भारत-मालदीव मैत्री : मैत्रीच्या क्षितिजावरील नवा सूर्योदय
मालदीवसमोर आर्थिक संकटांचा डोंगर उभा असताना चीनने काढता पाय घेतला परंतु भारत मात्र एक विश्वासू मित्र या नात्याने मालदीवच्या पाठीशी उभा राहिला. त्यामुळे मालदीवने भारतीय नेत्यांचे न भूतो न भविष्यती स्वागत केले. हिंद प्रशांत सागर क्षेत्राच्या स्थैर्याच्या दृष्टीने आणि चीनला प्रतिशह देण्याच्या दृष्टीने हा एक निर्णायक टप्पा होय.
शेजारी प्रथम हे सूत्र घेऊन भारताने सर्व सार्क राष्ट्रांशी मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित केले आहेत. केवळ थोरल्या भावाची भूमिका नव्हे तर या राष्ट्राशी बरोबरीशी आणि सन्मानाने वागवून त्यांना त्यांच्या विकासकार्यात महत्त्वपूर्ण भागीदारी प्रदान करण्याचे भारताचे धोरण आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात शांतता स्थैर्य आणि समृद्धीची पहाट घडवून आणण्यासाठी भारताचे हे धोरण वरदान ठरले आहे. विशेषत: सबका साथ सबका विकास हे अंतर्गत धोरण भारताने आपल्या शेजारी राष्ट्रांच्याबाबतीत सुद्धा काटेकोरपणे अमलात आणले आहे. भारत-मालदीव संबंध हे याच सूत्राचे एक मौलिक उदाहरण होय. गेल्या साठ वर्षांमध्ये भारताने मालदीवशी राजकीय संबंध मजबूत करताना या सूत्राच्या आधारे या हिंदसागर क्षेत्रातील देशाच्या सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक विकासात भारताने महत्त्वपूर्ण वाटा उचलला आहे. पायाभूत संरचना तसेच पर्यावरण बदलाचे प्रश्न तसेच तेथील शिक्षण, आरोग्य, निवास, वाहतूक दळणवळण यासारख्या अनेक प्रश्नांची सोडवणूक करण्यात भारताने प्राधान्याने समर्थ व सशक्त भूमिका बजावली आहे. अंतर्गत रस्ते असो, शाळांची बांधणी असो की विमानतळाचा विकास असो या सर्व बाबतीत भारताने टाकलेली पावले मैत्री व सहकार्याचा आदर्श प्रस्थापित करणारी आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दोन दिवसांचा मालदीव दौरा त्यामुळे विशेष महत्त्वाचा आहे. मुक्त व्यापार कराराच्या दिशेने पावले टाकली जात आहेत तसेच भारताने मालदीवला 72 अवजड वाहने प्रदान केली आहेत. राजकीय संबंधात वस्तुनिष्ठतेला महत्त्व असते. भारताने कुठल्याही भावनिक समस्यांना माध्यमांच्या दबावाला आणि टीकेला बळी न पडता ठोस निर्णय घेतले व ते कृतीमध्ये आणले ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. चार सामंजस्य करार आणि तीन द्वीपक्षीय सहकार्याचे करार ही एक मोठी उपलब्धी आहे. माले विमानतळावर मोदी यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. त्यांना तोफांची सलामी देण्यात आली तसेच नव्याने बांधलेल्या संरक्षण इमारतीवर त्यांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. या यू टर्नची जादू कशात असेल तर भारताने केलेल्या भक्कम सकारात्मक सहकार्यात आहे. मालदीवच्या कुठल्याही संकटसमयी पहिल्यांदा कोण धावून गेला असेल तर भारत होय.
कसा झाला बदल
मागील सर्वसाधारण निवडणुकीत डॉक्टर मोहम्मद मुईझु यांनी इंडिया आऊटचा नारा दिला होता. त्यानंतर काही काळ वादळ निर्माण झाले परंतु त्यांना आलेला चीनचा कटू अनुभव पाहता त्यांनी आपले धोरण लिलया बदलले आणि भारताविषयी नकारात्मक नव्हे तर सकारात्मक भूमिका घेतली. त्यांच्या या रचनात्मक भूमिकेचे प्रतिबिंब या दौऱ्यामध्ये प्रामुख्याने दिसून आले. या दौऱ्याच्या काळात भारताने मालदीवला 4260 कोटी रुपयांचे क्रेडिट लाईन कर्ज मंजूर केले आहे. शिवाय मागील कर्जाचा परतावा करण्यासाठी कालावधीही वाढवून दिला आहे. शेजारी देश जेव्हा आर्थिक संकटात सापडतात तेव्हा नुसते गोड बोलणारा चीन काही कामाला येत नाही. उलट तत्काळ आणि योग्य मदत मिळते ती भारताकडून म्हणजेच प्रेमळ अशा थोरल्या भावाकडून. त्यामुळे सार्क आणि हिंदसागर क्षेत्रातील देश भारताच्या बाजूने भक्कमपणे उभे आहेत. बोलावे तसे करावे या न्यायाने भारताने सक्रिय सहकार्याचे धोरण अनुसरले आहे. राबविलेले विकास प्रकल्प असोत की भविष्यकालीन योजना असोत. त्यांच्या अंमलबजावणीच्या बाबतीत भारताचा दृष्टिकोन प्रामाणिक, सात्विक आणि तेवढाच प्रांजळ असा आहे.
कोणत्याहीबाबतीत भारताने अशी विकासकामे करताना नाटकीपणा दाखवला नाही किंवा उगाचच खोटे श्रेय घेतलेले नाही. भारत आणि चीन यांच्या मदतीमध्ये हाच खरा फरक आहे. भारत बोलतो तसे करतो आणि दिलेला शब्द पाळतो पण चीन मात्र मोठ्या मोठ्या गोष्टी, वल्गना करतो आणि प्रत्यक्षात मात्र हातावर तुरी देऊन पसार होतो. यामुळे श्रीलंका, मालदीव, नेपाळ, भूतान यासारखी राष्ट्रे चीनच्या कटू अनुभवापासून धडे घेऊन सुधारत आहेत. याचा प्रत्यय मालदीव दौऱ्यातून आला आहे. इंडिया आऊट म्हणणाऱ्या डॉक्टर मुईझु यांना अखेर भारताची मदत घ्यावी लागली आणि मालदीवच्या प्रत्येक संकटसमयी भारत धावून येतो हे त्यांना मान्य करावे लागले. मालदीवच्या साठाव्या स्वातंत्र्यदिनी त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड केली यातच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे यश सामावलेले आहे. परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी अत्यंत योग्य ती पावले टाकून याबाबतीत सकारात्मक वातावरण तयार केले आहे, ही गोष्ट विशेषत्वाने नमूद केली पाहिजे. मालदीवमधील भारताचे राजदूत सुब्रमण्यम आणि परराष्ट्र सचिव मिस्त्राr यांच्या निवेदनातील सारांश हे सांगतो की भारताच्या सकारात्मक आणि विकास प्रेरक योजनांमुळे चित्र बदलले आहे आणि भारत मालदीव मैत्रीच्या क्षितिजावर नवा सूर्योदय घडून आला आहे.
भारत आणि मालदीव संबंधात यू टर्न कसा आला आणि बदल कसे घडून आले याचा अभ्यास करता असे दिसते की भारताने प्रदान केलेले विकास प्रकल्प हे या बदलाचे खरे रहस्य होय. नकारात्मक वातावरणाचे रूपांतर सकारात्मक स्थितीमध्ये करणे अवघड होते पण त्यात भारताला जबरदस्त यश आले ते कठीण प्रयत्नांमुळे आणि चिकाटीने. आजवर केलेले प्रयत्न हे भविष्यकाळात निरंतर सहकार्याची हमी व ग्वाही देणारे असतील.
महत्त्वाचे विकास प्रकल्प
मालदीव हे बेटराष्ट्र संपूर्णपणे भारताच्या पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. भारतीय पर्यटक मालदीवला दरवर्षी 20 लाखांपेक्षा अधिक संख्येने भेट देतात. भारतीय पर्यटक जितके अधिक संख्येने मालदीवला जातील तेवढे अधिक प्रमाणात मालदीवचा आर्थिक विकास होतो. परंतु मध्यंतरी मालदीवच्या नेत्यांनी केलेल्या उलट सुलट विधानामुळे काही वर्षांपूर्वी भारतीय पर्यटकांनी मालदीवर जणू बहिष्कार टाकला होता.
आता डॉक्टर मुईझु यांनी आपले धोरण बदलले आणि भारतापुढे मैत्रीचा हात केला. त्यामुळे भारतीय पर्यटकसुद्धा आता मालदीवकडे भेट देण्यासाठी उत्सुक झालेले आहेत. मालदीवच्या विकासामध्ये रस्ते दळणवळण, हवाई वाहतूक तसेच शाळा आरोग्य आणि सुरक्षा हे महत्त्वाचे प्रश्न आहेत. या सर्व प्रश्नांच्या पूर्ततेसाठी भारताने घेतलेला पुढाकार अत्यंत महत्त्वाचा आहे. अलीकडे मालदीवमध्ये भारताच्या मदतीने तेथील मध्यम उत्पन्न गटातील गरिबांसाठी 3400 घरे भारताने बांधून दिली आहेत.
या घरांमध्ये राहणारे मालदीवमधील लोक भारताविषयी कमालीचे कृतज्ञ आहेत तसेच अलीकडे जागतिक हवामान बदलामुळे मालदीवमधील शेती आणि उद्योगाला अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. याबाबत भारताने संशोधन आणि विकासाच्या बाबतीत अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले आहेत. सर्व हिंद प्रशांत क्षेत्रातील देशांसाठी भारतामध्ये शिखर शिष्यवृत्ती देण्याची योजना आहे. मालदीवमध्ये महाविद्यालयीन व विद्यापीठ शिक्षण नसल्यामुळे तेथे आठव्या नवव्या व दहाव्या वर्गात शिकणाऱ्या मुलांसाठी सुद्धा शिष्यवृत्ती देण्याचे भारताने ठरविले आहे. शिवाय मालदीवमधील अनेक तरुण महाविद्यालय व विद्यापीठ शिक्षण घेण्यासाठी भारतामध्ये येतात. त्यांनाही भारत मार्गदर्शन आणि सहाय्य करत आहे. मालदीवचे भविष्य बदलावयाचे असेल तर तरुणांच्या जीवनात क्रांती होणे आवश्यक आहे आणि हा तरुण वर्ग सुशिक्षित कसा होईल, उद्योजक कसा होईल आणि तो स्वत:च्या पायावर कसा उभा राहील यावर भारताने भर दिला आहे.
कुठल्याही विकसनशील राष्ट्रात पायाभूत सुविधांचा विकास फार महत्त्वाचा असतो. जोपर्यंत पायाभूत सुविधांचा विकास भक्कमपणे होत नाही तोपर्यंत विकासाची बैठक भक्कम होणे कठीण असते हे लक्षात घेऊन भारताने मालदीवला प्रदान असलेल्या पायाभूत सुविधांच्या योजना या चीन आणि इतर देशांपेक्षा अधिक निर्णायक अधिक ठोस आणि अधिक विकासाला गती देणारे आहेत. त्यामुळे कोणतीही विकास योजना आखताना त्याबाबतीत विचारपूर्वक दोन्ही बाजूने गांभीर्याने प्रयत्न करून पावले टाकली जातात. त्यामुळे कोणताही विकासावर केलेला खर्च वायफळ जाणार नाही याची दक्षता भारत सातत्याने घेतो. त्यामुळे आज विकासाचे चित्र बदलले आहे आणि मालदीवमध्ये शांतता व स्थैर्याची पहाट होत आहे. पर्यटन क्रांती तसेच सांस्कृतिक आदान प्रदान-लोक संपर्क हे भारत संबंधातील एक महत्त्वाचे यशसूत्र आहे ते आता विमानसेवेमुळे अधिक भक्कम होईल. हणीमानढो हे विमानतळ भारत मालदीवसाठी तयार करत आहे. भारताने मालदीवला प्रोत्साहन देण्यासाठी 565 दशलक्ष मुदत कर्ज माफक परतफेडीच्या तत्वावर दिले आहे. त्यामुळे मालदीवला आर्थिक स्थैर्य प्राप्त होईल.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर