भारत-मंगोलिया मैत्रीसंबंध अधिक भक्कम
भारत आणि मंगोलिया या दोन देशातील आध्यात्मिक आणि सांस्कृतिक संबंधाने आता नवी उंची गाठली आहे आणि विशेषत: भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गतवर्षी मंगोलियाला भेट दिली. त्यानंतर यावर्षी मंगोलीयाचे राष्ट्रपती उखनागीन खुरेलसुख यांनी भारताला भेट दिली आणि या भेटीदरम्यान दहा सामंजस्य करारावर सह्या करण्यात आल्या, त्यामुळे या दोन्ही लोकशाही राष्ट्रांमध्ये विकास भागीदारीचे एक नवे महापर्व उदयास आले आहे. या मैत्रीचे भू राजनैतिक तसेच सामाजिक आर्थिक आणि सांस्कृतिक संदर्भ आहेत हे सर्व पैलू उलगडले असता आपणास उभय देशातील मैत्रीचा सुवर्णबंध कसा भक्कम झाला आहे ते समजू शकते.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अवाच्या सव्वा कर लादल्यानंतर त्याची पर्वा न करता भारताने अनेक आशियाई व आफ्रिकन देशांशी मैत्री करार करण्याचा सपाटा लावला आहे. त्यातच मंगोलियाशी झालेले दहा करार हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा होय.
दोन्ही देशांमधील करारांचा गोषवारा घेतला असता असे दिसते की युरेनियम पुरवठा तसेच 1.7 अब्ज डॉलर्सचा तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि उभय देशातील विस्तारित संरक्षण करार ही एक महत्त्वपूर्ण उपलब्धी होय. त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला पुढील घोडदौड करण्यासाठी नवा मार्ग खुला झाला आहे.
मंगोलिया खनिज संपत्तीने समृद्ध राष्ट्र आहे. या देशांमध्ये असलेले तांबे, सोने तसेच कुकिंग कोळसा आणि युरेनियमचा साठा हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांमध्ये विज्ञान-तंत्रज्ञान तसेच संशोधनाने विस्ताराच्याबाबतीत यामुळे एक नवे दालन खुले झाले आहे. तसेच भारतासाठी आवश्यक अशा खनिजे संपत्तीची उपलब्धता झाल्यामुळे नवी पुरवठा साखळी अधिक मजबूत होणार आहे.
नवे संकल्प नव्या दिशा
अठराव्या शतकामध्ये तिबेटमधील बौद्ध धर्म प्रसारक भिक्षूंनी तेथे बौद्ध विचारांचा मोठ्या निष्ठेने प्रसार केला आणि प्राचीन काळात तेथे सखोल रुजलेल्या बौद्धपरंपरेचे पुनरुज्जीवन केले. मध्यंतरी इस्लामच्या प्रसारामुळे येथे बौद्ध धर्माच्या प्रसाराला जो लगाम बसला होता तो त्यांनी मोठ्या कुशलतेने दूर केला. आज मंगोलियामध्ये सुमारे 55 टक्के बौद्ध धर्माचे अनुयायी आहेत. त्यांचे तेथील समाजकारणावर आणि राजकारणावर चांगले प्रभुत्व आहे. पंतप्रधान मोदी यांनी गतवर्षी जेव्हा मंगोलियाला भेट दिली तेव्हा त्यांनी तेथील बौद्ध धर्माच्या लेणी समूहाला आणि स्तूपांना भेट दिली होती आणि तेथे पूजाअर्चाही केली होती. त्यांच्या या विलक्षण धम्म पूरकदृष्टीमुळे मंगोलियातील बौद्ध समुदाय पुन्हा प्राचीन भारताकडे वळला आहे. एक संपन्न धम्मराष्ट्र म्हणून मंगोलिया भारताकडे पहात आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दूरदृष्टीमुळे आता भारत मंगोलियास 2026 मध्ये भगवान गौतम बुद्धाचे दोन शिष्य सारी पुत्त आणि मोगली पुत्र यांचे पवित्र अवशेष मंगोलियास पाठविणार आहे. त्याचा मोठा उत्सव तेथील लोकसमुदाय साजरा करतील आणि भारत मंगोलिया यांच्यातील मैत्री पुन्हा नव्या उंचीवर पोहोचेल.
भारत मंगोलियातील प्रसिद्ध गंदन मठात एक संस्कृत शिक्षक पाठवून तेथील प्राचीन साहित्याचा अभ्यास करण्यासाठी नवे दालन खुले करत आहे. मंगोलियातील दहा लाख प्राचीन हस्तलिखितांचे डिजिटलायझेशन करण्याचा संकल्प करण्यात आला आहे आणि हे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. प्राचीन काळात नालंदा विद्यापीठाने मंगोलिया बौद्ध धर्म प्रसारामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. आताच्या परिस्थितीत भारताने नालंदाला गंदन मठाशी जोडून ही ज्ञानपरंपरा पुन्हा एकदा भक्कम केली आहे. विकास परिषद लढा स्वायत्त टेकडी विकास परिषद आणि मंगोलियाचा आरखंगाईक प्रांत यांच्या दरम्यान झालेला सामंजस्य करार हा बौद्ध संस्कृतीच्या अभ्यासासाठी सुद्धा वरदान ठरणार आहे.
मंगोलियामध्ये तेथील अभ्यासकांना संस्कृत भाषा शिकविण्यासाठी भारत एका शिक्षकाला एक वर्षाकरिता पाठविणार आहे आणि मंगोलियातील गंदन मठ येथे उपस्थित राहून हे आचार्य संस्कृत आणि पाली भाषेतील धर्मविचार समजावून सांगतील आणि साहित्याची पाळेमुळे समजावून सांगतील आणि तेथील साहित्याचा त्यामुळे अधिक सखोल अभ्यास होऊ शकेल.
विश्वासार्ह भागीदार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटल्याप्रमाणे जरी मंगोलिया हा भारताचा सीमावरती देश नसला तरीही एक विश्वासार्ह मित्र आहे, विकासाचा भागीदार आहे आणि समान आध्यात्मिक, सांस्कृतिक जागृतीचा साक्षीदार आहे. दोन्ही देश दक्षिण ध्रुव प्रदेशातील राष्ट्रांच्या समस्या सोडवून ग्लोबल साउथचे ऐक्य मजबूत करण्यासाठी आपला आवाज बुलंद करणार आहेत. या चळवळीस मंगोलियाने भारताला सदैव सक्रिय सहकार्य केले आहे. दहशतवादाविरुद्धच्या सामुदायिक लढाईत लोकशाही मूल्य बळकट करण्यासाठी दोन्ही राष्ट्रांनी यथायोग्य संकल्प केला आहे. मंगोलियाकडून भारताला तांबे, सोने, चांदी तसेच जस्त या धातूंची उपलब्धता होणार आहे. आणखी एक महत्त्वाची बाब अशी की मंगोलियाकडे 90 हजार टन युरेनियम साठा उपलब्ध आहे. नुकताच मंगोलियाने फ्रान्सबरोबर 2500 टन युरेनियम पुरवठ्याबाबत करार केला आहे. आता भारतालासुद्धा या दुर्मिळ धातूची उपलब्धता झाल्यामुळे अनेक महत्त्वाचे प्रश्न आणि संशोधनासाठी आवश्यक सामग्री उपलब्ध होणार आहे.
ऊर्जा प्रकल्पांचे महत्त्व
भारत मंगोलिया दरम्यान झालेल्या करारामध्ये ऊर्जा प्रकल्पाचे विशेष महत्त्व आहे. खास करून 1.7 अब्ज डॉलर्सचा हा प्रकल्प 2018 मध्ये प्रत्यक्षात सुरू होईल तेव्हा 1.5 दशलक्ष टन तेल दरवर्षी उपलब्ध होईल, त्याचा अर्थ असा की दररोज सुमारे 30000 बॅरल एवढे तेल. विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हा भारताने उभा केलेला एक सर्वात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प आहे आणि या प्रकल्पात 2500 भारतीय आणि मंगोलियन काम करत आहेत. ही एक मोठी उपलब्धी असेल.
संरक्षण कराराचे महत्त्व
भारत मंगोलिया यांच्यातील सामंजस्य करारामध्ये संरक्षण हा एक महत्त्वाचा पैलू आहे. भारत मंगोलियाची राजधानी उलानबातर येथे एक उच्चस्तरीय संरक्षण अधिकारी पाठविणार आहे. तसेच उभय राष्ट्रांमध्ये महत्त्वपूर्ण लष्करी सराव प्रशिक्षण कार्यक्रमही हाती घेतले जाणार आहेत. दोन्ही देश विविध प्रकारच्या वैशिष्ट्यापूर्ण लष्करी सरावावर भर देत आहेत व उभय राष्ट्रामध्ये शिक्षण आणि मनुष्यबळ विकास यालाही महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळे आयसीसीआर या संस्थेच्यावतीने आठ मंगोलियन विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना भारतामध्ये प्रशिक्षण दिले जाणार आहे. सध्या चालू असलेल्या आयटीईसी प्रशिक्षण योजनेत 70 सदस्यांची वाढ केली जाणार आहे. त्याचाही मंगोलियन तरुणांना लाभ होईल. मंगोलियाने भारताची सदैव बाजू घेतली आहे. विशेष करून सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्य मिळावे म्हणून मंगोलियाने आग्रह धरला आहे. तसेच 2028-29 मध्ये रिक्त पदावर भारताच्या अस्थायी सदस्य संकल्पनेत सुद्धा सक्रिय पाठिंबा दिला आहे.
सांस्कृतिक पर्यटनाला गती
भारतामधील बौद्ध पर्यटन स्थळांना भेट देण्याची मंगोल लोकांची तीव्र इच्छा लक्षात घेऊन भारताने तेथील नागरिकांसाठी मोफत ई व्हिसा प्रदान करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे असंख्य मंगोल नागरिक भारतातील बौद्ध पर्यटन स्थळांना भेट देतील तसेच भारतीयांना सुद्धा तेथे जाऊन तेथील सांस्कृतिक जीवनाचा आनंद घेता येणे शक्य होईल. उभय देशात लोक संपर्क वाढवण्यासाठी आणि सांस्कृतिक बंध मजबूत करण्यासाठी याबाबत झालेला सामंजस्य करार अत्यंत महत्त्वाचा आहे.
अटल बिहारी वाजपेयी आयटी सेंटर ऑफ एक्सलन्स आणि भारत मंगोलिया फ्रेंडशिप स्कूल या दोन संस्थांच्या माध्यमातून दोन्ही देशातील मैत्रीचा बंध अधिक भक्कम केला जात आहे. मंगोलियातील सामान्य लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे विकास प्रकल्प तेथील लोकांच्या भल्यासाठी सुद्धा वरदान ठरतील. कृषी, दुग्ध व्यवसाय तसेच सहकार या क्षेत्रातसुद्धा दोन्ही देशात महत्त्वपूर्ण भागीदारीला गती देण्यात आली आहे. त्यामुळे भारतीय तज्ञांना सुद्धा मंगोलियात जाऊन मार्गदर्शन करता येणे शक्य होईल. भारत मंगोलिया दरम्यान मैत्री संबंधांची ही सत्तर वर्षे आहेत तसेच रचनात्मक भागीदारीची दहा वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने विशेष टपाल तिकिटाचे प्रकाशन करण्यात आले आहे. मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्ष महोदयांनी महात्मा गांधींच्या समाधीचे दर्शन घेऊन आदरांजली वाहिली आणि मंगोलियन लोकांच्यावतीने बापूंच्याविषयी आदरभाव व्यक्त केला. उभय देशांनी हे सांस्कृतिक संबंध एका नव्या उंचीवर घेऊन जाण्याचा केलेला संकल्प महत्त्वाचा आहे. दहा नवे सामंजस्य करार म्हणजे मैत्रीचे दहा प्रकाशमान दीप आहेत. अष्टदीप भव हा बुद्धाचा संदेश जणू या मैत्री कराराने नव्याने प्रकाशमान झाला आहे.
- प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर