भारत आज पाकविरुद्ध विजयी घोडदौड कायम राखण्यास सज्ज
वृत्तसंस्था/ हुलुनबुईर (चीन)
उपांत्य फेरीतील स्थान आधीच निश्चित झालेले असले, तरी आतापर्यंत अपराजित राहिलेला भारत हिरो आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आपल्या शेवटच्या साखळी सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर विजय मिळवून आपली घोडदौड आणि वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल. आज शनिवारी ही बहुप्रतिक्षित लढत होणार आहे.
चार सामन्यांतून चार विजयांसह गतविजेता भारत गुणतालिकेत आघाडीवर आहे, त्यानंतर पाकिस्तानचा क्रमांक लागतो. स्पर्धेच्या विजेतेपदाचा भक्कम दावेदार म्हणून सुऊवात केलेल्या आणि पॅरिस ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेता असलेल्या भारताने आतापर्यंत निराश केलेले नाही. यजमान चीनला त्यांनी 3-0, तर जपानला 5-1 ने पराभूत केले. त्यानंतर मलेशियाला 8-1 ने हरवले आणि शेवटच्या सामन्यात कोरियाविऊद्ध 3-1 असा विजय नोंदवला. .
दुसरीकडे, पाकिस्तानची मोहीम संमिश्र राहिली आहे. दिग्गज फॉरवर्ड ताहिर जमानच्या मार्गदर्शनाखाली खेळताना अम्माद बट्टच्या नेतृत्वाखालील संघ प्रत्येक सामन्यासह सुधारत गेला आहे. पाकिस्तानने मलेशिया आणि कोरियाविऊद्ध 2-2 अशी बरोबरी साधली, तर त्याआधी जपान आणि चीनला अनुक्रमे 2-1 आणि 5-1 ने पराभूत केले. त्यामुळे ते दुसऱ्या स्थानावर पोहोचले आहेत.
अलीकडच्या निकालांचा विचार करता भारताचे पारडे पाकिस्तानच्या तुलनेत जड आहे. गेल्या वर्षी हांगझाऊ आशियाई क्रीडास्पर्धेत झालेल्या मागील लढतीत भारताने पाकिस्तानचा 10-2 असा पराभव केला होता. त्याच्या काही महिने पूर्वी चेन्नई येथे झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतीयांनी पाकिस्तानचा 4-0 असा पराभव केला होता. 2022 मध्ये जकार्ता येथे झालेल्या एशिया कपमध्ये तुलनेने तऊण भारतीय संघाने पाकिस्तानला 1-1 असे बरोबरीत रोखले होते, तर ढाका येथे 2021 मध्ये झालेल्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानला 4-3 ने हरवून कांस्यपदक जिंकले होते.
भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग, जो जगातील सर्वोत्तम ड्रॅग-फ्लिकर्सपैकी एक मानला जातो, त्याने पॅरिसमधील आपला चांगला फॉर्म कायम ठेवला आहे आणि पाकिस्तानशी झुंजण्यास तो उत्सुक आहे. भारतीय संघाची युवा फॉरवर्ड लाइन अपेक्षांना जागत आली आहे आणि त्यांनी बरेच फिल्ड गोल केले आहेत.