भारत श्रीलंकेविरुद्ध ‘व्हाईटवॉश’च्या तयारीत
वृत्तसंस्था/ पल्लेकेले
भारत आणि श्रीलंका यांच्या तिसरी व अंतिम ‘टी-20’ लढत आज मंगळवारी होणार असून यावेळी नवे प्रशिक्षक गौतम गंभीर आणि कर्णधार सूर्यकुमार यादव यांच्या नेतृत्वाखालील भारत आपल्या तीव्रतेत कसलीही घट होऊ न देता श्रीलंकेच्या कमकुवतपणाचा फायदा उठवण्याचा आणि मालिकेत व्हाईटवॉश करण्याचा प्रयत्न करेल.
यजमानांच्या डोक्यावर सध्या व्हाईटवॉशची तलवार लटकत आहे. कारण भारताने पहिल्या दोन सामन्यात श्रीलंकेला पराभूत करून मालिकेचे भवितव्य निश्चित केलेले आहे. रविवारी यजमानांची सुरुवात धडाकेबाज राहूनही त्यांची झुंज सलग दुसऱ्या सामन्यात कमकुवत फलंदाजीमुळे क्षीण झाली. मधल्या षटकांमध्ये श्रीलंकेची फलंदाजी कोसळणे हे या मालिकेतील त्यांच्या खराब कामगिरीचे मुख्य कारण राहिले आहे, तर भारताने विश्वविजेत्या संघाप्रमाणे खेळ केलेला आहे.
भारताला त्यांच्या भेदक गोलंदाजीने वेळोवेळी तरता हत दिलेला आहे. गोलंदाजीत प्रभावी बदल केलेल्या कर्णधार सूर्यकुमारने आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये 58 आणि 26 धावा केल्या आहेत. उपकर्णधार आणि सलामीवीर शुभमन गिल या सामन्यासाठी वेळेत तंदुऊस्त होतो की नाही हे पाहावे लागेल. त्याच्या जागी आलेल्या संजू सॅमसनला रविवारी खातेही उघडता आले नाही. त्याच्याकडून सुधारित कामगिरीची अपेक्षा असेल. दुसऱ्या बाजूने यशस्वी जैस्वाल मात्र त्याच्या आक्रमक खेळामुळे लंकेच्या संघासाठी सर्वांत मोठा धोका राहील.
यजमानांसाठी पथुम निसांका (111 धावा) व कुसल परेरा (73) यांनी वरच्या फळीत फटकेबाजी केलेली असली, तरी श्रीलंकेच्या मधल्या षटकांतील संघर्षामुळे त्यांची पडझड झालेली आहे. भारताचा फिरकीपटू रवी बिश्नोईने दुसऱ्या लढतीत 26 धावांत 3 बळी मिळविताना मालिकेत फिरकी गोलंदाजीला हाताळण्याच्या बाबतीत श्रीलंकेच्या फलंदाजांच्या असमर्थपणा पुन्हा प्रकाशात आणला.
संघ-भारत : सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद, मोहम्मद सिराज.
श्रीलंका : चरिथ असलंका (कर्णधार), दिनेश चंडीमल, अविष्का फर्नांडो, कुसल मेंडिस, पाथुम निसांका, कुसल परेरा, वानिंदू हसरंगा, कामिंदू मेंडिस, दासुन शनाका, चामिंडू विक्रमसिंघे, बिनुरा फर्नांडो, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका, मथिशा पाथिराना, महीश थीक्षाना, दुनिथ वेललागे.
सामन्याची वेळ : संध्याकाळी 7 वा.