भारत ब्रिटनच्या सुरक्षित देशांच्या यादीत
अवैध प्रवेश करणाऱ्या नागरिकांवर पडणार प्रभाव
वृत्तसंस्था/ लंडन
भारताला सुरक्षित देशांच्या यादीत सामील करणार असल्याची घोषणा ब्रिटन सरकारने केली आहे. यामुळे भारतातून अवैध स्वरुपात प्रवास करत ब्रिटनमध्ये पोहोचणाऱ्या लोकांना मायदेशी परत पाठविण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. तसेच अवैध स्वरुपात अन्य मार्गांनी येणाऱ्या भारतीय नागरिकांच्या आश्रयाच्या अर्जांना अस्वीकारार्ह मानले जाणार आहे. यासंबंधी दाद मागता येणार नाही आणि त्यांची रवानगी मायदेशी केली जाणार आहे.
भारत आणि जॉर्जियाला सुरक्षित देशांच्या यादीत सामील करणार आहे. हा निर्णय ‘अवैध इमिग्रेशन अधिनियम 20233़ आणि नौकांना रोखण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीत आणखी एक पाऊल असणार आहे. संसदेत सादर करण्यात आलेला मसुदा कायदा इमिग्रेशन प्रणालीला मजबूत करत त्याचा गैरवापर रोखण्यास मदत करणार असल्याचे ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
ब्रिटनकडून सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अन्य देशांमध्ये अल्बानिया, स्वीत्झर्लंड, युरोपीय महासंघ सामील आहे. या देशांनी मूलभूत स्वरुपात ब्रिटनच्या दिशेने धोकादायक आणि अवैध प्रवास करण्यापासून स्वत:च्या नागरिकांना रोखायला हवे. अवैध मार्गाने ब्रिटनमध्ये येणाऱ्या लोकांना येथे वास्तव्याचा कुठलाही अधिकार नसल्याचे वक्तव्य ब्रिटनच्या गृहमंत्री सुएला ब्रेवरमॅन यांनी केले आहे.