भारताला मालिकेत बरोबरीची संधी
इंग्लंड पराभवाच्या छायेत, गिलचे दीडशतक
वृत्तसंस्था / बर्मिंगहॅम
पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत गिलच्या कप्तानी खेळीच्या जोरावर भारतीय संघाला इंग्लंडशी बरोबरी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दुसऱ्या कसोटीत शनिवारी खेळाच्या चौथ्या दिवशी भारताने इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे कठीण आव्हान दिल्यानंतर इंग्लंडची दुसऱ्या डावात स्थिती 3 बाद 72 अशी झाली आहे. या सामन्यात गिलने पहिल्या डावात 269 तर दुसऱ्या डावात 161 अशा एकूण 430 धावा झोडपल्या. भारतीय संघाने या कसोटीमध्ये पहिल्यांदाच 1000 धावांचा टप्पा पार करण्याचा विक्रम केला आहे.
या मालिकेतील पहिल्या कसोटीतही दोन्ही संघांकडून धावा जमविल्या गेल्या. पण इंग्लंडने शेवटच्या दिवशी भारताला पराभूत करुन आघाडी घेतली होती. बर्मिंगहॅमची खेळपट्टी फलंदाजीला अनकुल असल्याचे जाणवले. कारण या सामन्यात आतापर्यंत दोन्ही संघांनी जवळपास 1500 धावा जमविल्या आहेत. भारताच्या दोन्ही डावात शुभमन गिलने शतके झळकविली. पहिल्या डावामध्ये जयस्वाल आणि रविंद्र जडेजा यांनी तर दुसऱ्या डावामध्ये के. एल. राहुल, ऋषभ पंत आणि जडेजा यांनी अर्धशतके नोंदविली.
भारताचा पहिला डाव 587 धावांवर आटोपल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 407 धावा जमविल्याने भारताने 180 धावांची भक्कम आघाडी घेतली. त्यानंतर भारताने 1 बाद 64 या धावसंख्येवरुन शनिवारी चौथ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला आणि उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात 3 बाद 177 धावा जमविल्या होत्या. के. एल. राहुलने 84 चेंडूत 10 चौकारांसह 55 तर नायरने 5 चौकारांसह 26 धावा केल्या. ऋषभ पंत आणि गिल या जोडीने दमदार फलंदाजी करत भारतीय संघाची स्थिती अधिकच भक्कम केली. चहापानापर्यंत भारताने दुसऱ्या डावात 4 बाद 304 धावा जमविल्या होत्या. या सत्रामध्ये भारताने केवळ एकमेव गडी गमविताना 127 धावा जमविल्या. गिल आणि ऋषभ पंत या जोडीने चौथ्या गड्यासाठी 110 धावांची शतकी भागिदारी केली. चहापानापूर्वी गिलने आपले या सामन्यातील सलग दुसरे शतक 129 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने झळकविले.
खेळाच्या शेवटच्या सत्रामध्ये भारताने गिल, ऋषभ पंत आणि नितीशकुमार रे•ाr हे तीन गडी गमविताना 123 धावा झोडपल्या. या सत्रात ऋभष पंतने 58 चेंडूत 3 षटकार आणि 8 चौकारांसह 65 धावा जमवित तो बशीरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. पंत बाद झाल्यानंतर गिलने अधिक आक्रमक फटके मारले. त्याने 156 चेंडूत 7 षटकार आणि 12 चौकारांसह दीड शतक पूर्ण केले. तसेच जडेजा समवेत पाचव्या गड्यासाठी 175 धावांची भागिदारी केली. बशीरने स्वत:च्याच गोलंदाजीवर गिलला टिपले. त्याने 162 चेंडूत 8 षटकार आणि 13 चौकारांसह 161 धावा जमविल्या. भारताने 83 षटकाअखेर 6 बाद 427 धावा जमवित इंग्लंडला विजयासाठी 608 धावांचे कठीण आव्हान देत डावाची घोषणा केली. इंग्लंडतर्फे बशीर आणि टंग यांनी प्रत्येकी 2 तर कार्स आणि रुट यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
इंग्लंडच्या दुसऱ्या डावालाही डळमळीत सुरूवात झाली. दुसऱ्याच षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर सलामीचा क्रॉले बदली खेळाडू साई सुदर्शन करवी झेलबाद झाला. क्रॉलेला खातेही उघडता आलेले नाही. सिराजच्या तुलनेत आकाशदीपचे चेंडू चांगलेच स्वींग होत असल्याने इंग्लंडच्या फलंदाजांना अवघड जात होते. आकाशदीपच्या अशाच एका इनस्विंगरवर डकेटचा त्रिफळा उडाला. त्याने 15 चेंडूत 5 चौकारांसह 25 धावा केल्या. आकाशदीपच्या भेदक गोलंदाजीसमोर रुटलाही नमावे लागले. पुढे येवून फटका मारण्याच्या नादात तो आकाशदीपच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्याने 6 धावा केल्या. ऑलीपॉप 3 चौकारांसह 24 तर ब्रुक 2 चौकारांसह 15 धावांवर खेळत आहे. भारतातर्फे आकाशदीपने 36 धावांत 2 तर सिराजने 29 धावांत 1 गडी बाद केला. इंग्लंडच्या पहिल्या डावात सिराजने 6 तर आकाशदीपने 4 गडी बाद केले होते. इंग्लंडच्या दुसऱ्या डावातही भारताची ही वेगवान जोडी त्यांना कर्दंनकाळ ठरु शकेल.
संक्षिप्त धावफलक: भारत प. डाव 151 षटकात सर्वबाद 587, इंग्लंड प. डाव 89.3 षटकात सर्वबाद 407, भारत दु. डाव 83 षटकात 6 बाद 427 डाव घोषित (गिल 161, पंत 65, के. एल. राहुल 55, नायर 26, जयस्वाल 28, जडेजा नाबाद 69, टंग 2-93, कार्स 1-56, बशीर 2-119, रुट 1-65), इंग्लंड दु. डाव 16 षटकात 3 बाद 72 (डकेट 25, क्रॉले 0, रुट 6, पॉप खेळत आहे 24, ब्रुक खेळत आहे 15, आकाशदीप 2-36, मोहम्मद सिराज 1-29)