बांगलादेशचा मलेशियावर 114 धावांनी विजय
सामनावीर’ मुर्शिदा खातून, कर्णधार निगार सुलताना यांची अर्धशतके
वृत्तसंस्था/डंबुला
मुर्शिदा खातुन आणि कर्णधार निगर सुलताना यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर येथे बुधवारी खेळविण्यात आलेल्या आशिया चषक महिलांच्या टी-20 क्रिकेट स्पर्धेतील ब गटातील सामन्यात बांगलादेशने मलेशियाचा 114 धावांनी दणदणीत पराभव केला. 59 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 80 धावा झळकविणाऱ्या मुर्शिदा खातुनला ‘सामनावीर’ म्हणून घोषित करण्यात आले.
या स्पर्धेतील हा आकरावा सामना आहे. या सामन्यात बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 191 धावा जमविल्या. त्यानंतर बांगलादेशने 20 षटकात 8 बाद 77 धावापर्यंत मजल मारल्यामुळे त्यांना हा सामना मोठ्या फरकाने गमवावा लागला.
बांगलादेशच्या डावामध्ये मुर्शिदा खातुन आणि दिलारा अख्तर यांनी 46 चेंडूत सलामीच्या गड्यासाठी 65 धावांची भागिदारी केली. अख्तरने 20 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 33 धावा जमविल्या. इस्माईलने तिला झेलबाद केले. कर्णधार निगर सुलतानने खातुनला चांगली साथ दिली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 89 धावांची भागिदारी केली. हंटरने खातुनला 17 व्या षटकात झेलबाद केले. कर्णधार निगर सुलताना आणि रुमाना अहम्मद यांनी तिसऱ्या गड्यासाठी अभेद्य 37 धावांची भागिदारी 18 चेंडूत नोंदविली. सुलतानाने 37 चेंडूत 2 षटकार आणि 5 चौकारांसह नाबाद 62 तर रुमाना अहम्मदने 1 चौकारासह नाबाद 6 धावा जमविल्या. बांगलादेशच्या डावात 10 अवांतर धावा मिळाल्या. मलेशियातर्फे इस्माईल आणि हंटर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
बांगलादेशने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 51 धावा जमविल्या. बांगलादेशचे अर्धशतक 36 चेंडूत, शतक 71 चेंडूत, दीड शतक 101 चेंडूत नोंदविले गेले. खातुनने आपले अर्धशतक 45 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने तर कर्णधार निगर सुलतानाने आपले अर्धशतक 34 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांच्या मदतीने झळकविले. बांगलादेशच्या डावामध्ये 4 षटकार आणि 20 चौकार नोंदविले गेले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना बांगलादेशच्या गोलंदाजीसमोर मलेशियाच्या फलंदाजांना शेवटपर्यंत फटकेबाजी करता आली नाही. इलिसा हंटरने 23 चेंडूत 4 चौकारांसह 20, जुलीयाने 25 चेंडूत 1 चौकारासह 11 तर इस्माईलने 25 चेंडूत 2 चौकारांसह 15 धावा जमविल्या. मलेशियाच्या केवळ 3 फलंदाजांनी दुहेरी धावसंख्या गाठली. त्यांच्या डावात 8 चौकार नोंदविले गेले. मलेशियाने पॉवरप्ले दरम्यानच्या 6 षटकात 26 धावा जमविताना दोन गडी गमविले. मलेशियाचे अर्धशतक 81 चेंडूत नोंदविले गेले. बांगलादेशतर्फे नाहीदा अख्तरने 13 धावांत 2 तर जहाँआरा आलम, जस्मिन, रबिया खान, रिटू मोनी आणि शोमा अख्तर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. या सामन्यात बांगलादेशला 2 गुण मिळविले.
संक्षिप्त धावफलक: बांगलादेश 20 षटकात 2 बाद 191 (दिलारा अख्तर 33, मुर्शिदा खातुन 80, निगार सुलताना नाबाद 62, रुमाना अहम्मद नाबाद 6, अवांतर 10, इस्माईल आणि हंटर प्रत्येकी 1 बळी), मलेशिया 20 षटकात 8 बाद 77 (हंटर 20, जुलिया 11, इस्माईल 15, अवांतर 8, नाहिदा अख्तर 2-13, आलम, जस्मिन, रबिया खान, मोनी, शोमा अख्तर प्रत्येकी 1 बळी).