भारतातील सर्वात लांब सागरी पूल अटल सेतूचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबईतील मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) या देशातील सर्वात लांब सागरी सेतूचे उद्घाटन करण्यात आले. अटल सेतू असे संबोधण्यात येणारा हा सेतू देशातील सर्वात मोठा पूल ठरला आहे. 21. 8 किमी लांबीचा या पुलाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्यात आले आहे.
हा अटल सेतू मुंबईतील शिवडी येथून निघून रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील न्हावा- शेवापर्यंत पोहोचतो. 17, 840 कोटी रुपये खर्चून हा पूल बांधण्यात आला आहे. या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित होते.
सहा पदरी असलेला हा ट्रान्स हार्बर पूल 21. 8 किमी लांबीचा असून त्यातील 16. 5 किमी लांबीचे सागरी अंतर आहे. या पूलाद्वारे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जलद पोहोचण्यास मदत होईल. तसेच मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास वेळ कमी करण्यासही मदत करेल. मुंबई बंदर आणि जवाहरलाल नेहरू बंदर यांच्यातील कनेक्टिव्हिटी देखील सुधारणार आहे. डिसेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुलाची पायाभरणी करण्यात आली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पूर्व मुंबईतील ईस्टर्न फ्रीवे ते दक्षिण मुंबईतील मरीन ड्राइव्हला जोडणाऱ्या भूमिगत रस्ता बोगद्याचे भूमिपूजन करण्यात आले. 9. 2 किमी लांबीचा हा बोगदा 8700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे.