भारत ही एक महत्वाची उगवती महासत्ता
युरोप आणि अमेरिकेशी घनिष्ट संबंध, फिनलंडच्या अध्यक्षांकडून भलावण : रशिया,चीनशी तुलना नको
वृत्तसंस्था / हेलंसांकी
भारत ही एक महत्वाची उगवती महासत्ता आहे. भारताची चीन आणि रशियाशी तुलना केले जाऊ नये. भारत युरोप आणि अमेरिकेचा घनिष्ट मित्रदेश आणि भागीदार आहे, अशी भलावण फिनलंडचे अध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांनी केली आहे. पाश्चिमात्य देशांनी भारतासमवेत काम केले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले. सध्याच्या जागतिक स्थितीत त्यांचे हे वक्तव्य महत्वाचे ठरत आहे.
जगाची व्यवस्था परिवतर्तित होत असून या व्यवस्थेत भारताचे स्थान महत्वाचे आहे. भारताची अर्थव्यवस्था मोठी आहे. भारत एक लोकशाही देश असून पाश्चिमात्य देशांनी भारताशी सहकार्य करणे आवश्यक आहे. चीन आणि रशिया या देशांप्रमाणे भारत विस्तारवादी आणि आक्रमक नाही. भारताकडे मोठी विकास क्षमता आहे, असेही प्रतिपादन अलेक्झांडर स्टब यांनी बुधवारी केले आहे.
सध्याच्या परिस्थितीत महत्वाचे विधान
सध्या जगात अस्थिरतेचे वातावरण आहे. भारतावर अमेरिकेने 50 टक्के व्यापार शुल्क लावले आहे. तसेच इतर अनेक देशांवरही कमी अधिक प्रमाणात कर लावण्यात आले आहेत. भारतावर अमेरिकेने ब्राझीलप्रमाणे सर्वात मोठा, म्हणजे 50 टक्के कर आकारला आहे. तर दुसऱ्या बाजूला भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार करण्याच्या दृष्टीने चर्चाही होत आहे. अशा स्थितीत स्टब यांचे हे विधान महत्वाचे असून ते युरोपची भारताकडे पाहण्याची दृष्टी दर्शवून देत आहे. युरोपियने देशांसाठी भारताचे महत्व मोठे असल्याचे त्यांच्या विधानावरुन ध्वनित होत आहे. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनीही भारताशी अमेरिकेची अतूट धोरणात्मक भागीदारी असल्याचे सूचित केले होते. त्यामुळे भारताचे जागतिक महत्व स्पष्ट होत असून पुढच्या तीन ते चार आठवड्यांमध्ये स्थिती अधिक स्पष्ट होईल. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार झाल्यास सध्याचा वाद दूर होऊ शकतो. तथापि, भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी तणाव कायम राहिल्यास भारताला अन्य पर्याय शोधण्यावाचून गत्यंतर राहणार नाही. तसे झाल्यास सध्याची जागतिक व्यवस्था पालटू शकते, असे मत आहे.
रशियाच्या तेलाचा प्रश्न
गेली चार वर्षे भारताने मोठ्या प्रमाणात रशियाकडून कच्च्या इंधन तेलाची खरेदी चालविली आहे. हे तेल भारताला बाजारभावापेक्षा काही प्रमाणात कमी दरात मिळते. भारताची तेलाची आवश्यकता मोठी असल्याने भारताला रशियाकडून तेल खरेदी थांबविणे शक्य होणार नाही, असे भारताने स्पष्ट केले आहे. युरोपातील अनेक देश रशियाकडून तेल आणि नैसर्गिक वायू घेतात. चीन हा रशियन तेलाचा सर्वात मोठा ग्राहक असूनही केवळ भारतावर अमेरिकेने 50 टक्के कर लावला आहे. मात्र जगातील अनेक देशांनी या 50 टक्के कराचा विरोध केला आहे.
भारताचा प्रभाव वादातीत
सध्या भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापारी आणि आर्थिक तणाव असला, तरी ही स्थिती अधिक काळ टिकणार नाही. जगाच्या व्यवस्थेवर भारताचा मोठा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष प्रभाव आहे. भारताची आर्थिक क्षमता मोठी असल्याने सध्याचा धक्का तो सहजगत्या सहन करु शकतो. युरोपियन देशांनी आणि अमेरिकेने भारताही ही क्षमता लक्षात घेतली पाहिजे आणि त्यानुसार धोरण ठरविले पाहिजे, अशा अर्थाचे वक्तव्य स्टब यांनी केले. नव्या जागतिक व्यवस्थेत भारताची भूमिका महत्वाची असल्याने भारताला एकटे पाडून कोणताही हेतू साध्य होणार नाही. त्यामुळे भारताची स्थिती समजून घेऊन त्याला आपल्यासह ठेवण्यातच युरोपियन देशांचे हित सामावलेले आहे, असे मतप्रदर्शन अलेक्झांडर स्टब यांनी केल्याने, ते सध्याच्या काळात जगाच्या चर्चेचा महत्वाचा विषय ठरले आहे.
भारताचे महत्व निर्विवाद...
ड अमेरिका आणि युरोपियन देशांनी भारताशी सहकार्य करणे आवश्यक
ड नव्याने आकाराला येणाऱ्या जागतिक व्यवस्थेत भारताची भूमिका स्पष्ट
ड फिनलंडचे अध्यक्ष स्टब यांनी केले भारत देशाचे जागतिक महत्व स्पष्ट
