For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पुतिन यांच्याशी नाही भारताची चर्चा

06:27 AM Sep 27, 2025 IST | Tarun Bharat Portal
पुतिन यांच्याशी नाही भारताची चर्चा
Advertisement

‘नाटो’ प्रमुखांच्या प्रतिपादनाला भारताचे स्पष्ट प्रत्युत्तर, आरोप तथ्यहीन असल्याचे केले प्रतिपादन

Advertisement

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

अमेरिकेने भारतावर लागू केलेल्या 50 टक्के व्यापार शुल्काचा परिणाम होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली असून युक्रेनसंबंधी त्यांच्या योजना काय आहेत, यासंबंधी माहिती मागविली आहे, असा आरोप नाटो या संघटनेचे प्रमुख मार्क रट यांनी केला आहे. मात्र, रट यांचा हा आरोप धादांत खोटा असल्याचे स्पष्ट प्रत्युत्तर भारताने दिले आहे रट यांनी हा आरोप शुक्रवारी सकाळी केलेला आहे.

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अध्यक्ष पुतिन यांना कोणताही दूरध्वनी केलेला नाही. यासंबंधी रट यांनी दिलेली माहिती केवळ काल्पनिक आणि असत्य आहे. भारताने पुतिन यांच्याकडून कधीच त्यांच्या युद्धासंबंधीच्या योजनांवर माहिती मागविलेली नाही. या फंदात आम्ही पडत नाही. रट यांचे यासंबंधातील विधान पूर्णत: चुकीचे आहे, अशा तीव्र शब्दांमध्ये भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने उत्तर दिले आहे.

वाद नेमका काय...

भारताने रशियाकडून कच्चे इंधन तेल विकत घेऊ नये, यासाठी अमेरिका आणि नाटो यांनी भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न चालविला आहे. भारताच्या तेलखरेदीमुळे रशियाला पैसा मिळतो. या पैशाचा उपयोग रशिया युक्रेनशी युद्ध करण्यासाठी करतो. भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबविल्यास रशियाला उत्पन्न मिळणे बंद होईल. परिणामी, रशियाला युद्ध थांबवावे लागेल, असे अमेरिकेचे तर्कशास्त्र आहे. भारताप्रमाणे चीनही रशियाच्या तेलाचा त्याही पेक्षा मोठा खरेदीदार आहे. तसेच युरोपातील अनेक देश रशियाकडून मोठ्या प्रमाणात नैसर्गिक वायूची खरेदी करतात. त्यांच्यासंबंधी मात्र, अमेरिकेने कोणतीही भाषा केलेली नाही. केवळ भारतावर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे, असे भारताचे म्हणणे आहे.

भारताची ठाम भूमिका

रशियाच्या तेलासंबंधी भारताने ठाम भूमिका घेतली आहे. आमच्या 140 कोटी लोकांसाठी आम्हाला स्वस्त इंधनाची आवश्यकता असून असे इंधन जेथे उपलब्ध असेल, तेथून ते घेण्याची भारताची भूमिका आहे. हा भारताच्या धोरणस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. आमच्या ऊर्जा सुरक्षेला आमचे प्राधान्य असेल, अशी ठाम भूमिका या वेळी भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने घेतली आहे. तसेच दोन महिन्यांपूर्वीपासून भारताने रशियाकडून खरेदी होणाऱ्या तेलात अधिक वाढ केली.

भारताच्या खरेदीचा संबंध नाही...

रशिया आणि युक्रेन युद्धाशी भारताच्या रशियाकडून खरेदी केल्या जाणाऱ्या तेलाचा काहीही संबंध नाही. ही तेल खरेदी भारताने थांबविली, तरी रशिया युद्ध थांबवेल, याची कोणतीही शाश्वती नाही. कारण, चीन रशियाकडून तेल घेतच आहे. अमेरिका किंवा युरोपियन देश यांचेही रशियाशी खरेदी व्यवहार आहेत. रशियाच्या इंधन वायूवरच युरोपची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. त्यामुळे हे देश ही खरेदी थांबवायला तयार नाहीत. मग केवळ भारतावरच ठपका ठेवून त्याच्यावर 50 टक्के कर लावणे समर्थनीय कसे ठरते, असा भारताचा स्पष्ट प्रश्न आहे.

भारत-पाकिस्तान संबंध द्विपक्षीयच

भारत आणि पाकिस्तान यांच्या संबंधांमध्ये तिसऱ्या कोणताही देशाची मध्यस्थी आम्ही स्वीकारणार नाही, असे भारताने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. शुक्रवारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पाकिस्तानचे नेते शहाबाझ शरीफ आणि लष्कर प्रमुख असीम मुनिर यांची ओव्हल कार्यालयात भेट घेतली. या भेटीवर भारताने ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही या भेटीची नोंद घेतली आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील सर्व विवाद द्विपक्षीय पद्धतीनेच सोडविले जातील. तिसऱ्या देशाची मध्यस्थी स्वीकारार्ह नाही, हे बारताने स्पष्ट केले आहे.

नाटो महासचिवांचा आरोप बिनबुडाचा

ड नाटोचे महासचिव मार्क रट यांचा आरोप पूर्णत: तथ्यहीन, पायाहीन

ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अध्यक्ष पुतीन यांच्याशी दूरध्वनी बोलणे नाही

ड आपल्या 140 कोटी लोकांच्या ऊर्जा सुरक्षेसाठी रशियाकडून तेलखरेदी

ड भारताकडून पाकिस्तानसंबंधीच्या भूमिकेशी तडजोड केली जाणे अशक्य

Advertisement
Tags :

.