For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारत-नेदरलँड्स हॉकी लढत आज

06:58 AM Feb 21, 2024 IST | Tarun Bharat Portal
भारत नेदरलँड्स हॉकी लढत आज
Advertisement

दुसऱ्या टप्प्यातही डचवर विजय मिळविण्याचा भारताचा निर्धार

Advertisement

वृत्तसंस्था/ रूरकेला

आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो-लिग पुरूषांच्या हॉकी स्पर्धेत बुधवारी येथे यजमान भारत आणि बलाढ्या नेदरलँड्स यांच्यात महत्त्वाचा सामना खेळविला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारतीय संघाने समाधानकारक कामगिरी केली असल्याने त्यांच्याकडून विजयी घोडदौड कायम राहिल, अशी अपेक्षा आहे. भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील हा परतीच्या फेरीतील सामना आहे.

Advertisement

हरमनप्रित सिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने आतापर्यंत या स्पर्धेत निर्धारित वेळेत 5 पैकी 2 सामने जिंकले आहेत. तर नेदरलँड्स आणि स्पेन यांचा पेनल्टी शुटआउटमध्ये पराभव करत महत्त्वाचे बोनस गुण मिळविले आहेत. मात्र या स्पर्धेत भारताला एकमेव सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला आहे. या स्पर्धेच्या गुणतक्त्यात भारत सध्या 5 सामन्यातून 10 गुणासह चौथ्या स्थानावर आहे. नेदरलँड्सचा संघ 9 सामन्यातून 18 गुणासह पहिल्या स्थानावर असून अर्जेंटिना 8 सामन्यातून 13 गुणासह दुसऱ्या तर ऑस्ट्रेलिया 4 सामन्यातून 12 गुणासह तिसऱ्या स्थानावर आहे.

बुधवारच्या सामन्यात भारतीय संघ निर्णायक विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. भारतीय हॉकी संघ सध्या जागतिक मानांकनात तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र त्यांना या स्पर्धेतील गेल्या दोन सामन्यात विजयासाठी चांगलेच झगडावे लागले. 12 वा मानांकित आयर्लंड आणि आठवा मानांकित स्पेनने भारताला कडवी झुंज दिली होती.

भारत आणि आयर्लंड यांच्यातील सामन्यात भारताने शेवटच्या मिनिटाला निर्णायक गोल नोंदवून विजय मिळविला. हा एकमेव गोल गुर्जंत सिंगने केला होता. तर स्पेन विरुद्धच्या सामन्यात भारताने पेनल्टी शुटआउटमध्ये आपला विजय नोंदविला. या सामन्यात दोन्ही संघ निर्धारित 60 मिनिटांच्या कालावधित 2-2 असे बरोबरीत होते. त्यानंतर पेनल्टी शुटआउटमध्ये भारताने स्पेनचे आव्हान 8-7 असे संपुष्टात आणले. गोलरक्षक श्रीजेशने पेनल्टी शुटआउटमधील स्पेनचा एक फटका अडविला. पेनल्टी शुटआउटमध्ये भारतातर्फे हरमनप्रित सिंग, सुखजित सिंग, ललीत उपाध्याय, अभिषेक आणि राजकुमार पाल यांनी गोल केले.

या लढतीमध्ये जर्मनप्रित सिंगने पहिल्याच मिनिटाला भारताचे खाते उघडले. त्यानंतर जोस बॅस्टेराने तिसऱ्या मिनिटाला स्पेनला बरोबरी साधून दिली. 15 व्या मिनिटाला बोर्जा लेकेलीने स्पेनला आघाडीवर नेले. मध्यंतरापर्यंत स्पेनने भारतावर 2-1 अशी आघाडी घेतली होती. 35 व्या मिनिटाला अभिषेकने भारताचा दुसरा गोल करुन स्पेनशी बरोबरी साधली.

2024 च्या प्रो-लिग हॉकी स्पर्धा मोहिमेला भारताने भुवनेश्वरमध्ये विजयाने प्रारंभ करताना स्पेनचा 4-1 असा पराभव केला होता. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात भारताने नेदरलँड्सचा पेनल्टी शुटआउटमध्ये 4-2 असा पराभव करत या स्पर्धेतील दुसरा विजय नोंदविला. मात्र तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 6-4 अशा गोलफरकाने पराभव केला. या पराभवानंतर भारताने पुन्हा मुसंडी मारताना आयर्लंडवर 1-0 अशी मात केली. स्पेनवर सोमवारच्या सामन्यात विजय मिळविल्याने भारतीय संघाचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. मात्र बुधवारच्या सामन्यात भारताला पेनल्टी कॉर्नरवर अधिक लक्ष द्यावे लागले.

Advertisement
Tags :

.