भारताकडून पाकिस्तानचा भांडाफोड
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
भारताने संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानचा पुन्हा एकदा भांडाफोड केला आहे. पाकिस्तानमध्ये कशा प्रकारे निवडणुकांमध्ये भ्रष्टाचार केला जातो आणि फसवणूक करुन कशी सरकारे निवडून आणली जातात, हे भारताने स्पष्ट केले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये भारताने निवडणुकीत घोटाळा केला आहे, असा आरोप पाकिस्तानच्या प्रतिनिधीने त्याच्या भाषणात केला होता. त्याला भारताने चोख प्रत्युत्तर दिले आहे. भारताच्या प्रथम प्रतिनिधीमंडळाचे नेते पी. पी. चौधरी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या तिसऱ्या बैठकीत प्रभावीपणे भारताचा पक्ष मांडला. पाकिस्तानने अपप्रचार आणि अफवा पसरविण्यासाठी नेहमीच संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठांचा दुरुपयोग केला आहे. ही पाकिस्तानची जुनी सवय आहे. पाकिस्तानमध्ये निवडणुकांमध्ये घोटाळे करुन लोकशाहीची वाट कशी लावली जाते, हे जगाला माहिती आहे. भारताने नेहमीच आपल्या देशात लोकशाहीची बूज राखली आहे. त्यामुळे पाकिस्तानने आम्हाला उपदेशाचे डोस पाजू नयेत, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.