महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

भारत वाढवितोय नौदलाची ताकद !

06:09 AM Jan 05, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

एकंदर बदलती परिस्थिती लक्षात घेऊन सध्या भारतानं आपल्या नौदलाची ‘फ्रिगेट’, ‘विनाशिका’ नि पाणबुड्यांची ताकद वाढविण्यावर भर दिलेला असून ती काळाची गरज आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही...त्यादृष्टीनं लवकरच देशात बांधण्यात आलेल्या दोन अन् रशियानं बांधलेली एक अशा तीन युद्धनौका व एक पाणबुडी ताफ्यात समाविष्ट होणार आहेत. याशिवाय भविष्याचा विचार करून आणखी बरीच पावलं उचलण्यात आली असून या साऱ्यांवर टाकलेला हा दृष्टिक्षेप...

Advertisement

चीनच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या हिंदी महासागरातील हस्तक्षेपाला अडविण्यासाठी नेटानं हालचालींना प्रारंभ केलाय तो भारतानं देखील...भारतीय नौदल सज्ज आहे ते देशातच बांधलेल्या दोन युद्धनौका आणि डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी यांचा समावेश करण्यासाठी. खेरीज रशियानिर्मित ‘फ्रिगेट आयएनएस तशिल’ वेगानं भारताच्या दिशेनं प्रवास करतेय...त्यात सर्वांत मोठी आहे ती 7400 टनांची ‘गायडेड-मिसाईल डिस्ट्रॉयर सुरत’, तर ‘स्टील्थ फ्रिगेट नीलगिरी’ 6670 टनांची...पाणबुडी ‘वागशीर’चं वजन 1600 टन. नवी दिल्लीच्या या तिन्ही अस्त्रांवर बसविलेले ‘हेवी ड्युटी सेन्सर्स’ अन् विविध प्रकारची हत्यारं प्राणघातक पंच मारण्याची ताकद बाळगतात...

Advertisement

सुरत...‘एआय’युक्त पहिली युद्धनौका...

‘सुरत’ नि ‘नीलगिरी’ यांची निर्मिती नौदलासाठी केलीय ती मुंबईच्या माझगाव गोदीनं (एमडीएल)...सर्वांत प्रथम नौदलात प्रवेश करेल ती ‘सुरत’. ‘आयएनएस विशाखापट्टणम’, ‘आयएनएस मुरगाव’ आणि ‘आयएनएस इंफाळ’ यांच्यानंतरची ती ‘प्रोजेक्ट-15 बी’च्या अंतर्गत बांधलेली चौथी ‘गायडेड-मिसाईल’ विनाशिका. या सर्व युद्धनौकांसाठी 35 हजार कोटी रुपयांहून जास्त खर्च करण्यात आलाय...‘सुरत’ ही नौदलाची ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’चा समावेश करण्यात आलेली पहिलीवहिली युद्धनौका असून तिचे 72 टक्के सुटे भाग भारतातच तयार करण्यात आलेत आणि तासाला 4 हजार नॉटिकल मैल इतका वेग ती पकडू शकते...

‘फ्रिगेट’चा ताफा विस्तारणार...

चारही विनाशिकांच्या भात्यात आहेत ‘ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ मिसाईल्स’. त्याखेरीज ‘बराक-8’ मध्यम पल्ल्याचं जमिनीवरून आकाशात झेपावणारं क्षेपणास्त्र अन् पाणबुडीविरोधी ‘रॉकेट’, ‘टॉर्पेडो’सारखी हत्यारं देखील खचाखच भरलीत. त्यांना साथ मिळेल ती ‘76 एमएम सुपर रॅपिड गन्स’ची...‘आयएनएस नीलगिरी’ ही येऊ घातलेल्या सात बहुउद्देशीय ‘फ्रिगेट’पैकी पहिली असून ‘प्रोजेक्ट 17-ए’च्या अंतर्गत चार ‘एमडीएमल’मध्ये, तर तीन कोलकाता येथील ‘जीआरएसई’मध्ये बांधण्यात येतील. त्या सर्वांची किंमत 45 हजार कोटी रुपयांहून जास्त. सर्व सात ‘फ्रिगेट’ 2026 च्या उत्तरार्धात शत्रूंवर वार करण्यासाठी सज्ज होतील...

दरम्यान, ‘आयएनएस तशिल’ बाल्टिक समुद्र, उत्तर समुद्र, अॅटलांटिक महासागर नि हिंदी महासागर यांना पार करत भारतात प्रवेश करेल. खेरीज ‘तामल’ ही रशियानंच बांधलेली अन्य एक ‘फ्रिगेट’ मार्च वा एप्रिल महिन्यात नौदलात सामील होईल...

पाणबुड्यांची ताकद वाढविणार ‘वागशीर’...

‘वागशीर’ ही फ्रान्सकडून मिळालेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं बांधलेली सहावी व शेवटची पाणबुडी. तिचा वर्ग ‘स्कॉर्पिन’ वा ‘कालवरी’. सर्वांची निर्मिती करण्यात आलीय ती माझगाव गोदीत. 23 हजार कोटी रुपयांच्या ‘प्रोजेक्ट-75’च्या अंतर्गत भारत आणि फ्रान्स आणखी तीन ‘स्कॉर्पिन्स’साठी करार करण्याच्या तयारीत असून त्यांच्यासाठी खर्च होणार सुमारे 36 हजार कोटी रुपये. त्यापैकी पहिली सहा वर्षांत  तयार होईल. त्यानंतर प्रत्येक वर्षाला एक याप्रमाणं आणखी दोन पाणबुड्या नौदलाच्या ताब्यात येतील. सध्या नौदलाच्या विविध प्रकारच्या 60 युद्धनौकांना भारतातील वेगवेगळ्या शिपयार्डांमध्ये आकार देण्याचं काम चाललंय...

भारतीय नौदलाचं बळ वाढविण्याची गरज काय ?...

? भारतानं नौदलावरही आता प्रचंड भर दिलेला असून या विभागाची ताकद वाढविण्याची गरज जास्तच प्रकर्षानं भेडसावू लागलीय ती शेजारचा चीन झपाट्यानं त्यांच्या नौदलाचं बळ अन् हिंदी महासागरातील आपलं अस्तित्व वाढवत चालल्यानं...

? चीनचं नौदल आता 370 युद्धनौकांसह जगातील सर्वांत मोठं बनलंय. पण इतक्यावर थांबणार तर तो ड्रॅगन कसला ? ही क्षमता 2030 पर्यंत 435 वर पोहोचविण्याची आकांक्षा त्यांनी बाळगलीय. याउलट भारत सध्याच्या 132 वरून 2035 पर्यंत युद्धनौकांची संख्या 175 वर नेण्याची योजना आखतोय...

? चीननं 2008 पासून हिंदी महासागरात नौदलाचे 46 ताफे पाठविलेत. त्यांचा युद्धसराव नि इतर उपक्रमांत सहभाग राहिलेला असून सोमालियाच्या किनाऱ्यावरील चाचेगिरीच्या विरोधातील कारवायांकडे संबंध नाही. अशा प्रकारे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या मर्यादांचं त्यांनी बिनधास्त उल्लंघन केलंय...

? कोणत्याही वेळी चीनच्या ‘आयओआर’मध्ये (हिंदी महासागर प्रदेश) आठ ते दहा युद्धनौका तैनात असतात. त्याशिवाय त्यांना संशोधन किंवा हेरगिरी करणाऱ्या तसंच अनेक अवैध मासेमारी नौकांची साथ...

? वरील प्रदेशात ते दर महिन्याला एक तरी पाणबुडी पाठवतात आणि 2020 मध्ये अंदमान निकोबार बेटांच्या सभोवतालच्या समुद्राच्या तळाचा आराखडा तयार करण्यासाठी पाण्याखालील मानवरहित ‘ड्रोन’चा वापर त्यांनी केला होता...

? शी जिनपिंग यांच्या देशाच्या ताब्यात सध्या तीन विमानवाहू नौका असून त्यांचा आकडा एकूण 11 वर पोहोचविण्याच्या कामाला ते लागलेत. चीन यंदा ‘आयओआर’च्या दिशेनं ‘कॅरियर टास्क फोर्स पेट्रोल्स’ पाठविण्याच्या तयारीत सुद्धा आहे...

नौदलाची क्षमता वाढविण्यासाठी पावलं...

? भारत अमेरिकेच्या ‘एमक्यू-1 बी प्रिडेटर’ या अत्यंत घातक 31 ‘ड्रोन्स’साठी 32350 कोटी रुपयांचा करार केल्यानंतर आता सज्ज झालाय तो फ्रान्सकडून थेट 26 ‘राफेल-मरिन फायटर जेट’ मिळविण्यासाठी आणि तीन अतिरिक्त ‘स्कॉर्पिन’ पाणबुड्यांच्या तंत्रज्ञान प्राप्तीच्या दृष्टीनं सही करण्यासाठी...

? या दोन्ही व्यवहारांची किंमत पोहोचेल ती सुमारे 1 लाख कोटी रुपयांवर. त्यावर सह्या बहुतेक याच महिन्यात होतील अशी माहिती नौदलाचे अॅडमिल दिनेश त्रिपाठी यांनी दिलीय...

? ‘राफेल’चा व्यवहार 63 हजार कोटी रुपयांचा असून त्यातील 22 ‘सिंगल सिट’, तर 4 ‘ट्विन-सिट’ ट्रेनर्स. विमानवाहू नौकांवर ही विमानं तैनात करण्यात येतील...

? दुसरी अणुशक्तीवर चालणारी मिसाईल पाणबुडी ‘अरिघात’वरून ‘के-4’ या तब्बल 3500 किलोमीटर्स अंतरावरील लक्ष्याला भेदू शकणाऱ्या आण्विक क्षमतेच्या क्षेपणास्त्राचं परीक्षण 27 नोव्हेंबर, 2024 या दिवशी यशस्वीरीत्या करण्यात आलंय...त्यापूर्वी  ‘आयएनएस अरिघात’वर ‘के-15’ हे फक्त 730 किलोमीटर्स अंतरापर्यंत झेपावू शकणारं क्षेपणास्त्र तैनात करण्यात आलं होतं...

? याच वर्षी अणुशक्तीवर चालणारी तिसरी पाणबुडी ‘आयएनएस अरिधामन’ देखील नौदलात सामील होईल..

? पंतप्रधानांच्या ‘कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीनं 9800 टनांच्या दोन ‘अॅटेक पाणबुड्या’ बांधण्याची परवानगी दिलेली असून त्यातील पहिली 2036-37 पर्यंत तयार होईल. त्यांची किंमत असेल सुमारे 40 हजार कोटी रुपये. विशेष म्हणजे त्या अणुशक्तीवर चालणाऱ्या असल्या, तरी त्यांच्यावर एखादं अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्र नसेल...

पुढील पिढीतील गस्ती नौकांची तयारी...

नौदलासाठी ‘नेक्स्ट जनरेशन’ 11 गस्तीनौका तयार करण्यात येत असून चाच्यांच्या विरुद्ध आणि किनारी सुरक्षा मोहिमांसाठी त्यांचा वापर करण्यात येईल....त्यातील 7 निर्माण होतील त्या गोवा शिपयार्डमध्ये. सप्टेंबर, 2026 पासून त्या मिळण्यास प्रारंभ होईल. त्यासाठीचा करार मार्च, 2023 मध्ये करण्यात आला होता. त्यांची किंमत 6200 कोटी रुपये...तर कोलकाता येथील ‘गार्डन रिसर्च शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स’कडून तयार करण्यात येतील 3500 कोटी रुपयांच्या चार गस्तीनौका...या नौका 2500 ते 2900 टन वजनांच्या अन् 105 ते 110 मीटर्स लांब राहतील, तर ताशी 26 किलोमीटर्स या वेगानं धावतील.

संकलन : राजू प्रभू

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article