भारत-न्यूझीलंड दुसरा वनडे आज
वृत्तसंस्था / अहमदाबाद
तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रविवारी येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर यजमान भारत आणि न्यूझीलंड महिला क्रिकेट संघातील दुसरा सामना खेळविला जाणार आहे. या सामन्याला दुपारी 1.30 वाजता प्रारंभ होईल. अष्टपैलु अॅमेलिया केर दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने तिची उणिव न्यूझीलंडला चांगलीच भासेल.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने शानदार विजय मिळवून न्यूझीलंडवर आघाडी घेतली आहे. आता भारतीय महिला संघ मालिका सीलबंद करण्यासाठी सज्ज झाला आहे. स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाला सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करावी लागेल. मात्र मानधना फलंदाजीचा सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये गेल्या सामन्यात पदार्पण करणारी तेजल हसबनीस केवळ 8 धावांवर बाद झाली होती. पहिल्या सामन्यात तंदुरुस्तीच्या समस्येमुळे खेळू न शकणारी कर्णधार हरमनप्रित कौर रविवारच्या सामन्यासाठी उपलब्ध राहिल. न्यूझीलंडच्या अष्टपैलु अॅमेलिया केरला पहिल्या सामन्यात खेळताना स्नायु दुखापत झाली होती. या दुखापतीवर वैद्यकीय इलाज करुन घेण्यासाठी ती मायदेशी रवाना होत आहे. भारतीय महिला संघाने या मालिकेतील पहिला सामना 59 धावांनी जिंकला होता. रविवारच्या सामन्यात नाणेफेकीचा कौल महत्त्वाचा ठरेल.