भारताला आज रनरेटसह विजय आवश्यक
वृत्तसंस्था/ दुबई
2024 च्या आयसीसी महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बुधवारी येथे भारत आणि लंका यांच्यात अ गटातील सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होत आहे. या सामन्यात भारताला मोठ्या फरकाने विजय मिळविणे आवश्यक आहे. गेल्या दोन सामन्यात भारतीय महिला संघासमोर फलंदाजीची समस्या चांगलीच भेडसावत असल्याचे चित्र पहावयास मिळते. भारतीय संघाला दमदार फलंदाजी करुन बुधवारच्या सामन्यात सरस रनरेटसह विजयाची गरज आहे.
या स्पर्धेतील झालेल्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंडकडून भारताला 58 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. तर त्यानंतर पाक विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात भारताचा डाव 18.5 षटकात 105 धावांत आटोपला होता. भारतीय गोलंदाजांनी या सामन्यात दमदार कामगिरी करत विजय खेचून आणला. भारतीय संघातील सलामीची फलंदाज तसेच उपकर्णधार स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांच्या समोर फलंदाजीची समस्या भेडसावत असल्याचे जाणवते. शेफालीने पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे 2 आणि 32 धावा जमविल्या तर स्मृती मानधनाने 12 आण 7 धावा केल्या होत्या. आता बुधवारच्या सामन्यात या दोघी फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा बाळगली जात आहे. भारताची मधली फळी म्हणावी तशी मजबूत वाटत नाही. कर्णधार हरमनप्रित कौरने पहिल्या सामन्यात 15 धावा तर पाक विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात तिने 29 धावा जमविल्या. पण दुखापतीमुळे तिला मैदान सोडावे लागले होते. जेमीमा रॉड्रीग्ज, दिप्ती शर्मा आणि रिचा घोष यांच्याकडूनही फलंदाजीत योगदान मिळणे जरुरीचे आहे. भारतीय संघातील वेगवान गोलंदाज रे•ाrने पाक विरुद्धच्या सामन्यात 3 गडी बाद केले होते. रेणूका सिंग आणि पूजा वस्त्रकर यांच्याकडून तिला साथ लाभणे आवश्यक आहे. दुखापतीमुळे पूजा वस्त्रकर पाक विरुद्धच्या सामन्यात खेळू शकली नव्हती. श्रेयांका पाटील, आशा शोभना आणि दिप्ती शर्मा यांच्यावरच भारतीय फिरकी गोलंदाजीची मदार राहिल.
लंकन संघाला केवळ पराभूत करणे पुरेसे नाही. या स्पर्धेतील आपले आव्हान जिंवत ठेवण्यासाठी भारतीय संघाला आपला रनरेट चांगला राखून मोठ्या फरकाने जिंकणे आवश्यक आहे. कारण भारतीय संघाचा प्राथमिक फेरीतील शेवटचा सामना बलाढ्या विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाबरोबर 13 ऑक्टोबरला होणार आहे. लंकन संघाने गेल्या ऑगस्ट महिन्यात आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात भारताचा पराभव करत विजेतेपद मिळविले होते. कर्णधार चमारी अट्टापटूची खेळी महत्त्वाची आणि निर्णायक ठरली होती. या पराभवाची परतफेड करण्याची संधी हरमनप्रित कौरच्या भारतीय संघाला बुधवारच्या सामन्यात मिळणार आहे. पण फलंदाजीची त्रुटी तसेच सांघिक कामगिरी भारताच्या दृष्टिने महत्त्वाची राहिल.
भारत संघ: हरमनप्रित कौर (कर्णधार), स्मृती मानधना, शेफाली वर्मा, दिप्ती शर्मा, रॉड्रिग्ज, रिचा घोष, यास्तीका भाटिया, वस्त्रकर, अरुंधती रे•ाr, रेणूकासिंग ठाकुर, हेमलता, आशा शोभना, राधा यादव, श्रेयांका पाटील आणि एस. सजीवन.
लंका संघ: व्ही. गुणरत्ने, हर्शिता समरविक्रमा, एच. परेरा, अनुष्का संजीवनी, निलाकशिखा सिल्वा, चमारी अट्टापटू (कर्णधार), कविशा दिलहारी, ए. कांचन, प्रियदर्शनी, एस. गिमहानी, कुलसुर्या, सुगंधीका कुमारी, सचिनी निशानसेला, प्रबोदिनी आणि रणवीरा.
सामन्याची वेळ सायंकाळी 7.30 वा.