भारत आज एकदिवसीय मालिका जिंकण्याच्या तयारीत
वृत्तसंस्था/ कटक
भारताची इंग्लंडविरुद्धची दुसरी एकदिवसीय लढत आज रविवारी येथे होणार असून मालिका विजयाच्या भारताच्या प्रयत्नात कर्णधार रोहित शर्माची निराशाजनक कामगिरी आणि विराट कोहलीच्या पुनरागमनामुळे संघात करावा लागणारा बदल या मोठ्या अडचणी आहेत.
नागपूर येथे चार गडी राखून मिळविलेल्या विजयानंतर भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे. कोहलीला उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे त्यात विश्रांती देण्यात आल्याने या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याच्या तंदुऊस्तीबद्दल चिंता निर्माण झाली होती. तथापि, उपकर्णधार शुभमन गिलने कोहली दुसऱ्या सामन्यात खेळू शकतो असे संकेत दिले होते. कोहली त्याच्या सहकाऱ्यांसह कटकमध्ये दाखल झाल्यानंतर आरामात दिसलेला आहे. भारतीय संघ निश्चितच त्याचे स्वागत करेल, परंतु त्यामुळे आव्हानही निर्माण होईल.
शेवटच्या क्षणी कोहलीऐवजी आलेल्या श्रेयस अय्यरने पहिल्या सामन्यात 36 चेंडूंत 59 धावा काढल्या, ज्यामुळे त्याला वगळणे जवळजवळ अशक्य झाले आहे. जर मागील खेपांचे अनुकरण केले, तर कोहली श्रेयसऐवजी मैदानात उतरेल. परंतु यावेळी कोहलीकरिता यशस्वी जैस्वालला बाहेर बसावे लागण्याची शक्यता जास्त आहे. तशा स्थितीत गिल पुन्हा रोहितसोबत आघाडीला येऊ शकतो. शिवाय जैस्वाल नागपूरमध्येही चांगली चमक दाखवू शकला नाही.
डाव्या-उजव्या फलंदाजांची जोडी जमविण्याकडे कल असलेला गौतम गंभीरच्या नेतृत्वाखालील संघाचा थिंक टँक या परिस्थितीतून कसा मार्ग काढतो हे पाहावे लागेल. कोहलीलाही चांगल्या कामगिरीची गरज आहे. कारण अलीकडे त्याचा फॉर्म हा टीकेचा विषय राहिलेला आहे. त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये 14 हजार धावा पूर्ण करणारा तिसरा फलंदाज होण्यासाठी फक्त 94 धावांची आवश्यकता आहे.
रोहितचा संघर्ष चालूच राहिलेला असून तो पहिल्या वनडेत फक्त दोन धावा काढून बाद झाला. जर आज दुसऱ्या सामन्यातही चांगली कामगिरी केली नाही, तर त्याचा फॉर्म आणि भविष्याबद्दल चिंता वाढू शकते. तंदुऊस्त झालेला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुनरागमनानंतर हळूहळू स्थिरावलेला दिसत आहे. नवोदित हर्षित राणा नागपूरमध्ये सर्वांत महागडा गोलंदाज ठरला, परंतु त्याने महत्त्वपूर्ण बळी मिळविले. आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या तंदुऊस्तीविषयी चिंता कायम असल्याने राणाकडे आपला दावा पुढे नेण्याची ही आणखी एक संधी आहे.
दुसरीकडे, जोस बटलरच्या संघासाठी हा सामना ‘मेक ऑर ब्रेक’ अशा स्वरुपाचा असून ते त्यांच्या आक्रमक फलंदाजीच्या दृष्टिकोनात बदल करून अधिक समंजस फलंदाजी करण्याचा प्रयत्न करू शकतात. इंग्लंडचे यश हे भारताच्या दर्जेदार फिरकीपटूंविऊद्ध ते कितपत टिकून राहतात त्यावर अवलंबून असेल.
संघ-भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, रिषभ पंत, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग आणि वऊण चक्रवर्ती.
इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, बेन डकेट, ज्यो रूट, फिलिप सॉल्ट, जेमी स्मिथ, जेकब बेथेल, ब्रायडन कार्स, लियाम लिव्हिंगस्टोन, जेमी ओव्हरटन, जोफ्रा आर्चर, गस अॅटकिन्सन, साकिब महमूद, आदिल रशिद आणि मार्क वूड.
सामन्याची वेळ : दु. 1.30 वा.