आशिया चषकासाठी भारत - पाक आज पुन्हा आमनेसामने
नवव्यांदा चषक जिंकण्याच्या निर्धाराने टीम इंडिया मैदानात उतरणार : अभिषेकच्या कामगिरीकडे नजरा
वृत्तसंस्था/ दुबई
जिंकणे म्हणजे सर्वस्व नसले, तरी आज रविवारी आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पाकिस्तानचा पुन्हा एकदा सामना करताना 11 भारतीय क्रिकेटपटूंच्या मनात फक्त हाच विजयाचा विचार असेल. कारण मैदानावरील खेळ आणि मैदानाबाहेरील राजकारण यांच्यातील रेषा अस्पष्ट झाली आहे. अमेरिकी राजकीय कार्यकर्ते आणि लेखक माइक मार्क्युसी यांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास हे गोळीबार विरहीत युद्धच आहे.
गेल्या काही वर्षांत या स्पर्धेत कधीही उत्साहाची कमतरता भासलेली नाही, परंतु क्वचितच असे अस्थिर वातावरण पाहायला मिळालेले आहे, ज्यात क्रिकेट मैदानाबाहेरील तणाव, प्रक्षोभक हावभाव आणि दोन्ही गटांवर लादलेले दंड यांनी भर घातलेली आहे. तरीही या गोंधळाच्या पलीकडे क्रिकेटचे स्वत:च आकर्षण कायम राहिले आहे. अभिषेक शर्माचा धाडसी 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट आणि कुलदीप यादवने पुनरागमनात केलेले 13 बळी ही त्याची मुख्य वैशिष्ट्यो आहेत. दुर्दैवाने या कामगिरीलाही अनेकदा तणावपूर्ण क्षण आणि भांडणांनी झाकोळून टाकलेले आहे.
याची सुरुवात भारताच्या हस्तांदोलन न करण्याच्या धोरणाने झाली. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेकीच्या वेळी आणि सामन्यानंतर त्याकडे पाठ फिरवली. त्यानंतर पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हरिस रौफने टोमणे, अर्वाच्य भाषा आणि विमान पडल्याचे हावभाव करून प्रत्युत्तर दिले, ज्यामुळे वादळ निर्माण झाले. यामुळे दोन्ही संघांना आयसीसीच्या चौकशीखाली आणण्यात आले आणि 30 टक्के दंड ठोठावण्यात आला. अंतिम फेरीपर्यंत हे वातावरण कायम राहिले आहे. आगीत तेल ओतताना पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी, जे पाकिस्तान क्रिकेट मंडळ आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे प्रमुख देखील आहेत, ते त्यांच्या ‘एक्स’ टाइमलाइनवर सतत चिथावणीखोर पोस्ट टाकत आलेले आहेत.
कागदावर पाहता भारत स्पर्धेत अपराजित राहिलेला आहे. त्यांनी सलग सहा विजय मिळविलेले असून केवळ श्रीलंकेने त्यांना सुपर ओव्हरपर्यंत खेचले. याउलट पाकिस्तान अडखळत अंतिम फेरीत पोहोचला आहे. बांगलादेशला हरवल्यानंतर त्यांचे मुख्य प्रशिक्षक माइक हेसन यांनी रागाने नमूद केले की, फायनल हा एकमेव सामना आहे जो महत्त्वाचा आहे. या सामन्यात पूर्वीची कामगिरी फारशी महत्त्वाची नाही. भारताच्या सपोर्ट स्टाफनेही हीच भावना व्यक्त केली आहे. गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांनीही मान्य केले आहे की, विजय कसाही मिळविला, तरी तो शेवटी विजय आहे.
सूर्याच्या फॉर्मविषयी चिंता
दरम्यान, सूर्यकुमारने स्वत: एक जबरदस्त खेळी अजून करायची आहे. शुभमन गिलला सामना संपविता आलेला नाही आणि संजू सॅमसन व तिलकसारख्या खेळाडूंनी फक्त फारसे महत्त्व नसलेल्या सामन्यांमध्ये, जसे की श्रीलंकेविऊद्ध, चमक दाखविलेली आहे. आतापर्यंत पॉवरप्लेमध्ये अभिषेकने जबरदस्त धडाका लावलेला आहे. जर तो एकदा अपयशी ठरला, तर काय होईल हा प्रश्न सतावतो. संपूर्ण स्पर्धेत भारताची बाकीची फलंदाजी अजिबात तेवढी खात्रीशीर दिसलेली नाही आणि जर वरची फळी कोसळली, तर पर्यायी योजना काय आहे ते कोणालाही माहिती नाही.
पाकिस्तानची फलंदाजी डगमगती
जर भारत अभिषेकवर जास्त अवलंबून असेल, तर पाकिस्तानच्या नाजूक फलंदाजीची त्याहून अधिक बिकट परिस्थिती आहे. स्पष्टपणे सांगायचे तर, त्यांची फलंदाजी अत्यंत खराब आहे. जसप्रीत बुमराहला काही काळ अस्वस्थ केलेला साहिबजादा फरहान वगळता अन्य कोणताही फलंदाज भक्कम दिसलेला नाही. अभिषेकच्या तोडीस तोड खेळाडू म्हटल्या गेलेल्या सैम अयूबने एका भयानक मोहिमेचा सामना केला असून त्याला चार वेळा खातेही उघडता आले नाही. एका टप्प्यावर धावांपेक्षा त्याने बळी जास्त मिळविलेले होते. हुसेन तलत आणि सलमान अली आगा हेही भारताच्या फिरकी गोलंदाजांविऊद्ध अपयशी ठरलेले आहेत. कुलदीप यादव आणि वऊण चक्रवर्ती यांच्या युक्त्या आज पुन्हा एकदा सामन्याचा निकाल ठरवू शकतात.
पाकिस्तानच्या कमकुवत आशा नवीन चेंडूने कशी कामगिरी केली जाते त्यावर अवलंबून आहेत. जर शाहीन शाह आफ्रिदी आणि हरिस रौफ भारताच्या वरच्या फळीला लवकर उद्धवस्त करू शकले, तर कमी धावसंख्या पाहायला मिळू शकते. परंतु अभिषेकवर भारत जसा अतिप्रमाणात अवलंबून आहे त्याचप्रमाणे शाहीन आणि हरिस यांनाही साथीदाराची आवश्यकता आहे, ज्याची पाकिस्तानकडे कमतरता आहे. रविवारचा सामना चांगल्या गोष्टींसाठी कमी आणि निकालावरून जास्त लक्षात ठेवला जाऊ शकतो.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन, हर्षित राणा, रिंकू सिंग.
पाकिस्तान : सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अश्रफ, फखर जमान, हरिस रौफ, हसन अली, हसन नवाज, हुसेन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस, मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहिबजादा फरहान, सैम अयुब, सलमान मिर्झा, शाहीन आफ्रिदी, सुफयान मोकीम.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.
आशिया चषकाच्या 41 वर्षाच्या इतिहासात प्रथमच आमनेसामने
आशिया कपच्या 41 वर्षांच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत एकमेकांसमोर येण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये आतापर्यंत एकूण 15 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाने 11 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने फक्त 3 सामने जिंकले आहेत. शिवाय, एका सामन्यात बरोबरी देखील झाली आहे. यंदाच्या स्पर्धेत दोन्ही संघत तीनवेळा आमनेसामने आले. या तीनही सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. अर्थात, आजच्या सामन्यात भारतच बाजी मारेल यात शंकाच नाही.
हार्दिक, अभिषेकच्या तंदुरुस्तीविषयी चिंता
भारताची अपराजित वाटचाल सुरळीत राहिलेली आहे, परंतु ती दुखापतमुक्त नाही. श्रीलंकेविऊद्ध हार्दिक पंड्या हॅमस्ट्रिंगच्या भीतीने एका षटकानंतर मैदानाबाहेर पडला, तर अभिषेक शर्मालाही आखातातील कडक उन्हात पेटके आले. शनिवारी हार्दिकची तपासणी केली जाईल. त्याला आणि अभिषेकलाही पेटके आले. पण अभिषेक ठीक आहे, असे मॉर्केलनी शुक्रवारी रात्री सांगितलेले आहे. पंजाबच्या डावख्रुया फलंदाजाने सहा सामन्यांमध्ये 309 धावा करून भारताच्या फलंदाजीचा भार एकट्याने उचललेला असल्याने ही बातमी दिलासादायक आहे. त्याच्याखालोखाल सर्वोत्तम 144 ही धावसंख्या तिलक वर्माची आहे. पाकिस्तानचा दिग्गज खेळाडू वसीम अक्रमने इशारा देताना पाकिस्तानने अभिषेक शर्मास लवकर परत पाठविण्याची गरज आहे, असे सांगितले आहे. भारतीय फलंदाजी सध्या अभिषेकभोवती फिरत असताना भारताचे इतर खेळाडू कितपत जम बसवू शकतात हा खरा प्रश्न आहे.