भारत-जर्मनी हॉकी मालिका पुढील महिन्यात
23, 24 ऑक्टोबर रोजी दिल्लीत होणार सामने
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत व जर्मनी पुरुष हॉकी संघात द्विदेशीय लढती होणार असून येथील मेजर ध्यान चंद राष्ट्रीय स्टेडियमवर हे सामने होणार आहेत. हे सामने 23 व 24 ऑक्टोबर रोजी होणार असल्याचे हॉकी इंडियाने मंगळवारी जाहीर केले.
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत या दोन संघांची शेवटची लढत झाली होती. त्या लढतीत जर्मनीने भारताचा 3-2 असा निसटता पराभव करून अंतिम फेरी गाठली होती आणि भारताचे सुवर्ण जिंकण्याचे स्वप्नही त्यावेळी भंगले होते. मात्र कांस्यपदकाच्या लढतीत स्पेनचा पराभव करून भारताने पदक मिळविले होते. हॉकी इंडियाचे अध्यक्ष दिलीप तिर्की या लढतींसंदर्भात बोलताना उत्साहित झाले होते. ‘या मालिकेत जागतिक दर्जाची हॉकी या लढतीत निश्चितच पहावयास मिळेल. दोन्ही संघांचा या खेळातील इतिहास मोठा असून जगातील या दोन बलाढ्या संघांत चुरशीचा खेळ चाहत्यांना पहावयास मिळेल. या मालिकेचे आयोजन करण्याने आम्ही सन्मानित झालो आहोत. या मालिकेने फक्त हॉकी खेलभावनेलाच बढावा मिळणार नसून दोन देशांतील क्रीडा संबंधांनाही आणखी बळकटी मिळणार आहे’, असे ते म्हणाले.
हॉकी इंडियाचे सरचिटणीस भोला नाथ सिंग म्हणाले की, ‘भारत-जर्मनी यांच्यातील लढती नेहमीच रोमांचक ठरत आल्या आहेत. अशा बलाढ्या संघाविरुद्ध खेळण्यासाठी आपला संघही आतुर झाला असून भविष्यातील आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या दृष्टिकोनातून या मालिकेतून दोन्ही संघांना आपले कौशल्य, क्षमता व डावपेच मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. इंडो-जर्मन सहयोगाचा भाग असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो, ज्यात केवळ व्यवसाय व मुत्सद्देपणाच नाही तर खेळाचे प्रेम, आवडदेखील आहे,’ असेही ते म्हणाले.
जर्मनी हॉकी फेडरेशनचे अध्यक्ष हेनिंग फास्ट्रिच म्हणाले की, ‘हॉकीसाठी भारत हा नेहमीच स्पेशल देश राहिला असून आपला संघ भारतीय हॉकीप्रेमीसमोर खेळण्यासाठी उत्सुक झाला आहे. ही मालिका म्हणजे दोन्ही देशातील क्रीडासंबंध आणखी मजबूत करण्याची एक विलक्षण संधी असेल. दोन्ही संघांना आगामी जागतिक स्पर्धांच्या तयारीसाठी ही मालिका उपयुक्त ठरेल,’ असे ते म्हणाले. ऐतिहासिक मेजर ध्यान चंद राष्ट्रीय स्टेडियमवर खेळण्याचा अनुभव घेण्यासाठी आणि हे आव्हान पेलण्यासाठी या मालिकेची वाट पाहत आहोत, असेही ते म्हणाले.