पाकिस्तानात घुसून भारत करतोय हत्या
पाकिस्तानी सैन्यप्रमुखांचा आरोप : आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग करण्याची सवय
वृत्तसंस्था/ लाहोर
पाकिस्तानच्या भूमीवर भारत दहशतवादाला बळ पुरवत आहे. भारत आता आमच्या भूमीत शिरून पाकिस्तानी नागरिकांची हत्या घडवून आणत आहे. भारताकडून आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उल्लंघन केले जात असून आता त्याला याची सवयच झाल्याचे उद्गार पाकिस्तानी सैन्यप्रमुख जनरल आसिम मुनीर यांनी काढले आहेत.
भारताच्या या कृतीविरोधात आता अनेक देश आवाज उठवत आहेत. आम्ही आमच्या नागरिकांच्या रक्षणासाठी भारताचे कट सातत्याने उधळून लावणार आहोत असे मुनीर यांनी म्हटले आहे. मुनीर यांनी भारत-पाक सीमेवरील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचा दौरा केला आहे. जर कुठलाही देश आमच्यावर हल्ला करत असेल किंवा आमच्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत असेल तर सैन्य पूर्ण शक्तिनिशी प्रत्युत्तर देणार असल्याचे मुनीर यांनी नमूद केले आहे.
भारताकडून शस्त्रसंधी उल्लंघन
आमचे सैन्य पाकिस्तानसमोरील धोका ओळखून आहे. आम्ही कुठल्याही हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी नेहमीच सज्ज आहोत. भारताकडून एलओसीवर अनेकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप मुनीर यांनी केला आहे. यापूर्वी पाकिस्तानचे अंतरिम पंतप्रधान अनवर उल हक काकड, पीओकेचे कथित पंतप्रधान चौधरी अनवारुल हक आणि सैन्यप्रमुख हे पीओकीतल मुजफ्फराबाद येथे पोहोचले होते.
यापूर्वी 25 जानेवारी रोजी पाकिस्तानने भारतावर स्वत:च्या 2 नागरिकांची हत्या घडवून आणल्याचा आरोप केला होता. शाहिद लतीफ आणि मोहम्मद रियाज अशी त्यांची नावे होते. याप्रकरणी आम्ही भारताच्या विरोधात सुरक्षा परिषदेच्या सदस्य देशांशी संपर्क साधणार आहोत. भारत स्वत:साठी वाँटेड असलेल्या लोकांना पाकिस्तानात लक्ष्य करत असल्याचा दावा तेथील विदेश सचिव सायरस काजी यांनी केला होता.