इंग्लड दौऱ्यात भारतासमोर स्विंग गोलंदाजीसह अनेक आव्हाने
वृत्तसंस्था/ लंडन
गेल्या काही वर्षांत इंग्लंड दौऱ्यावर स्विंग आणि वेगवान गोलंदाजी हे भारतासाठी आव्हान ठरले आहेत. गेल्या दीड दशकात जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या जोडीने सॅम करन आणि ख्रिस वोक्सच्या साथीने भारतीय फलंदाजांना हैराण केले. आता लवकरच शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील संघ लीड्समधील हेडिंग्ले येथे बेन स्टोक्सच्या इंग्लंडविऊद्ध खेळणार आहे. इंग्लंडकडे आता ब्रॉड किंवा अँडरसन नाहीत, पण धूर्त क्रिस वोक्स अजूनही आहे व ब्रायडन कार्स, जेमी ओव्हरटन आणि जोश टंग यांच्या रूपात त्यांच्याकडे असा मारा आहे जो घरच्या परिस्थितीत अनुभवहीन भारतीय फलंदाजीला अडचणीत आणण्याच्या दृष्टीने पुरेसा घातक आहे.
इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडने त्याचा पॉडकास्ट ‘फॉर द लव्ह ऑफ क्रिकेट’मध्ये जगातील सर्वोत्तम गोलंदाज जसप्रीत बुमराहची फिटनेस मालिकेचे भवितव्य कसे ठरवू शकते त्याचा उल्लेख केला आहे. ‘तो निश्चितच असा खेळाडू आहे ज्याच्याविरुद्ध इंग्लंडला पाचही कसोटी सामने खेळणे आवडणार नाही. कारण जर त्याने तसे केले, तर तो खूप बळी घेईल’, असे मत त्याने व्यक्त केले आहे. ब्रॉडचे विश्लेषण बरोबर आहे. कसोटी इतिहासात कोणत्याही गोलंदाजाने 20 पेक्षा कमी सरासरीने 200 बळी घेतलेले नाहीत. ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराह त्याच्या सर्वोत्तम लयीत होता, जिथे त्याने 32 बळी घेतले. भारत पुन्हा एकदा त्यांच्यावर अवलंबून असेल.
ऑस्ट्रेलियात भारताला बुमराहवर जास्त अवलंबून राहावे लागले होते. कारण दुसरा कोणताही गोलंदाज हमखास बळी घेण्यासारखा दिसत नव्हता आणि या दौऱ्यात मोहम्मद शमी नसल्याने बुमराह आणि मोहम्मद सिराजला तोंड दिल्यानंतर इंग्लंडकडे धावा काढण्याच्या बऱ्याच संधी असतील. भारतीय निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी स्पष्ट केलेले आहे की, बुमराह पाचही कसोटी खेळण्याची शक्यता कमी आहे. अशा परिस्थितीत भारताचा तऊण कर्णधार शुभमन गिल हा प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग आणि अनुभवी शार्दुल ठाकूर यांच्यासारख्या खेळाडूंवर बुमराह व सिराजला साथ देण्याच्या बाबतीत अवलंबून असेल.
कुलदीप यादववरही बरीच जबाबदारी असेल. गेल्या वेळी इंग्लंडच्या बाझबॉल धोरणाचा अवलंब करणाऱ्या फलंदाजांना कुलदीप यादवचा सामना करावा लागला असता त्यांना त्याच्या गोलंदाजीला तोंड देणे खूप कठीण गेले होते. त्याने चार कसोटी सामन्यांमध्ये खेळपट्टी फारशी फिरकीस पोषक नसतानाही 19 बळी घेतले होते आणि पाच सामन्यांच्या मालिकेत 0-1 ने पिछाडीवर असताना भारताच्या बाजूने पारडे झुकविले होते. असे असले, तरी कुलदीपसाठी इंग्लंडच्या चांगल्या आठवणी नसतील. तिथे त्याला 2018 मध्ये लॉर्ड्सवर विसरण्याजोगा अनुभव मिळाला होता. मात्र अधिक परिपक्वता आणि सुधारित कौशल्यांसह कुलदीप हा भारताचा ट्रम्प कार्ड ठरू शकतो.
इंग्लंडमध्ये फलंदाजी कशी करायची याचे जुने नियम सोपे आहेत. त्यानुसार थांबून वाट पाहायची असते. पण भारतीय खेळाडू, विशेषत: जेव्हा चेंडू स्वींग होऊ लागतो तेव्हा फारसे वाट पाहण्यासाठी प्रसिद्ध नाहीत. ते अशा स्थितीत गोठू लागतात, त्यांचे संतुलन बिघडू लागते आणि ते कधीही शरीरापासून दूर खेळू नये हा फलंदाजीचा नियम मोडतात.
2021 मध्ये जागतिक कसोटी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पराभवानंतर चार कसोटी सामन्यांमध्ये भारताने चांगली कामगिरी केली आणि इंग्लंडमध्ये झालेल्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारताच्या यशामागील कारण त्या मालिकेत सलामीवीर रोहित शर्मा आणि के. एल. राहुल यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली त्यात दडले होते. ओव्हल येथे भारत शेवटच्या वेळी खेळला त्यावेळी रोहितने 127 धावा केल्या होत्या. ही खेळी भारत दुसऱ्या डावात 99 धावांनी पिछाडीवर असताना नोंदली गेली होती आणि रोहितची ती एक असामान्य खेळी होती. त्यात त्याने 256 चेंडूंचा सामना केला होता आणि जवळजवळ पाच तास क्रिजवर राहताना फक्त सहा चौकार हाणले होते. भारतीय संघातील सर्वांत अनुभवी फलंदाज के. एल. राहुल यशस्वी जयस्वालला सोबतीस घेऊन त्याचे अनुकरण करण्यास इच्छुक असेल.
भारताचा नवीन कर्णधार शुभमन गिलच्या देशाबाहेरील फलंदाजीतील कामगिरीवरही यावेळी नजर राहील. गिलची कसोटी क्रिकेटमध्ये सरासरी 35 आहे. स्वींग होणाऱ्या चेंडूविऊद्ध त्याची असुरक्षितता देखील सर्वज्ञात आहे. गिलची कर्णधारपदी बढती अनेक माजी क्रिकेटपटूंना आवडलेली नाही. पण गिल आणि इतर तऊण भारतीय फलंदाज विराट कोहलीकडून धडा घेऊ शकतात. 2018 मध्ये त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती स्विंगला कसे तोंड द्यावे याचे एक उत्तम उदाहरण होते. त्यापूर्वी 2014 मध्ये कोहलीसाठी मालिका भयानक ठरली होती, त्यात त्याने 10 डावांमध्ये फक्त 134 धावा केल्या होत्या. पण पुढच्या खेपेला तो इंग्लंडमध्ये पूर्णपणे वेगळा फलंदाज बनून परतला.