भारत-जपान आज चुरशीचा उपांत्य सामना
वृत्तसंस्था / राजगीर (बिहार)
2024 च्या महिलांच्या आशिया चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत मंगळवारी येथे यजमान आणि विद्यमान विजेता भारत व जपान यांच्यात चुरशीचा उपांत्य सामना खेळविला जाणार आहे.
या स्पर्धेमध्ये भारतीय महिला हॉकी संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारताना दर्जेदार खेळाचे दर्शन सातत्याने घडविले. सदर स्पर्धा राऊंड रॉबीन लीग पद्धतीने खेळविली जात आहे. भारतीय महिला हॉकी संघाने राऊंड रॉबीन गटात आपले सर्व म्हणजे पाचही सामने जिंकून पुन्हा जेतेपद स्वत:कडे राखण्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. भारतीय महिला संघाने ऑलिम्पिक रौप्य पदक विजेत्या चीनचा 3-0 असा एकतर्फी पराभव केला.
मंगळवारच्या सामन्यासाठी भारतीय संघातील खेळाडू सांघिक कामगिरीवर निश्चितच भर देतील. आक्रमक आणि भक्कम बचाव यांचे योग्य समन्वय साधत भारतीय संघाने आपली वाटचाल केली असल्याचे प्रशिक्षक हरेंद्र सिंग यांनी म्हटले आहे. जपानबरोबर होणाऱ्या सामन्यात भारतीय संघाला पेनल्टी कॉर्नरची संधी वाया दवडून चालणार नाही. उपांत्य फेरीच्या सामन्यात दोन्ही संघावर वेगळे दडपण असते. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाचे डावपेच ओळखून भारतीय संघाला आपल्या तंत्रामध्ये बदल करावा लागेल. बचावफळीतील उदिता, सुशिला चानु, वैष्णवी फाळके, गोलरक्षक सविता पुनिया यांची कामगिरी आतापर्यंत दर्जेदार झाल्याचे जाणवते. आघाडी फळीतील शर्मिला देवी,संगीता कुमारी, प्रिती दुबे, लालरेमसियामी यांच्यावर चढायांची भिस्त राहिल. नेहा गोयल, उपकर्णधार नवनीत कौर आणि डुंगडुंग यांच्यावर मध्यफळीची जबाबदारी राहिल. मंगळवारचा उपांत्य सामना शेवटच्या क्षणापर्यंत चुरशीचा अपेक्षित आहे.