जागतिक कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत वैयक्तिक पदकांची भारताला आशा
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
मिश्र सांघिक स्पर्धेत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकल्यानंतर भारतीय संघ आज सोमवारपासून येथे सुरू होणाऱ्या बीडब्ल्यूएफ जागतिक कनिष्ठ स्पर्धेच्या वैयक्तिक स्पर्धांमध्ये ही गती कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
या स्पर्धेत भारताची सर्वोत्तम कामगिरी 17 वर्षांपूर्वी पुण्यात झाली होती जेव्हा सायना नेहवालने मुलींच्या एकेरीत सुवर्णपदक जिंकले होते, तर आर. एम. व्ही. गुऊ साईदत्तने मुलांच्या एकेरीत कांस्यपदक जिंकले होते. आतापर्यंत भारताने स्पर्धेच्या इतिहासात एकूण 11 वैयक्तिक पदके जिंकली आहेत, ज्यात चार रौप्यपदकांचा समावेश आहे. या आवृत्तीत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवण्याची सर्वोत्तम संधी मुलींच्या एकेरीत असून त्यात प्रामुख्याने आशा कनिष्ठ जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलेली तन्वी शर्मा आणि चायना ओपनच्या क्वार्टरफायनलमध्ये पोहोचलेली उन्नती हुडा यांच्यावर आहे.
दोन्ही खेळाडूंना ड्रॉच्या वेगवेगळ्या भागात ठेवण्यात आले आहे, ज्यामुळे या दोन भारतीय खेळाडूंमध्ये अंतिम फेरी रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आशियाई 19 वर्षांखालील स्पर्धेतील कांस्यपदक विजेत्या तन्वीला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे आणि इंडोनेशियाच्या सातव्या मानांकित थालिता विर्यावानविऊद्धची उपांत्यपूर्व फेरीतील लढत ही तिची मोहिमेतील पहिली मोठी परीक्षा असू शकते. दुसरीकडे, आठवी मानांकित उन्नती दुसऱ्या फेरीत हाँगकाँगच्या लिऊ होई किऊ अॅनाविऊद्ध आणि उपांत्यपूर्व फेरीत दुसऱ्या मानांकित थायलंडच्या अन्यपत फिचितप्रीचसाकविऊद्ध खेळण्याची शक्यता आहे.
भारताची आशियाई 19 वर्षांखालील स्पर्धेतील दुसरी कांस्यपदक विजेती वेनाला के. आणि जागतिक क्रमवारीत 41 व्या क्रमांकावर असलेली रक्षिता श्री यांना अंतिम चार खेळाडूंच्या टप्प्यात पोहोचण्याची संधी निर्माण करण्यासाठी काही कठीण सामन्यांमधून जावे लागेल. उपउपांत्यपूर्व फेरीत रक्षिताचा सामना चौथ्या मानांकित श्रीलंकेच्या रानीथमा लियानागेशी होऊ शकतो, तर वेनालाला त्याच टप्प्यात चीनच्या लिऊ सी याचा सामना करावा लागू शकतो. मुलांच्या एकेरीतील दावेदारांचा पदकप्राप्तीच्या फेरीत पोहोचण्याचा मार्ग अधिक कठीण आहे. लालथाझुआला हमारला 32 खेळाडूंच्या फेरीत जागतिक कनिष्ठ क्रमवारीतील अव्वल खेळाडू आणि अव्वल मानांकित इंडोनेशियाच्या मोहम्मद झाकी उबैदिल्लाहचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे, तर 11 व्या मानांकित रौनक चौहानला त्याच टप्प्यात चीनच्या ली झी हांगविऊद्ध कठीण परीक्षेला सामोरे जाऊ लागू शकते.