महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

भारत-लंका पहिला वनडे सामना ‘टाय’

06:47 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/कोलंबो

Advertisement

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील शुक्रवारी येथे खेळविण्यात आलेला भारत-श्रीलंका यांच्यातील सलामीचा सामना (बरोबरीत) ‘टाय’ राहिला. लंकेच्या फिरकी गोलंदाजीसमोर भारताला 231 धावांचे आव्हान पार करता आले नाही.

Advertisement

पहिल्या सामन्यात सलामीचा फलंदाज निशांका आणि वेलालगे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर यजमान लंकेने भारताला विजयासाठी 231 धावांचे आव्हान दिले. लंकेने 50 षटकात 8 बाद 230 धावा जमविल्या. त्यानंतर भारताने 47.5 षटकात सर्वबाद 230 धावा जमविल्या.

भारताच्या डावामध्ये कर्णधार रोहित शर्माने कप्तानी खेळ करत 47 चेंडूत 3 षटकार आणि 7 चौकारांच्या मदतीने 58 धावा जमविताना गिलसमवेत 12.4 षटकात 75 धावांची भागिदारी केली. गिल बाद झाल्यानंतर भारताचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. गिलने 2 चौकारांसह 16, विराट कोहलीने 2 चौकारांसह 26, वॉशिंग्टन सुंदरने 1 चौकारासह 5 धावा जमविल्या. भारताची 24.2 षटकात स्थिती 5 बाद 132 अशी होती. श्रेयश अय्यर आणि के. एल. राहुल यांनी सहाव्या गड्यासाठी 57 धावांची भागिदारी केली. राहुलने 43 चेंडूत 2 चौकारांसह 31 तर अय्यरने 4 चौकारांसह 23 धावा जमविल्या. अक्षर पटेलने 57 चेंडूत 1 षटकार आणि 2 चौकारांसह 33 तर शिवम दुबेने 24 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 25 धावा जमविल्या. डावातील शेवटच्या चेंडूवर असालंकाने अर्शदीपसिंगला खाते उघडण्यापूर्वीच पायचीत केल्याने भारताचा डाव 47.5 षटकात 230 धावांत समाप्त झाला. लंकेतर्फे हसरंगा आणि असालंका यांनी प्रत्येकी 3 तर वेलालगेने 2, धनंजय व असिता फर्नांडो यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. भारताच्या डावामध्ये 6 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. भारताने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 71 धावा जमविल्या. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात 125 धावा जमविताना 6 गडी गमविले. भारताने शेवटच्या 10 षटकात 34 धावांची भर घालताना 4 गडी गमविले.

या सामन्यात लंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारताच्या शिस्तबध्द आणि अचूक गोलंदाजीसमोर लंकेच्या वरच्या फळीतील फलंदाज कोलमडल्याने त्यांना मोठी धावसंख्या रचता आली नाही. मात्र निशांका आणि वेलालगे यांच्या अर्धशतकाने लंकेने सावरले. वेलालगेचे वनडे क्रिकेटमधील हे पहिले अर्धशतक आहे. निशांकाने 75 चेंडूत 9 चौकारासह 56 तर वेलालगेने 65 चेंडूत 2 षटकार आणि 7 चौकारासह नाबाद 65 धावा झळकविल्या.

कर्णधार असालेंकाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण मोहम्मद सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर सलामीचा फलंदाज अविष्का फर्नांडो तिसऱ्या षटकात झेलबाद झाला. त्याने 1 धावा जमविली. त्यानंतर निशांका आणि कुशल मेंडीस यांनी दुसऱ्या गड्यासाठी 39 धावांची भर घातली. दुबेने कुशल मेंडीसला पायचीत केले. त्याने 1 चौकारासह 14 धावा केल्या. अक्षर पटेलने समरविक्रमला गिलकरवी झेलबाद केले. त्याने 8 धावा केल्या. कर्णधार असालेंका कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर शर्मा करवी झेलबाद झाला. त्याने 2 चौकारांसह 14 धावा जमविल्या. वॉशिंग्टन सुंदरने सलामीच्या निशांकाला पायचीत केले. लंकेची यावेळी स्थिती 26.3 षटकात 5 बाद 101 अशी होती. लियानगेने 26 चेंडूत 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमविताना वेलालगेसमवेत सहाव्या गड्यासाठी 41 धावांची भर घातली. अक्षर पटेलने लियानगेला झेलबाद केले. लियानगे बाद झाल्यानंतर हसरंगाने वेलालगे समवेत सातव्या गड्यासाठी 36 धावांची भागिदारी केली. अर्शदीप सिंगने हसरंगाला पटेलकरवी झेलबाद केले. त्याने 35 चेंडूत 2 षटकार आणि 1 चौकारासह 24 धावा जमविल्या. अकिला धनंजयने 21 चेंडूत 2 चौकारांसह 17 धावा जमविल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंग व अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 तर मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला. लंकेच्या डावात 5 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. लंकेने पहिल्या पॉवरप्ले दरम्यानच्या 10 षटकात 37 धावा जमविताना 1 गडी बाद गमविला. त्यानंतर दुसऱ्या पॉवरप्ले दरम्यानच्या 30 षटकात लंकेने 128 धावांची भर घालताना 5 गडी गमविले. लंकेने शेवटच्या 10 षटकात 65 धावा जमविताना 2 गडी गमविले. वेलालगेने 69 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह अर्धशतक झळकविले. तर निशांकाने आपले अर्धशतक 67 चेंडूत 8 चौकारांच्या मदतीने पूर्ण केले.

संक्षिप्त धावफलक: लंका 50 षटकात 8 बाद 230 (निशांका 56, वेलालगे नाबाद 67, कुशल मेंडीस 14, असालेंका 14, लियानगे 20, हसरंगा 24, अकिला धनंजय 17, अवांतर 8, अर्शदीप सिंग 2-47, अक्षर पटेल 2-33, मोहम्मद सिराज, शिवम दुबे, कुलदीप यादव आणि वॉशिंग्टन सुंदर प्रत्येकी 1 बळी)

भारत : 47.5 षटकात सर्व बाद 230 (रोहित शर्मा 58, गिल 16, कोहली 24, अय्यर 23, राहुल 31, अक्षर पटेल 33, दुबे 25, अवांतर 8, हसरंगा 3-58, असालेंका 3-30, वेलालगे 2-39, धनंजय 1-40, असिता फर्नांडो 1-34)

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article