भारतही फिरकी चौकडी खेळविण्याच्या विचारात
वृत्तसंस्था/ चेन्नई
फिरकी चौकडी ही एक नेहमीच आकर्षक कल्पना राहिलेली असून ती भारतीय क्रिकेटप्रेमींना जुन्या काळात नेते. पण 70 च्या दशकाच्या उत्तरार्धात बिशनसिंग बेदी, बी. एस. चंद्रशेखर, इरापल्ली प्रसन्ना आणि श्रीनिवास वेंकटराघवन यांनी खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर भारत या फॉर्म्युलाकडे परत गेला नाही. आता मात्र हैदराबादमध्ये इंग्लंडने पहिली कसोटी जिंकल्यानंतर काहीसे निराशेचे वातावरण पसरलेले असून त्यानंतर मॉन्टी पानेसरसारख्या माजी खेळाडूने 5-0 अशा फरकाने पाहुणे मालिका जिंकतील असे भाकीत केले आहे.
एक पराभव नेहमीच होऊ शकतो आणि त्याची तयारी आपण ठेवायला हवी. परंतु शुक्रवारपासून विझाग येथील दुसरी कसोटी सुरू होणार असताना रवींद्र जडेजा आणि के. एल राहुल यांना झालेल्या दुखापतीमुळे कर्णधार रोहित शर्मासमोर पेच निर्माण झालेला आहे. जडेजाच्या धोंडशिरेची दुखापत हे भारतीय संघासाठी चिंतेचे मोठे कारण आहे. कारण भारतीय फिरकी आक्रमणात आर. अश्विनसह जडेजा हे घातक शस्त्र आहे. अक्षर पटेल भारतीय परिस्थितीमध्ये घातक असला, तरी असे दिसते की, इंग्लंड त्याच्यासाठी ‘गेम प्लॅन’ बनवून आला आहे.
अश्विन आणि अक्षर हेच विझागमधील आणखी एका काळ्या मातीच्या खेळपट्टीवर भारतीय फिरकी आक्रमणाचे नेतृत्व करतील. परंतु भारताचे माजी कर्णधार आणि निवड समितीचे माजी अध्यक्ष कृष्णमाचारी श्रीकांत यांना वाटते की, भारताने इतर दोन फिरकीपटू डावखुरा कुलदीप यादव आणि ऑफस्पिनर वॉशिंग्टन सुंदर यांनाही खेळवले पाहिजे. .
जडेजा काही काळासाठी बाहेर राहणार असल्याचे उघड झाल्यानंतर सोमवारी वॉशिंग्टनला संघात स्थान देण्यात आले आहे. श्रीकांत यांनी म्हटले आहे की, पहिल्या कसोटीत सिराजने एकही बळी न घेता एकूण 11 षटके टाकली. अशा खेळपट्ट्यांवर चार फिरकीपटू खेळवता येतात हे इंग्लंडने दाखवून दिले आहे. चारही फिरकीपटूंना एकत्र खेळविण्यापासून आम्हाला कोण रोखत आहे’, असा सवाल त्यांनी केला आहे. तसे धोरण अवलंबले गेले, तर वॉशिंग्टन हा मधल्या फळीत जडेजाच्या जागी येईल आणि सिराजची जागा कुलदीपकडे जाईल. जर भारत चार फिरकीपटूंसह खेळला, तर त्यांच्याकडे आवश्यक विविधता राहील, याकडे श्रीकांत यांनी लक्ष वेधले आहे.
वॉशिंग्टनने भारताच्या 2021 च्या गब्बावरील कसोटी विजयात मोठी भूमिका बजावली होती. यावरून त्याच्याकडे कसोटीच्या दृष्टीने आवश्यक खेळ व तंत्र असल्याचे सिद्ध होते. पण निवड समितीचे आणखी एक माजी सदस्य देवांग गांधी यांना असे वाटते की, चार फिरकीपटू फिरकीसाठी अनुकूल परिस्थितीतही खेळविणे हे थोडे जास्त होते. ‘मला विझागची खेळपट्टी माहित आहे. तेथे चेंडू खडबडीत होईल आणि रिव्हर्स स्विंगला वाव असेल. मला वाटत नाही की, वेगवान गोलंदाज म्हणून केवळ जसप्रीत बुमराहला खेळविणे योग्य आहे’, असे गांधी यांनी म्हटले आहे. जडेजाच्या जागी कुलदीप हा गोलंदाजीतील एकमेव बदल असावा, असे त्यांना वाटते.
दरम्यान, राहुलने माघार घेतल्यानंतर मुंबईचा फलंदाज सर्फराज खानला अचानक संघात बोलावणे आलेले आहे. ‘तो रिव्हर्स स्वीप खेळू शकतो आणि तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मला वाटते की, इंग्लिश फिरकी गोलंदाजांना तोंड देण्याच्या दृष्टीने भारताला अशा खेळाडूची गरज आहे’, असे श्रीकांतनी म्हटले आहे. आपल्याकडे सूत्रे असती, तर श्रेयस अय्यरच्या जागी पाटीदारलाही खेळविले असते, असे त्यांनी म्हटले आहे.