यू-19 वर्ल्ड कपमध्ये भारताची सलामी अमेरिकेशी
स्पर्धेस झिम्बाब्वे व नामिबियामध्ये 15 पासून प्रारंभ
वृत्तसंस्था/दुबई
पुढील वर्षी जानेवारीत होणाऱ्या पुरुषांच्या यू-19 वर्ल्ड कप स्पर्धेत भारताची सलामीची लढत अमेरिकेविरुद्ध होणार आहे. झिम्बाब्वे व नामिबिया येथे होणारी ही स्पर्धा 15 जानेवारी ते 6 फेब्रुवारी या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेत एकूण 16 संघांनी भाग घेतला असून त्यांचे गट करण्यात आले आहेत. प्राथमिक फेरीत 23 दिवसांत 41 सामने होणार आहे. भारताचा अ गटात समावेश असून याच गटात अमेरिका, बांगलादेश व न्यूझीलंड यांचाही समावेश आहे. गट ब मध्ये झिम्बाब्वे, पाकिस्तान, इंग्लंड, स्कॉटलंड, गट क मध्ये विद्यमान विजेता ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, जपान व लंका,
गट ड मध्ये टान्झानिया, वेस्ट इंडीज, अफगाणिस्तान, दक्षिण आफ्रिका या संघांचा समावेश आहे. आयसीसीने या स्पर्धेचे वेळापत्रक बुधवारी आपल्या वेबसाईटवर जाहीर केले आहे. या स्पर्धेत टान्झानियाने पदार्पण केले असून जपानच्या पुनरागमन झाले आहे. जपानने यापूर्वी 2020 च्या आवृत्तीत भाग घेतला होता. भारताचा सलामीचा सामना 15 जानेवारी रोजी अमेरिकाविरुद्ध होईल. त्यानंतर बांगलादेश, न्यूझीलंडविरुद्धचे सामने 17 व 24 जानेवारी रोजी होतील. भारताचे प्राथमिक फेरीतील सर्व सामने क्वीन्स स्पोर्ट्स क्लब बुलावायो येथे खेळविले जातील. प्रत्येक गटातील पहिले तीन संघ सुपर सिक्स फेरीत खेळतील.