भारताचा पहिल्याच लढतीत पराभव
वृत्तसंस्था / झियामेन (चीन)
रविवारपासून येथे झालेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या सुदीरमन चषक मिश्र सांघिक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत ड गटातील पहिल्याच लढतीत डेन्मार्कने भारताचा 4-1 अशा फरकाने पराभव केला. या लढतीमध्ये भारताच्या पी. व्ही. सिंधू आणि एच. एस. प्रणॉय यांनी आपले एकेरीचे सामने गमविले.
या स्पर्धेत भारताचा ड गटात समावेश असून इंडोनेशियन आणि इंग्लंड या बलाढ्या संघाचाही या गटात सहभाग आहे. त्यामुळे भारतीय संघाला पुढील फेरीसाठी पात्रतेकरिता खूपच झगडावे लागणार आहे. या स्पर्धेत प्रत्येक लढत 5 सामन्यांची राहते. भारताने डेन्मार्क विरुद्धच्या लढतीत पहिले सलग तीन सामने गमविल्याने डेन्मार्कने भारतावर 3-0 अशी भक्कम आघाडी मिळविली होती. या स्पर्धेत अव्वल बॅडमिंटनपटू व्हिक्टर अॅक्सेलसन आणि मिया ब्लिचफेल्ट यांच्या गैरहजेरीतही डेन्मार्कचा संघ बलवान असल्याचे दिसून आले. मिश्र दुहेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या जेस्पर टॉफ्ट आणि अॅमेली मॅगेलंड यांनी भारताच्या तनिषा क्रेस्टो व ध्रुव कपिला यांचा 21-13, 21-14 असा पराभव करत आपल्या संघाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर एकेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या अॅन्टोसेनने प्रणॉयचा 21-15, 21-16 असा पराभव केला. त्यानंतर पुरुष दुहेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या किम अॅस्ट्रफ आणि अॅन्डर्स रेसमुसेन यांनी भारताच्या नवोदित ए. हरिहरन आणि रुबेनकुमार यांचा 21-7, 21-4 असा पराभव केला. डेन्मार्कने भारताच्या 3-0 अशी निविर्वाद आघाडी मिळविली. महिला एकेरीच्या सामन्यात डेन्मार्कच्या लिने किजेरफेल्टने पी. व्ही. सिंधूचा 22-20, 23-21 असा पराभव केला. महिला दुहेरीच्या सामन्यात भारताच्या तनिषा क्रेस्टो आणि श्रुती मिश्रा यांनी डेन्मार्कच्या पी. नेताजा आणि बोझे यांचा सरळ गेम्समध्ये पराभव केला. आता या स्पर्धेत भारताची पुढील लढत बलाढ्या इंडोनेशियाबरोबर मंगळवार दि. 29 एप्रिल रोजी होणार आहे. या स्पर्धेच्या इतिहासात भारताने यापूर्वी म्हणजे 2011 आणि 2017 साली उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली होती. सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी तसेच त्रिशा जॉली आणि गायत्री गोपिचंद यांना मात्र या स्पर्धेत सहभागी होता आलेले नाही.