भारत-मलेशिया हॉकी लढत आज
वृत्तसंस्था / हुलुनबुईर (चीन)
2024 च्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने आपले पहिले सलग दोन सामने जिंकले असून आता त्यांचा या स्पर्धेतील पुढील सामना बुधवारी मलेशियाबरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत आपली विजय घोडदौड कायम राखण्यावर अधिक भर देईल.
या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारताने चीनचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला. त्यानंतर दुसऱ्या साखळी सामन्यात भारताने जपानचे आव्हान 5-1 असे संपुष्टात आणले. हरमनप्रितसिंगच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीपटूंना मैदानी गोल करताना चांगलेच झगडावे लागले होते. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताने एकूण 15 गोल नोंदविले. त्यापैकी केवळ तीन मैदानी गोल नोंदविले गेले. पॅरिस ऑलिम्पिकनंतर निवृत्त झालेला अनुभवी गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने भारतीय हॉकी संघाच्या या समस्येवर भाष्य केले असून या संघातील खेळाडूंना मैदानी गोल नोंदविण्यासाठी अधिक मेहनत करवून घेणे जरुरीचे आहे, असेही तो म्हणाला. भारतीय संघाच्या बचाव फळीला निश्चितच मर्यादा असल्याने या संघातील खेळाडूंना मैदानी गोल करण्यावर अधिक भर द्यावा लागेल. दरम्यान सध्या चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत भारतीय संघामध्ये बरीच सुधारणा झाल्याचे जाणवले. पहिल्या दोन सामन्यात भारताने एकूण 8 गोल केले. त्यापैकी 5 मैदानी गोल आहेत. भारतीय संघातील सुखजीतसिंगने 3 मैदानी गोल केले. अभिषेक आणि उत्तम सिंग यांनी प्रत्येकी दोन मैदानी गोल नोंदविले. त्याच प्रमाणे आघाडी फळीतील नवोदित हॉकीपटू संजयने जमानविरुद्धच्या सामन्यात पेनल्टी कॉर्नरवर गोल केला होता. पॅरिस ऑलिम्पिकनंतर गोलरक्षक पी. आर. श्रीजेशने हॉकी क्षेत्रातून निवृत्ती घेतल्यानंतर त्याच्या जागी कृष्णन बहाद्दुर पाठक याच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पाठक आणि सुरज करकेरा हे भारतीय संघातील प्रमुख गोलरक्षक आहेत. आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेतील गुणतखत्यात भारत दोन सामने जिंकून आघाडीवर आहे. भारताने आतापर्यंत चारवेळा ही स्पर्धा जिंकली आहे. मात्र गेल्या वर्षी या स्पर्धेत उपविजेतेपद मिळविणारा मलेशियाचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. मलेशियाने आतापर्यंत 1 सामना जिंकला असून 1 सामना बरोबरीत राखला आहे. सदर स्पर्धा राऊंडरॉबीन लिग पध्दतीने खेळविली जात असून आघाडीचे चार संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. 16 सप्टेंबरला उपांत्य फेरीचे सामने तर 17 सप्टेंबरला अंतिम सामना खेळविला जाईल.