.
भारताला प्रत्येक बाबतीत एक वेगळी अनुकूलता असेल. भारत येथे चांगलाच स्थिरावला आहे, तर कराचीमध्ये न्यूझीलंकडून पराभूत व्हावे लागल्यानंतर दोन दिवसांपूर्वी पाक संघ येथे पोहोचला आहे. बहुतेकदा भारत-पाकिस्तान सामना हा तणावपूर्ण असतो आणि रविवारी दुपारी सामना सुरू होईल तेव्हा निश्चितच भारताचे पारडे जड असेल. कर्णधार रोहितचा फॉर्म स्पर्धेपूर्वी एक प्रमुख चिंतेचा विषय होता. बांगलादेशविऊद्धच्या खेळीने तो सुरात येत असल्याचे दिसून आले आहे. त्या सामननतील 229 धावांच्या कठीण पाठलागात त्याच्या 41 धावांचे योगदान महत्त्वपूर्ण होते.
त्या सामन्यात शुभमन गिलने त्याचे आठवे एकदिवसीय शतक कुशलतेने साकारले. याउलट पाकिस्तान त्यांचा सर्वांत मोठा स्टार बाबर आझमचा फॉर्म आणि दृष्टिकोनाबद्दल चिंतेत असेल. 320 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडविऊद्ध 90 चेंडूंत त्याने केलेली 64 धावांची खेळी ही खूपच संथ असल्याने त्याच्यावर टीका झाली आहे. आवश्यक धावगती वाढत असतानाही वेग वाढविण्याच्या बाबतीत बाबरची असमर्थता ही नजरेत भरली असून भारताविऊद्ध तो प्रचंड दबावाखाली असेल.
सामन्याचे रूप पालटू शकणारा सलामीवीर फखर झमान दुखापतीमुळे संघातून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी इमाम उल हकने संघात स्थान मिळवले आहे आणि तो येथे संघात सामील झाला आहे. मधल्या फळीतील फलंदाज खुशदिल शाहने स्पर्धेच्या सुऊवातीच्या सामन्यात 69 धावांची केलेली आक्रमक खेळी ही त्यांच्यासाठी एक सकारात्मक बाजू आहे. कराची, लाहोर आणि रावळपिंडी येथे या स्पर्धेतील सामने आयोजिण्यात आले असून भारताने पाकिस्तानात जाण्यास नकार दिलेला असल्याने पाकिस्तान संघ त्यांच्यावर येथे वर्चस्व गाजविण्यास उत्सुक असेल.
भारतीय संघाच्या बाबतीत विराट कोहली पुन्हा एकदा चांगली सुऊवात करण्यात अपयशी ठरला आहे. त्याचे लक्ष काही काळापासून पूर्वीसारखे दिसत नाही, परंतु कोहलीकडे पाकिस्तानविऊद्ध विशेष प्रयत्न करण्याची क्षमता आहे. दुसरीकडे, शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखालील माऱ्याला दाद न देता किवी संघाने केलेल्या जोरदार फटकेबाजीमुळे पाकिस्तानला विचारात पाडलेले असेल. या आघाडीवर भारताकडे तंदुऊस्त आणि फॉर्ममध्ये असलेला मोहम्मद शमी आहे आणि त्याला हर्षित राणा उत्तम साथ देत आहे. बांगलादेशविऊद्ध शमीने मिळविलेल्या पाच बळींमुळे भारताला दुखापतग्रस्त जसप्रीत बुमराहची उणीव भासली नाही.
अष्टपैलू हार्दिक पंड्या नेहमीच आयसीसीच्या प्रमुख स्पर्धांमध्ये पाकिस्तानविऊद्ध सर्वोत्तम कामगिरी करत आला आहे. 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात तो भारतातर्फे लढलेला एकमेव योद्धा ठरला होता, परंतु संघाला विजय मिळवून देण्यात तो अपयशी ठरला होता. भारत त्यांच्या विजयी संघात बदल करण्याची शक्यता नाही. कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकी त्रिकुटाला पुन्हा एकदा अनुकूल परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी खेळविण्यात येईल हे स्पष्ट आहे.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, वरुण चक्रवर्ती.
पाकिस्तान : मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान अली आगा (उपकर्णधार), बाबर आझम, फखर जमान, कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, फहीम अश्रफ, खुशदिल शाह, उस्मान खान, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी.
सामन्याची वेळ : भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वा.