भारत चॅम्पियन्स कपच्या फायनलमध्ये
कांगारुंचा हिशोब केला चुकता, सेमीफायनलमध्ये उडवला धुव्वा : किंग कोहलीची 84 धावांची महत्वपूर्ण खेळी
वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसी स्पर्धेत भारतीय संघाच्या जेतेपदाच्या मार्गात कायमच अडथळा ठरत आलेल्या ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाने धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल गाठली आहे. मंगळवारी झालेल्या उपांत्य सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 4 विकेट्सनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियन संघ 264 धावांत ऑलआऊट झाला. यानंतर टीम इंडियाने विजयासाठीचे 265 धावांचे लक्ष्य सहा गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण करत थाटात फायनलमध्ये प्रवेश केला.
भारताकडून विजयी लक्ष्याच्या पाठलागात विराट कोहलीने मोलाची भूमिका बजावली. त्याने श्रेयस अय्यरच्या साथीने 91 धावांची, अक्षर पटेलच्या साथीनं 44 धावांची आणि लोकेश राहुलच्या साथीनं 47 धावांची भागीदारी रचून विजयाचा पाया रचला. विराट कोहलीने 84, श्रेयस अय्यरने 45, अक्षरने 27 धावांची आणि राहुलने 42 नाबाद धावांची खेळी उभारली. आता, आज होणाऱ्या न्यूझीलंड व दक्षिण आफ्रिका यांच्यातील विजेत्या संघाशी भारताचा अंतिम सामना 9 मार्च रोजी होईल. दरम्यान, 84 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारणाऱ्या विराटला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
विराटचे शतक हुकले, राहुल, श्रेयसची फटकेबाजी
ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना शुभमन गिल पुन्हा अपयशी ठरला. 8 धावा काढून तो बाद झाला. कर्णधार रोहितने 3 चौकार व 1 षटकारासह 28 धावांची खेळी केली. पण नंतर विराट आणि श्रेयस अय्यरने 91 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला. श्रेयसने 3 चौकारासह 45 धावांचे योगदान दिले. श्रेयस बाद झाल्यानंतर अक्षर पटेलने विराटला चांगली साथ दिली. अक्षरने 30 चेंडूत 27 धावा केल्या. विराटने संयमी व निर्णायक खेळी करताना 5 चौकारासह 84 धावांची खेळी केली. त्याला झम्पाने बाद केले. यानंतर केएल राहुल व हार्दिक पंड्याने फटकेबाजी करत टीम इंडियाला विजय मिळवून दिला. राहुलने 34 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. हार्दिक 28 धावा काढून बाद झाला. ऑस्ट्रेलियाकडून एलिस व झम्पा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
कांगारुंचा हिशोब चुकता
प्रारंभी, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. ट्रॅविस हेड आणि कुपर कॉनली यांनी डावाची सुरुवात केली. डावातील तिसऱ्याच षटकांत कुपर कॉनलीला मोहम्मद शमीने बाद करत भारताला पहिले यश मिळवून दिले. कॉनलीला भोपळाही फोडता आली नाही. पहिल्या चेंडूवर जीवदान मिळाल्यानंतर ट्रॅव्हिस हेडने 33 चेंडूत 39 धावा केल्या, ज्यामध्ये त्याने 2 षटकार आणि 5 चौकार मारले. हेड आता पुन्हा भारताची डोकेदुखी ठरणार, असे वाटत होते. पण वरुण चक्रवर्ती यावेळी भारताच्या मदतीला धावून आला. वरुणच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारताना हेडचा फटका चुकला. चेंडू हवेत उडाला आणि शुभमन गिलने यावेळी अप्रतिम झेल पकडला.
स्टीव्ह स्मिथ, अॅलेक्स केरीची शानदार अर्धशतके
त्यानंतर भारताने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना जखडून ठेवले होते. पण त्यावेळी स्मिथ हा भारताची डोकेदुखी ठरला. स्मिथने दमदार अर्धशतक झळकावले आणि तो शतकाच्या दिशेने कूच करत होता. त्यावेळी शमीच्या हातून स्मिथचा झेलही सुटला. पण शमीने ही कसर त्यानंतर भरून काढली. कारण शमीने स्मिथला क्लीन बोल्ड करत भारताला मोठे यश मिळवून दिले. स्मिथने यावेळी 4 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 73 धावांची खेळी साकारली. याउलट लाबुशेन व जोस इंग्लिश स्वस्तात बाद झाले. लाबुशेनने 29 तर इंग्लिशने 11 धावा केल्या. यष्टीरक्षक फलंदाज अॅलेक्स केरीने मात्र शानदार खेळी साकारताना 57 चेंडूत 8 चौकार व 1 षटकारासह 61 धावांची खेळी केली. केरीच्या या धमाकेदार खेळीमुळे कांगारुंना अडीचशेचा टप्पा गाठता आला. ड्वारशुईने 19 धावांचे योगदान दिले तर स्फोटक फलंदाज मॅक्सवेलला केवळ 7 धावा करता आल्या. पेरी बाद झाल्यानंतर इतर तळाचे ऑस्ट्रेलियन फलंदाज अपयशी ठरले. कांगारुंचा डाव 49.3 षटकांत 264 धावांत संपला. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 गडी बाद केले. वरुण चक्रवर्ती व रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
12 वर्षानंतर इतिहास रचण्याची संधी
भारतीय संघाने 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले होते. यानंतर आता, तब्बल 12 वर्षानंतर टीम इंडियाला जेतेपद मिळवण्याची नामी संधी असणार आहे. याआधी, 2017 मध्ये भारताने उपजेतेपद मिळवले होते, अंतिम लढतीत पाकिस्तानने पराभूत केल्यामुळे टीम इंडियाची संधी हुकली होती. आता, 9 मार्च रोजी भारताचा अंतिम सामना न्यूझीलंड व द.आफ्रिका यांच्यातील विजेत्यांशी होईल.
स्टंपवर जाऊन लागला चेंडू, तरी स्टीव्ह स्मिथला नाही दिले बाद
ऑस्ट्रेलियाच्या डावातील 14 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ अक्षर पटेलविरुद्ध बचावात्मक फलंदाजी करण्याचा प्रयत्न करत होता. पण पॅडवरच्या काठावर आदळल्यानंतर चेंडू स्टंपला जाऊन लागला. पण तरीही स्टीव्ह स्मिथ बाद झाला नाही. आयसीसीच्या नियमामुळे त्याला बाद करण्यात आले नाही. स्मिथने चेंडू खेळल्यानंतर चेंडू फिरला आणि ऑफ-स्टंपच्या पायावर जाऊन आदळला. या चेंडूवर नशिबाने स्मिथला साथ दिली आणि स्टंपवर चेंडू आदळूनही बेल्स विखुरल्या नाहीत. याच कारणामुळे स्मिथला बाद करण्यात आले नाही. आयसीसीच्या नियमानुसार, कोणत्याही फलंदाजाला आऊट करण्यासाठी स्टंप वरची किमान एक बेल खाली पडली पाहिजे. जर असे झाले नाही तर फलंदाजाला आऊट मानल्या जात नाही. स्मिथसोबतही काहीही असेच घडले. म्हणूनच तो आऊट होण्यापासून वाचला.
भारतीय संघ सेमीफायनलमध्ये हाताला काळी पट्टी बांधून मैदानात
भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये जेव्हा खेळायला उतरला तेव्हा त्यांच्या खांद्यावर काळी पट्टी बांधलेली होती. सोमवारी भारताचे दिग्गज क्रिकेटपटू पद्माकर शिवलकर यांचे निधन झाले होते. शिवलकर यांना श्रध्दांजली म्हणून भारतीय संघ हातावर काळी पट्टी बांधून उतरल्याचे पाहायला मिळाले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया 49.3 षटकांत सर्वबाद 264 (ट्रेव्हिस हेड 39, स्टीव्ह स्मिथ 73, लाबुशेन 29, जोस इंग्लिश 11, अॅलेक्स केरी 61, मॅक्सवेल 7, नॅथन एलिस 10, मोहम्मद शमी 3 बळी, वरुण चक्रवर्ती व रविंद्र जडेजा प्रत्येकी दोन बळी, अक्षर पटेल व हार्दिक पंड्या प्रत्येकी एक बळी)
भारत 48.1 षटकांत 6 बाद 267 (रोहित शर्मा 28, शुभमन गिल 8, विराट कोहली 84, श्रेयस अय्यर 45, अक्षर पटेल 27, केएल राहुल नाबाद 42, हार्दिक पंड्या 28, रविंद्र जडेजा नाबाद 2, नॅथन एलिस व अॅडम झम्पा प्रत्येकी दोन बळी, ड्वारशुईस व कॉनली प्रत्येकी एक बळी).