भारत उपांत्यपूर्व फेरीत
मकाववर 5-0 फरकाने मात, आज कोरियाशी लढत
वृत्तसंस्था/ किंगडाव, चीन
बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक चॅम्पियनशिपमध्ये भारताने विजयी सुरुवात करताना गट ड मधील लढतीत मकाववर 5-0 अशी एकतर्फी विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरीतील स्थानही निश्चित केले.
दुबईत झालेल्या मागील आवृत्तीत भारताने कांस्यपदक पटकावले हेते. येथील विजयाने भारताची उपांत्यपूर्व फेरी निश्चित झाली आहे. दुसरी व शेवटची गटसाखळी लढत कोरियाविरुद्ध गुरुवारी होणार आहे. मिश्र दुहेरीत सतीश कुमार करुणाकरन व आद्या वरियत या राष्ट्रीय विजेत्या जोडीने भारताला विजयी सुरुवात करून देताना चाँग लिऑग व वेंग चि एन्ग यांचा 21-10, 21-9 असा पराभव केला. पुरुष एकेरीत लक्ष्य सेनने पँग फाँग पुइ याचा 21-16, 21-12 असा पराभव करून भारताची आघाडी 2-0 अशी केली.
महिला एकेरीत मालविका बनसोडने हाओ वाइ चँनचा 21-15, 21-9 असा एकतर्फी पराभव करून भारताचा विजयही निश्चित केला. पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी व एमआर अर्जुन यांनी चिन पॉग पुइ व कोक वेन व्हाँग यांच्यावर 21-15, 21-19 अशी मात करून भारताची आघाडी 4-0 अशी केली. जागतिक नवव्या मानांकित त्रीसा जॉली व गायत्री गोपीचंद यांनी महिला दुहेरीच्या सामन्यात एनजी वेंग चि व पुइ चि वा यांच्यावर 21-10, 21-5 अशी मात करून भारताचा एकतर्फी विजय साकार केला.