भारत-नेपाळ फुटबॉल संघ आज आमनेसामने
सॅफ यू-19 फुटबॉल चॅम्पियनशिप : गटातील अग्रस्थानासाठी दोन्ही संघांत चुरस
वृत्तसंस्था/ युपिया, अरुणाचल प्रदेश
सॅफ यू-19 फुटबॉल चॅम्पियनशिपची उपांत्य फेरी निश्चित झाली असल्याने गट ब अग्रस्थान मिळविण्यासाठी मंगळवारी भारत नेपाळविरुद्ध विजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. याशिवाय भूतान व मालदिव यांचीही लढत होणार आहे.
भारताने लंकेचा पहिल्या सामन्यात 8-0 असा धुव्वा उडविला तर रविवारी नेपाळने लंकेवर 5-0 असा पराभव केला. या निकालामुळे भारत व नेपाळचे उपांत्य फेरीतील स्थानही निश्चित झाले होते. मंगळवारी भारताला गटात अग्रस्थान मिळविण्यासाठी सामना अनिर्णीत राखण्याची गरज आहे. ‘दोन्ही संघांनी त्यांचे पहिले सामने मोठ्या फरकाने जिंकले, पण ते फारसे महत्त्वाचे नाही. प्रत्येक सामना हा वेगळा असतो आणि नेपाळ हा संघ जोरदार लढत देणारा आणि बलवान असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे,’ भारतीय संघाचे प्रशिक्षक बिबियानो फर्नांडेस म्हणाले. ‘आम्ही त्यांच्या खेळाचे विश्लेषण केले असून तो एक सुनियोजित संघ आहे. मात्र आम्ही आमच्या ताकदीवर, पूर्ण लक्ष केंद्रित करून सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न करू,’ असेही ते म्हणाले.
मोठ्या फरकाने विजय मिळविल्याने हुरळून न जाण्यावरही त्यांनी जोर दिला. ‘मोठा विजय मिळविल्यानंतर जमिनीवर राहणे जास्त महत्त्वाचे आहे. हाच जोम व विजयाची हीच भूक बलाढ्या संघांविरुद्ध दाखविण्यात खरी कसोटी असते. एकावेळी फक्त एकाच सामन्याचा विचार, आत्मसंतुष्ट न राहणे आणि प्रतिस्पर्धी कसाही असला तरी त्यांचा आदर करणे, हा आमचा उद्देश आहे आणि अशाच मार्गाने संघ म्हणून आम्ही विकसित होत आहोत,’ असेही ते म्हणाले.
नेपाळ संघात यू-20 व यू-17 संघातील खेळाडूंचे मिश्रण आहे. सॅफ यू-20 चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी उपविजेतेपद मिळविले तर सॅफ यू-17 स्पर्धेत त्यांनी उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. उपांत्य फेरीत त्यांना भारताने 4-2 असे हरविले होते. उर्जन श्रेष्ठा यांच्या मार्गदर्शनाखाली सॅफ एज ग्रुप स्पर्धेत त्यांनी सर्वात मोठा विजय मिळविला. लंकेविरुद्धच्या सामन्यात त्यांनी उत्तरार्धात शानदार प्रदर्शन केले होते. यजमान भारताविरुद्ध कठीण आव्हान असल्याने श्रेष्ठा यांचा जोरदार तयारी करीत आहे.
‘पूर्वार्धात लंकेचा बचाव भेदणे कठीण जात होते. कारण त्यांचे दहाही खेळाडू चेंडूच्या मागे असायचे. पण शेवटी आम्ही त्यांचा बचाव भेदण्यात यशस्वी झालो, याचा आम्हाला खूप आनंद आहे. आम्ही भारताचा सामना पाहण्यासाठी आलो होतो. त्यात खूप मोठा फरक दिसून आला. आम्ही उपांत्य फेरीत स्थान मिळविले असल्याने आम्ही भारताला जोरदार टक्कर देऊ. पहिल्या सामन्यातील चुकांत सुधारणा करून आगेकूच करण्याचा आमचा प्रयत्न असेल,’ असेही नेपाळचे कोच म्हणाले.
बांगलादेशने गट अ मधील सामन्यात भूतानचा 3-0 असा पराभव करून शेवटच्या चारमधील स्थान निश्चित केले. बांगलादेशचा पहिला सामना मालदिवविरुद्ध 2-2 असा बरोबरीत राहिला होता. प्रत्येक गटातील पहिले दोन संघ उपांत्य फेरीत खेळणार असून बांगलादेशला गटात दुसरे स्थान मिळू शकतो. मंगळवारी भूतान व मालदिव यांच्यातही सामना होणार असून उपांत्य फेरी गाठण्यासाठी भूतानला विजय आवश्यक आहे.