6 जी तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करण्याची भारताकडे क्षमता
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया : व्हीटीयूच्या बेंगळुरातील कार्यालयात कार्यक्रम
बेंगळूर : केंद्र सरकार 6-जी व कॉन्टम कम्युन्टींगमध्ये संशोधन व नाविन्यतेला प्राधान्य देण्यास प्रयत्नशील आहे. भारत देशाकडे 6-जी तंत्रज्ञानात जगाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असणारी क्षमता असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केले. विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाच्या (व्हीटीयू) बेंगळूर येथील प्रादेशिक कार्यालयात गुरुवारी झालेल्या व्हीटीयू-व्हीआरआयएफ-टीसीओईच्या उत्कृष्ट व भविष्यातील तंत्रज्ञानावर आधारित उपक्रमाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. प्रत्येकाच्या जीवनात गुरुला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरु हे दिशादर्शक असतात. सर एम. विश्वेश्वरय्या हे एक श्रेष्ठ तंत्रज्ञ व गुरुस्थानी होते, असे उदाहरण त्यांनी दिले.
व्हीटीयूच्या बेंगळूर प्रादेशिक विभाग हा दूरसंपर्क क्षेत्रात संशोधन, नाविन्यता व उत्तम शैक्षणिक मार्गदर्शन करणारा आहे. 5 जी, 6 जी, कृत्रिम बुद्धीमता, इंटरनेट ऑफ थिंग्ज यावर भारत देश भविष्य निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. आत्मनिर्भर भारत, संशोधन-उद्योजकता, डिजिटल सबलीकरण, कौशल्य विकास, स्मार्टअप, सार्वजनिक-खासगी भागीदारी, यावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. तत्पूर्वी, राज्याचे वैद्यकीय शिक्षण खाते मंत्री डॉ. शरणप्रकाश पाटील यांनी आपल्या भाषणात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती करून देणाऱ्या केंद्रांची आजच्या विद्यार्थ्यांना अत्यंत आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यानंतर व्हीटीयूचे प्रा. विद्याशंकर एस. यांनी आधुनिक तंत्रज्ञानात व्हीटीयूने साधलेली प्रगती यावर माहिती दिली. कार्यक्रमाला व्हीटीयूचे प्रा. बी. ई. रंगस्वामी आदी उपस्थित होते.